डॉ. शारदा महांडुळे
हत्तीच्या दातासारखा दिसणारा पांढरा शुभ्र लांबलचक मुळा हा सर्वांच्याच मनाला भुरळ घालतो. जसा आहारामध्ये मुळ्याचा वापर करण्यात येतो, त्याचबरोबर तो औषध म्हणूनही फार प्राचीन काळापासून वापरला जातो. मराठीत ‘मुळा’, हिंदीमध्ये ‘मूली’, संस्कृतमध्ये ‘मूलक’, इंग्रजीत ‘रॅडिश’, तर शास्त्रीय भाषेत ‘फॅनस सटायव्हस’ (Raphanus Sativus) म्हणून ओळखला जाणारा मुळा ‘क्रुसीफेरी’ या कुळातील आहे.
कंदमूळ असलेल्या या मुळ्याची पाने, शेंगा या सर्वांचाच आहारात उपयोग केला जातो. मुळा लाल व पांढरा अशा दोन प्रकारचा असतो. मुळा चवीला तिखट, किंचित गोड व जिभेला चरचरणारा असतो. मुळा कच्चा किंवा भाजी करूनही खावा. पानाचीही भाजी केली जाते. त्याचबरोबर त्याच्या शेंगाना डिंगऱ्या असे म्हणतात. याचीही भाजी बनवून खाल्ली जाते. अशा प्रकारे मुळ्याचे सर्व भाग उपयोगी पडतात.
हेही वाचा >>>नातेसंबंध: तुमचं नातं फक्त शारीरिक आहे का…?
औषधी गुणधर्म :
आयुर्वेदानुसार : मुळा दीपक, पाचक, त्रिदोषशामक, कटू रसात्मक, उष्ण वीर्यात्मक, रूक्ष, रुचकर असा असतो.
आधुनिक शास्त्रानुसार : मुळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, आर्द्रता, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व औषधी घटक विपुल प्रमाणात असतात.
हेही वाचा >>>गच्चीवरची बाग : झाडांसाठीची संजीवके
उपयोग :
१) मुळा अग्निप्रदीपक असल्यामुळे जेवताना चांगली भूक लागण्यासाठी व घेतलेला आहार पचण्यासाठी मुळा त्याच्या चकत्या करून त्या जेवणासोबत कच्च्या खाव्यात. याने जेवणाची लज्जतही वाढते व घेतलेला आहार चांगला पचतो.
२) मूतखड्याचा त्रास होत असेल, तर मुळ्याच्या पानांचा रस काढून दिवसातून दोन वेळा तो रस अर्धा ग्लास प्यावा. हा प्रयोग सलग काही दिवस केल्यास मूतखडा विरघळतो.
३) लघवी साफ होत नसेल, तर मुळ्याच्या पानांचा रस काढून तो एक-एक कप दिवसातून दोन वेळा प्यावा. यामुळे लघवीतील अडथळा दूर होऊन लघवी साफ होते.
(४) अपचन, पोटात गॅस धरणे, पोटात दुखणे जाणवत असेल, तर मुळ्याच्या अर्धा कप रसात एक चमचा लिंबूरस टाकावा. हा रस जेवण झाल्यावर प्यायल्यास वरील विकार दूर होतात.
५) भूक मंदावणे, तोंडास चव नसणे, अपचन, आम्लपित्त, जुलाब या विकारांवर कोवळ्या मुळ्याचा व पानांचा काढा करून तो एक कप घ्यावा. त्यामध्ये पिंपळी चूर्ण अर्धा चमचा टाकून प्यायल्यास जाठराग्नी प्रदीप्त होतो व वरील विकार दूर होतात.
हेही वाचा >>>आहारवेद: उत्साहवर्धक नारळ
६) मुळ्याच्या पानांचा रस अर्धा कप घेऊन त्यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतले असता मूळव्याधीतून रक्त पडायचे थांबते व मूळव्याधीचा आजार कमी होतो.
७) मुळ्याची पाने वाटून त्यांचा रस काढावा. त्या रसात खडीसाखर टाकून दिवसातून दोन वेळेला तो रस अर्धा कप प्यायल्यास भूक वाढते. पोट साफ होते. त्यामुळे काविळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
८) त्वचेच्या विकारांमध्ये मुळ्याच्या बिया पाण्यात बारीक करून त्या त्वचेवर लावल्यास नायट्यासारखे आजार कमी होतात.
९) वर्षभर मुळा खाता यावा म्हणून मुळ्याचे रायते, लोणचे करून खावे. तसेच ताज्या मुळ्याचा वर्षभर पराठा, चटणी, कोशिंबीर, थालीपीठ अशा अनेक प्रकारे मुळा आहारामध्ये घेता येतो.
सावधानता :
सहसा मुळा हा जेवणासोबत इतर आहारीय पदार्थांसोबत खावा. रिकाम्या पोटी मुळा खाल्ल्यास छातीत व पोटात जळजळ सुरू होते. म्हणून पित्तप्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी मुळा जपूनच खावा. तसेच शरद ऋतूमध्ये पित्तप्रकोप होत असल्याकारणाने मुळा खाणे अहितकारक असून, त्यामुळे तो खाणे टाळावे.
dr.sharda.mahandule@gmail.com