शिक्षण ही काळाची गरज आहे. आज समाजातील प्रत्येक घटक सुशिक्षित असणे, गरजेचे आहे. आज सर्वच जण आवडीने शिक्षण घेतात पण समाजात असेही काही घटक आहेत, ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण जे परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकले नाही. पण असं म्हणतात शिक्षणाला वयाचं बंधन नसते. तुम्ही मरेपर्यंत शिकू शकता. अशातच प्रौढ निरक्षरांना शिकवून त्यांची १५० गुणांची परिक्षा घेण्यात आली. राष्टीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका सुशीला ढोक नावाच्या आजीला चक्क ९८ टक्के गुण मिळाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल. वयाच्या सत्तरीत आजीने ते करून दाखवले जे शाळेतील मुले करून दाखवण्यात अपयशी ठरतात.

कोण आहेत या आजी?

यवतमाळ जिल्ह्यातील घारफळ तालुक्यातील बाभुळगांवमध्ये राहणाऱ्या या एक सामान्य आजी. यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती पण शिकता आले नाही. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परिक्षा देण्याचे ठरविले आणि जिल्हापरिषद शाळेच्या केंद्रावरून परिक्षा दिली आणि काय आश्चर्य आजीला ९८ टक्के गुण मिळाले.
आजी मोठ्या कुटुंबात वृद्ध पती, दोन मुले, सूना आणि नातवंडाबरोबर राहतात. आजींना एक मुलगी सुद्धा आहे. तिचे लग्न झाले.

हेही वाचा : मासिक पाळीत मुंबईतील मुलींची कुचंबना, सॅनिटरी नॅपकिन्स बदलणंही मुश्किल; शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी नेमकी समस्या काय?

आजी काय सांगतात?

लोकसत्ताने सुशीला ढोक यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेतली. सुशीला ढोक या वयाच्या सत्तरीत असल्या तरी बोलायला तितक्याच बिनधास्त आणि प्रेमळ आहेत. जेव्हा आम्ही त्यांना विचारले की परिक्षेत ९८ टक्के गुण मिळाले तर कसं वाटतं? त्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. आजी सांगतात की त्यांना मोतीबिंदू झाला आहे आणि त्याचं ऑपरेशन करायचं आहे. मोतिबिंदूशी झुंज देत असलेल्या आजीबाईंनी परिक्षेत ९८ टक्के मिळवणे, हे खरंच कौतुकास्पद बाब आहे.
आजी सांगतात, “लहानपणापासून शिकायची आवड होती. लहानपणी शाळेतसुद्धा जायचे. मग वडील वारले त्यामुळे पुढे शिकता आले नाही. १८ व्या वर्षी लग्न केले आणि त्यानंतर कधीच शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. आजकालची मुले ऐकत नाहीत. त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे.”

सुशीला ढोक या समाजासाठी आणि समाजातील प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा आहे. लग्नामुळे, जबाबदारीमुळे ज्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, अशा महिलांनी आजीपासून प्रेरणा घ्यावी आणि शिक्षणासाठी पाऊल टाकावे. आजीची जिद्द आणि शिक्षणाची ओढ पाहून शिक्षण आणि वयाचा काहीही संबंध नाही, हे सिद्ध होते. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या महिलांना प्रेरणा देणाऱ्या सुशीला ढोक या आजींना लोकसत्ताचा खूप मोठा सलाम.