प्रिय केतकी माटेगावकर,

आम्ही सगळेच लहानपणापासून पाहात आलोय. ‘छान छान मनी माऊचं बाळ कसं गोरं गोरं पान’ हे गाणं म्हणतानाचा तुझा निरागस चेहरा आम्हाला आठवतो. त्यानंतर तू ‘शाळा’ मधून तू ‘शिरोडकर’ म्हणून जेव्हा तू भेटलीस तेव्हाही तुझी निरागसता कायम होती. तू ‘शिरोडकर’ची ती भूमिकाही खूप सुंदर साकारलीस. फुंतरु आला त्यातही तुझी भूमिका आम्हाला भावली. तू सोशल मीडियावर सक्रिय असतेस. अशात तुझं बॉडी शेमिंग करणाऱ्यांना तू चांगलंच सुनावलंस. तुझ्या धाडसाचं कौतुकच.

#MybodyMyPride हा हॅशटॅग पोस्ट करत तू तुझ्यावर होणारा सडेतोड उत्तर दिलं आहेस. बारीकच दिसतेस, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस, खात जा जरा, थंडी मानवलेली दिसतेय, पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिसमधले सहकर्मचारी असो, कोणीही असो या वाक्यांना सामोरं जावं लागतं. मी एवढंच म्हणेन, मी या सगळ्यात तुमच्याबरोबर आहे. मलाही याचा सामना करावा लागला आहे. अशा प्रकारची पोस्ट तू लिहिली आहे. त्यासाठी तुझं खरंच खूप कौतुक. स्त्री देहावर बोलण्याचा अधिकार, शेरेबाजीचा अधिकार खरंतर कुणालाच नाही.

एखादी मुलगी तिची वाढ होत असताना, वयात येत असताना तिच्यात अनेक बदल होत असतात. बऱ्याचदा तिला हे बदल कळतात, बऱ्याचदा लक्षातही आणून द्यावे लागता. स्त्री, मुलगी असल्याचं भान तिला असतंच. शिवाय मनात एकप्रकारची भीतीही असते. आपलं काही चुकणार नाही ना? आपण समाजात बरोबर वावरु ना? त्यावेळी स्त्रीला टीकेला, शेरेबाजीला सामोरं जावं लागतं. खरंतर त्या वेळी तिला गरज असते ती आधार देण्याची, समजून घेण्याची. त्याऐवजी सो कॉल्ड समाज तिला नावं ठेवण्यात धन्यता मानतो. अशीच नावं तुलाही ठेवली गेली आणि त्याविरोधात तू जो आवाज उठवलास ते चांगलंच केलंस. समाजाला गरज असते अशा प्रकारे अंजन घालण्याची. तू जे केलंस त्यावरुन व.पु. काळेंनी लिहिलेला एक उतारा आठवला.

“महाभारताचं युद्ध संपलं तेव्हा श्रीकृष्णाने सर्वात आधी अर्जुनाला खाली उतरण्यास सांगितलं. त्यानंतर अर्जुन म्हणाला मी आधी का उतरायचं? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की माझ्यावर विश्वास ठेव आधी तू खाली उतर. कृष्णाचं ऐकून अर्जुन खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने रथाचे घोडे मोकळे केले. मग श्रीकृष्णही त्या रथातून खाली उतरला. ज्यानंतर तो रथ जळून खाक झाला. त्यानंतर कृष्ण अर्जुनाला म्हणाला जर मी तुझ्याआधी खाली उतरलो असतो तर हा रथ तुझ्यासहीत जळून गेला असता. अर्जुनाने विचारलं असं का घडलं असतं? त्यावर कृष्ण म्हणाला युद्ध सुरु असताना जी अस्त्र, शस्त्र चालवण्यात आली त्यांचा परिणाम या रथावर झाला होता. म्हणून तो रथ जळून गेला. स्त्री देहाचं रक्षणही असाच कुणीतरी अज्ञात कृष्ण करत असला पाहिजे नाहीतर हजारो नजरांच्या परिणामांमुळे हा देह चितेवर जाण्याआधीच जळून गेला असता.”

केतकी, तू दाखवलेलं धाडस तुझ्या टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. कारण अशी पोस्ट लिहिण्यासाठीही धाडसच हवं. अनेकदा स्त्रिया अन्याय, चुकीच्या नजरा, शेरेबाजी सहन करतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांचं शेरेबाजी करणाऱ्यांचं बळ वाढतं. त्यांना त्यांची शेरेबाजीच योग्य वाटते. पण तू काय योग्य आहे ते तुझ्या शब्दांमधूनच सिद्ध केलंय. तुझ्याकडून हे बळ शेरेबाजी सहन करणाऱ्या प्रत्येकाला मिळो. तुला आदर्श ठेवून त्या किमान यावर व्यक्त व्हायला शिकल्या तरीही तुझी पोस्ट सत्कारणी लागली असंच वाटेल. आता थांबतो.. पुन्हा एकदा तुझं खूप मनापासून अभिनंदन करुन.

तुझाच एक चाहता

Story img Loader