सुचित्रा प्रभुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही काही माणसांचा जन्म हा मोठ्या कामांसाठीच होत असतो. आपलं हे काम ही माणसं इतक्या समर्पणानं करतात, की तिथे धर्म, जाती, पंथ या कशाचाही अडसर राहत नाही. अशाच लोकांच्या मांदियाळीतील एक नाव म्हणजे बेगम अनीस खान. बेगम अनीस खान अलीकडेच निवर्तल्या. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुलींसाठी धार्मिक भेदांपलीकडे जाणारी एक शाळा काढावी असं स्वप्न त्यांनी बघितलं आणि नुसतंच बघितलं नाही तर हैदराबाद सारख्या शहरात राहून ते प्रत्यक्षात आणलंदेखील.

१९६५ साली हैदराबादमध्ये सैफाबाद येथे त्यांनी बारा विद्यार्थीनी आणि चार शिक्षकांच्या सहाय्यानं नसर स्कूलची स्थापना केली. मुलींसाठी चालू केलेली ही शाळा प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाची होती. निव्वळ पुस्तकी शिक्षण नाही, तर जगात वावरण्यासाठी एका व्यक्तीला जे जे गुण आवश्यक असतात, ते गुण त्यांनी या शाळेमार्फत आपल्या विद्यार्थिनींनाP दिले. शाळेचे नाव वाचले की ती फक्त मुस्लिम मुलींसाठी आहे की काय असं वाटू शकतं. परंतु त्यांनी मात्र शिक्षण क्षेत्रात धर्म, जातींचा कोणताही अडसर ठेवला नाही. या शाळेत रमजानचे रोजे ज्या उत्साहानं साजरे होत त्याच उत्साहानं दिवाळी, ख्रिसमस इतकंच काय तर नवरात्रीचा गरबादेखील साजरा होत असे.

हेही वाचा… गच्चीवरची बाग : बेबी नेकलेस

दुसरं वैशिष्ट्य असं, की इथे शिकविणाऱ्या प्रत्येक शिक्षिकेला बाई किंवा टीचर न म्हणता ‘आन्टी’ म्हटलं जात असे. त्यामुळेच ‘मॅडम’पेक्षा बेगम अनीस आन्टी म्हणून त्या पूर्ण शाळेत लोकप्रिय होत्या. पुस्तकी शिक्षणाबरोबर विद्यार्थीनींचा बौद्धिक आणि कल्पनेचा विकास कसा होईल, याकडे त्यांचे अधिक लक्ष असे. त्यामुळेच शाळेत पोस्टर मेकिंग, चित्रकला, निबंध यांसारख्या स्पर्धा वेळोवेळी घेत असत आणि त्यांचे विषयदेखील रंजक असत.

याव्यतिरिक्त शाळेच्या आवारात तऱ्हेतऱ्हेची झाडं विद्यार्थिनींकडून लावून घेतली जात आणि त्यांच्याकडूनच जोपासलीदेखील केली जात असे. त्या अगदी काश्मीरसारख्या ठिकाणी शाळेची सहल घेऊन गेल्या होत्या.

हेही वाचा… मानसा मानसा कधी होशील मानूस?

१९६५ हा काळ लक्षात घेतला तर त्या काळी मुलींसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा फारशा नव्हत्याच. पण भविष्यात मुलींना काळाबरोबर चालावे लागणार आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी शाळेचं माध्यम इंग्रजी ठेवलं. शाळेची फीदेखील माफक ठेवली. शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला ही शाळा तिची वाटावी म्हणून खास प्रयत्न केले जात. उदा. जेव्हा मौलवी शाळेत धडे द्यायला येत असत, त्यावेळी इतर जातीधर्मांच्या मुलींसाठी संस्कृत अथवा तेलुगूचे वर्ग घेतले जात. अमुक धर्माचे धडे तुम्ही शिकलेच पाहिजेत अशी सक्ती कुणावर नव्हती.

बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपल्या शाळेच्या शिक्षणपद्धतीत बदल केले. आधी फक्त एसएससी बोर्डपुरती मर्यादित असलेली शाळा हळूहळू आयसीएसई आणि कालांतराने आयएससीमध्ये रुपांतरीत झाली. इंग्रजी साहित्याची मुलींमधली आवड लक्षात घेऊन त्यांनी खास इंग्रजी साहित्याचे वर्ग सुरू केले. त्यांच्या या कामामध्ये त्यांना पती आणि सासूची तितकीच मोलाची साथ मिळाली.

हेही वाचा… आहारवेद : रुचकर मिरची

शाळेतल्या हर एक गोष्टींत कार्यक्रमात बेगम अनीस यांचा उत्साही सहभाग असायचा. ती लुडबुड नसायची. जसे घरातील एका महत्त्वाच्या कार्याला घरातील वडीलधाऱ्या मंडळीची उपस्थिती आवश्यक असते, तशी त्यांची उपस्थिती सर्वांना हवीहवीशी वाटे.

सर्वसमावेशक शाळा हे त्यांचं स्वप्न असलं तरीही २००१ मध्ये त्यांनी शाळेतून निवृत्ती घेतली. तरी त्या शाळेत रोज येत असत. त्यांची उपस्थती सर्वांनाच आवडत असे. शिक्षण तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या झटल्या. त्यामुळेच जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी पसरली, त्यावेळी समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. यात त्यांच्या शाळेतील बहुतांश विद्यार्थीनींनी नसर शाळेतील आपल्या असंख्य आठवणी शेअर केल्या होत्या. कारण त्या प्रत्येकीकडे अनीस आन्टीच्या आठवणी होत्या.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anees aunty a lady who insistent about girls education asj
Show comments