माधवी भाजी बाजारात गेली होती. तिथे तिची पर्स हरवली. पर्समध्ये काही पैसे, कार्ड होल्डर, मोबाइल, गाडीची किल्ली अशा वस्तू होत्या. त्यातच तिचं ए.टी.एम.कार्डही होतं. तिने बाजारात चार-पाच भाज्या घेतल्यानंतर एके ठिकाणी भाजी विक्रेत्याला पैसे देण्यासाठी पिशवीतून पर्स काढायला पाहिलं तर तिला पर्स कुठे दिसली नाही. तिने पिशवीतली सगळी भाजी उलथीपालथी केली. आधीच्या भाजीवाल्याकडे जाऊन आली. आजूबाजूला खूप विचारलं. कुठेच तिची पर्स सापडली नाही. काय करावं तिला कळेचना. ती घाबरून गेली, रडायला लागली. लोकांपैकीच कुणी तरी तिला घरी सोडलं. काही वेळाने तिची मुलगी काव्या घरी आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काव्याला तिने घडलेली सगळी घटना जशीच्या तशी सांगितली. काव्या सावध झाली. तिने आधी बँंकेच्या कस्टमर केअरला फोन केला. ए.टी.एम. कार्ड हरवलं असून ते बंद करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशी दोघी बँकेत गेल्या. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. कस्टमर केअरमुळे तिचं कार्ड बंद झालं होतं. तरीही माधवीच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये गेले होते. बँकेने सांगितलं, की ‘पैसे हरवल्याचा आणि बँकेचा काहीही संबंध नाही.’ काव्या अस्वस्थ होती. तिने एकदा विचार केला की, बँकेविरुद्ध ग्राहक न्यायालयात जावं. आपले २५००० बँकेच्या चुकीमुळे गेले, असं दोघींनाही वाटत होतं; पण तिने विचार बदलला. पैशांची चोरी झाली आहे तर पोलीस स्टेशनलाही जाता येईल असं वाटल्याने दोघींनी त्यांच्या हद्दीतील पोलीस स्टेशन गाठलं. तिथे चोरी झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी पर्स हरवल्याचा गहाळ दाखला काढून दिला आणि दोघींना सायबर सेलकडे पाठवलं.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: फुलणारे कंद लिली, ग्लॅडिओलस, निशिगंधा

तिथे माधवीला अनेक प्रश्न विचारले. त्यातून पुढीलप्रमाणे माहिती समोर आली. हरवलेल्या पर्समध्ये एका छोट्या डायरीत तिने ए.टी.एम. कार्डचा पासवर्ड लिहून ठेवला होता. त्यामुळे ते पैसे गेले होते. सुदैवाने तिच्या कार्डवरून एका दिवशी पंचवीस हजार रुपये काढण्याचीच मर्यादा होती. पर्स हरवल्यानंतर घाबरून, गोंधळून न जाता तिने पटकन बँंकेला कळवलं असतं तर हा धोकादेखील टळला असता. सगळ्यांनी आता डिजिटल आर्थिक साक्षर असलं पाहिजे. कुठेही ए.टी.एम. पासवर्ड, सीव्हीव्ही अशा गोष्टी सहज लक्षात येतील अशा पद्धतीने नोंद करू नयेत. कोणत्याही आमिषापोटी आपल्या खात्याचे डिटेल्स कुणालाही देऊ नयेत. कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करून ओटीपी किंवा बँक डिटेल्स देऊ नयेत. व्यवहार करताना काळजी घ्यावी. नाही तर बँकेचे ग्राहक म्हणून आपली फसगत होण्याची शक्यता वाढते. सायबर पोलिसांनी दिलेली माहिती दोघींना समजली होती; पण पैसे हरवल्याचं दु:ख काही कमी होत नव्हतं.

हेही वाचा… नातेसंबंध: बॉयफ्रेंड तुमचं खाजगी आयुष्य सार्वजनिक करतो का?

काव्याने पोलिसांना एक प्रश्न विचारला, “आम्ही ग्राहक न्यायालयात जाऊन बँकेविरुद्ध तक्रार दिली तर आमचे २५००० रुपये परत करण्याची जबाबदारी बँकेची राहील ना? ” त्यावर मात्र सायबरचे पोलीस थोडे चिडले. म्हणाले, “बँकेचा पासवर्ड तुम्ही सहज चोरांपर्यंत पोहोचवलात म्हणून तुमचे पैसे हरवले. तुमच्या चुकीमुळे हे घडलं आहे. असं असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर ग्राहक न्यायालयात जाणार आहात? हे बघा, आम्ही आमची यंत्रणा कामाला लावतोच आहे. चोर पकडला गेला तर लगेचच तुम्हाला कळवतो. आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघून शोध लावण्याचा प्रयत्न करतो. यात ग्राहक न्यायालय तुम्हाला मदत करू शकणार नाही. कारण ग्राहक म्हणून बँकेने तुमची फसवणूक केलीच नाही उलट तुमचं कार्ड बँकेने लगेच बंद केलं. ”

दोघी घरी परतल्या. काव्याने ग्राहक तक्रार मंचची वेबसाइट उघडली. कोण तक्रार करू शकतो त्याचे नियम वाचले. आपण कोणते पुरावे उपलब्ध करू शकतो याचा अंदाज घेतला. तिच्या लक्षात आले की, चूक आपली असल्याने ग्राहक न्यायालयात जाऊ शकत नाही. आईने ए.टी.एम.चा पासवर्ड असा लिहून ठेवल्याने चोराच्या हातात तिजोरीची किल्ली दिल्याचाच प्रकार घडला. आता हे चोरी प्रकरण स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. ग्राहक म्हणून आपली फसवणूक तेव्हा ग्राह्य धरली जाते जेव्हा आपण पैसे देऊन काही वस्तू खरेदी करतो. ती खराब निघते किंवा ज्या सेवा आपण घेतो त्यात काही कमतरता असेल तेव्हा आपण फसलेले असतो. जागरूक राहून वैयक्तिक विश्वसनीय माहिती जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते हेच खरं.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Always remember atm card password never record atm card password in a way that others can easily see dvr