डॉ. सारिका सातव
शरीरातील रक्ताचे/हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, यालाच ॲनिमिया/ रक्ताल्पता असे म्हणतात. केस गळणे, थकवा येणे, दम लागणे, वर्ण पांढुरका दिसणे, पाळीच्या विविध तक्रारी चालू होणे, पायाला गोळे येणे, चक्कर येणे, भूक मंदावणे, धडधड होणे इत्यादी अनेक लक्षणे ॲनिमियामध्ये दिसतात. अनेक कारणांमुळे ॲनिमिया होतो. पण, महत्त्वाची दोन कारणे आहेत.
१) लोहाची कमतरता
२) B12 जीवनसत्वाची कमतरता
या दोन्हींमागची कारणे वेगवेगळी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ही दोन्ही कारणे वेगवेगळी/एकत्र दिसून येतात. लवकर चिकित्सा न केल्यास घातक परिस्थिती उद्भवू शकते. म्हणून वेळीच निदान आणि चिकित्सा करणे गरजेचे आहे.
आणखी वाचा – महिलांचे पित्त विकार आणि आहार
स्त्रियांमध्ये हा विकार जास्त प्रवणशील असतो. अवेळी खाणे, खाण्याचे प्रमाण कमी -जास्त, मासिक पाळीमधून होणारा कमी अधिक रक्तस्राव, गर्भावस्था, दुग्धपानाची अवस्था यामध्ये असणारी जीवनसत्वाची विशिष्ट आवश्यकता, हार्मोन्सचा वयानुसार चढ-उतार इत्यादी अनेक कारणांमुळे स्त्रियांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण अधिक असते. म्हणून सरसकट सर्व स्त्रियांनी मधे मधे हिमोग्लोबिनचे प्रमाण जरूर तपासत राहिले पाहिजे.
१) लोहाची कमतरता
तयार होणाऱ्या लोहाचे प्रमाण आणि बाहेर पडणाऱ्या लोहाचे प्रमाण व्यस्त झाले की लोहाची कमतरता येते. पाळीचा अति प्रमाणात रक्तस्राव, प्रसवाच्या वेळीचा रक्तस्राव, मूळव्याधातील रक्तस्त्राव इत्यादी अनेक कारणांमुळे रक्ताचे शरीराबाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामानाने लोहाचा अंतर्भाव कमी पडतो किंवा लोहयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाणे, मूळातच खाण्याचे प्रमाण कमी असणे, पचनाच्या काही तक्रारी असणे इत्यादी अनेक कारणांमुळे लोहाचा शरीरातील अंतर्भाव कमी होतो.
याशिवाय स्त्रियांच्या वयाच्या किंवा जैविक अवस्थेनुसार लोहाची आवश्यकता वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, गर्भावस्थेमध्ये लोहाची आवश्यकता जास्त असते. या सर्वांवर उपाय म्हणजे रक्ताचे शरीराबाहेर जाण्याचे प्रमाण आटोक्यात ठेवणे. उदाहरणार्थ- मुळव्याध, पाळीतील अतिरक्तस्राव यावर उपचार करणे. तसेच आहारामध्ये लोहाचा अंतर्भाव आवश्यकतेनुसार करणे.
उदाहरणार्थ- १) लोहयुक्त पदार्थ आहारात नियमित घेणे. जसे की पालक, तोफू, अंडे, लिव्हर, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, काळ्या मनुका, सोयाबीन, कवचवाले मासे, भोपळ्याचे बी इत्यादी.
२) लोह शरीरात जास्तीत जास्त शोषले जाण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाचा अंतर्भाव नियमितपणे आहारात ठेवावा. जसे की, आवळा, लिंबू, पेरू, संत्री, मोसंबी इत्यादी.
३) लोहयुक्त पदार्थांबरोबरच चहा, कॉफी इत्यादी शोषणास अटकाव करणारे पदार्थ घेऊ नयेत. पदार्थांची निवड तारतम्याने करावी.
B12 जीवनसत्वाची कमतरता
B12 हे मुख्यत: प्राणीज पदार्थांमधून मिळणारे जीवनसत्व. शाकाहारी पदार्थांमधून मिळणारे त्याचे प्रमाण अत्यल्प असते. शोषणास पोषक वातावरण असल्यास जीवनसत्वे शोषली जातात. त्यामुळे जरी आपण योग्य प्रमाणात जीवनसत्वे घेतली तरी ती पूर्णपणे शोषली जातीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे फक्त जीवनसत्वे योग्य प्रमाणात नुसते घेऊन उपयोग नसतो.
आणखी वाचा – ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त आहार विहार
उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तींमध्ये सुद्धा B12ची कमतरता दिसते. जर मांसाहाराच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील किंवा जर सतत पित्ताचे प्रमाण असेल, पित्त कमी होण्याच्या गोळ्या सतत घेण्यात येत असतील.
पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये एकूणच आहार्य B12 चे प्रमाण शरीरात कमी जाते. त्यामुळे ज्या पदार्थांमधून B12 मिळते ते पदार्थ नियमित व आवश्यक प्रमाणात घेणे गरजेचे असते. म्हणून B12 शरीरात जाण्यासाठी पुढील पदार्थ वापरावेत. मटण, लिव्हर, मासे, दूध, दुधाचे पदार्थ, चीज, अंडी, सोयाबीन इत्यादी. ॲनिमियाला लांब ठेवण्यासाठी लोह व B12 या प्रमुख दोन जीवनसत्वांकडे, त्याच्या प्रमाणाकडे, शोषणाकडे नक्कीच लक्ष द्यावे. वेळीच केलेले उपाय पुढचे अनेक अनर्थ टाळू शकतो.