अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. हा विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. लग्नाआधी अंबानी कुटुंबीयांनी दोन भव्य कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यामध्ये अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती.

सर्वात पहिला प्री-वेडिंग कार्यक्रम हा गुजरातमधील, जामनगर येथे मार्च महिन्यात झाला होता आणि दुसरा कार्यक्रम नुकताच इटलीमध्ये एका क्रूजवर पार पडला. अंबानींनी ठेवलेल्या या सोहळ्याची चर्चा जगभरात, विविध सोशल मीडिया माध्यमांवर होत आहे. या भव्य कार्यक्रमांमध्ये विविध आकर्षक गोष्टी होत्या. त्यापैकी एक म्हणजे, जामनगरमध्ये ठेवण्यात आलेल्या प्री-वेडिंगमध्ये सेलिब्रिटी मेहंदी कलाकार वीणा नागदा यांची उपस्थिती. वीणाने जामनगरमधील सोहळ्यात अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांसह अनेकांच्या हातावर आकर्षक रंगांमध्ये मेहंदी काढली असल्याचे डीएनएच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : वर्षभराचा खंड पडूनही किरण पहलची कौतुकास्पद कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कसे मिळविले स्थान, पाहा….

वीणाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून अंबानींच्या प्री-वेडिंगमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यामध्ये मेहेंदी ही चक्क गुलाबी, पांढऱ्या, सोनेरी आणि सिल्व्हर अशा सुंदर आणि अनोख्या रंगातील असल्याचे पाहायला मिळाले.

वीणा नागदा ही बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या मेहेंदी कलाकारांपैकी एक आहे. नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि नताशा दलाल यांसारख्या अनेक बड्या मंडळी या वीणाच्या ग्राहक आहेत.

“मी नवरी मुलीची मेहेंदी काढण्यासाठी साधारण ३ ते ७ हजार रुपये घेते. पॅकेजमध्ये यामध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पायांवर मेहेंदी काढली जाते. इतर पाहुण्यांच्या प्रत्येक हातासाठी ५० ते ७५ रुपये असा दर आकारला जातो. पण, मी सेलिब्रिटींसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. ते त्यांच्या इच्छेनुसार मला पैसे देतात आणि ते नेहमीच माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त असतात”, असे वीणाने २०२१ साली जागरण टीव्हीमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

हेही वाचा : महाराष्ट्रातील दुर्गम भागातून थेट अवकाशाला गवसणी, गडचिरोलीच्या ‘या’ हवाई सुंदरीचा प्रवास वाचा

वीणा एका मध्यमवर्गीय घरात लहानाची मोठी झाली असून, तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, तिला पुढचे शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती. तेव्हा वीणाने साड्यांवर भरतकाम करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मेहेंदी काढण्याचादेखील सराव करण्यास सुरुवात केली. जेव्हा वीणाने ज्येष्ठ अभिनेते संजय खानच्या मुलीच्या लग्नात म्हणजे, फराह खान अलीच्या लग्नात मेहंदी लावण्याचे काम केले, तेव्हापासून वीणाने या क्षेत्रात भरभराट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वीणाने शिल्पा शेट्टी, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसह अनेक बॉलीवूड लग्नांमध्ये आवर्जून बोलावली जाणारी मेहेंदी कलाकार बनली.

वीणा नागदा केवळ लग्नांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये मेहेंदी काढण्याचे काम करत नाही, तर तिने अनेक चित्रपटांसाठीसुद्धा मेहेंदी काढली आहे. यामध्ये ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘हम तुम’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि अगदी अलीकडेच आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी,’ आणि ‘ड्रीम गर्ल २’ सारख्या चित्रपटांमध्ये मेहेंदी कलाकार म्हणून काम केले आहे.