फॅशन विश्वात सारखे नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात. विविध फॅशन मॅगझीन्समधून आपल्याला ते पाहायला मिळतात. आपण जेव्हा ही मॅगझीन्स हाताळतो, तेव्हा अगदी प्रथम बघतो त्याचं मुखपृष्ठ. त्यावर कोणती मॉडेल वा कोणती अभिनेत्री आहे, तिनं काय परिधान केलंय, याकडे फॅशनप्रेमीचं लक्ष लागून राहिलेलं असतं. यंदाच्या ऑगस्टमध्ये एका जागतिक, लोकप्रिय फॅशन मॅगझीनचं मुखपृष्ठ खूप चर्चिलं गेलं. नाही! तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये! ‘अति बोल्ड’ फोटोमुळे वगैरे हे मुखपृष्ठ चर्चेत नव्हतं. मग असं काय होतं त्यात?… तर या मॅगझीनच्या मुखपृष्ठावरची मॉडेल खरी नव्हतीच! म्हणजे खोटी खोटी, पण अगदी खऱ्यासारखी भासणारी… ‘एआय जनरेटेड’ (कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून निर्माण केलेली) होती!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ग्लॅमर बल्गेरिया’ हे ते जगातलं पाहिलं ‘हाय प्रोफाइल’ वगैरे फॅशन मॅगझीन ठरलं, ज्यांनी ‘एआय जनरेटेड’ मॉडेलचं छायाचित्र मुखपृष्ठावर वापरलं. आणखी मजा अशी, की हे कव्हर निर्माण करताना कॅमेरा वापरलाच गेला नाही, पूर्ण ‘एआय जनरेटेड’ डिझाईन वापरलं गेलं. आर्ट डायरेक्शन पासून मॉडेलच्या स्टायलिंगपर्यंत सर्वकाही म्हणे अवघ्या वीस मिनिटांत पार पडलं होतं!

हेही वाचा… ग्राहकराणी : रिपोर्ट चुकीचे दिल्यास भरपाई?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बार्बी’नं अक्षरशः हैदोस घातलाय! जिथे बघू तिथे ऑगस्टभर विविध अभिनेत्री, मॉडेल, इतकंच काय सामान्य फॅशनप्रेमी मुली, मुलंही बार्बी चित्रपटाचा ट्रेंड फॉलो करत होते. गुलाबी रंगाचे कपडे घालून, बहुलीगत सजून पोझ देत होती. ‘ग्लॅमर बल्गेरिया’नंसुद्धा बार्बी ट्रेंडला सलाम करत आपल्या ‘एआय जनरेटेड’ कव्हर फोटोशूटमध्ये गुलाबी रंगाची उधळण केली आहे. त्यांची ही खोटी खोटी मॉडेल हुबेहूब मायामी मधल्या एका माजी ‘मिस व्हर्जिन आयलँड्स’ मॉडेलसारखी- लिसा ओपी हिच्यासारखी दिसते!

हेही वाचा… चेहऱ्याच्या मसाजसाठीचा ‘जेड रोलर’ असतो तरी काय?

या गोष्टीनं पुन्हा एकदा तीच गोष्ट अधोरेखित झाली, की भविष्यात फॅशन मॉडेलिंग, फोटोशूट आणि त्याच्याशी निगडित जे जे व्यवसाय आहेत, म्हणजे अर्थातच फॅशन डिझायनिंग, स्टायलिंग, मेकअप, फोटोशूटमधली इतर तांत्रिक अंगं, फॅशनविषयक लेखन, यांना कदाचित मुळापासून बदलावं लागेल. जास्त कल्पकता, जास्त अचूकता, किफायतशीर दृष्टिकोन, हे अंगीकारावं लागेल. एक आहे, की खऱ्या जीवनात ‘एआय’ आणि खरा माणूस यांच्यात फरक तर निश्चितच राहणार आहे. पण तुम्ही ‘एआय जनरेटेड’ मॉडेल्सचे फोटो पाहिलेत, तर ते अगदी खरेखुरे भासतात, हेही खरंय. शिवाय ‘एआय’ दिवसेंदिवस आणखी ऍडव्हान्स्ड होत जाणारे. ‘एआय’द्वारे तयार होणारं फोटोशूट कमी खर्चिक पडेल. त्याला प्रत्यक्ष कॅमेरा वापरावाही लागणार नाही, हे वेगळंच! तसंच त्याबरोबर ‘एआय’ अशा मॅगझीन्सना विविध विषयांवरील मजकूरसुद्धा चुटकीसरशी तयार करून देऊ शकेल. यात वेळ वाचेल, हे तर आहेच.

हेही वाचा… ओवाळिते भाऊराया…! महिला प्रवाशांच्या मनातील खदखद मोटरमनला कळेल का?

कुणी सांगावं, भारतातल्या मोठ्या फॅशन मॅगझीन्सवरसुद्धा तुमच्या लाडक्या अभिनेत्री आणि फॅशनिस्टांच्या जागी लवकरच ‘एआय मॉडेल’ दिसतील!… तुम्हाला या ट्रेंडबद्दल काय वाटतं?

lokwoman.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An ai generated model on the cover of a glamour bulgaria fashion magazine dvr
Show comments