केतकी जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोने सूर्य मोहीम यशस्वी करुन दाखवली. आदित्य यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रोची क्षमता पुन्हा एकदा सिध्द झाली. इस्रोच्या प्रत्येक मोहिमेमध्ये तिथल्या ‘नारी शक्ती’चा अर्थात स्त्री शास्त्रज्ञांचा मोठा वाटा असल्याचं सगळ्यांना माहिती आहे. ‘आदित्य एल-१’च्या प्रक्षेपणातही या प्रकल्पाच्या संचालक निगार शाजी यांचा सिंहाचा वाटा आहे.

आदित्य एल-१ सूर्याचा अभ्यास करणार आहे. या यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या निमित्ताने निगार शाजी यांचं नाव चर्चेत आलं आहे. पण चांद्रयान मोहीम-३ मध्येही त्यांचं अमूल्य योगदान आहे.

निगार शाजी तमिळनाडूच्या. चेन्नईपासून ५५ किलोमीटर दूर असलेल्या तेनकाशीच्या इथल्या एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेख मीरान हे शेतकरी होते, तर आई सैतून बीबी या गृहिणी. सूर्य मोहिमेची कमान यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या शाजी यांनी सेनेगोट्ट्ईच्या सरकारी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार विद्यार्थिनी असलेल्या शाजी यांनी दहावीत जिल्ह्यातून प्रथम, तर १२ वी ला शाळेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी ‘तिरुनावेली गव्हर्नमेंट इंजीनिअरिंग कॉलेज’मधून ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स’मध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर रांचीच्या ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून मास्टर्स पदवी घेतली. १९८७ मध्ये त्या इस्रोमध्ये रुजू झाल्या. तेव्हापासून इस्रोच्या ‘यू. आर. राव सॅटेलाईट सेंटर’च्या त्या एक महत्त्वाचा भाग आहेत. कम्युनिकेशन, सॅटेलाईट, डिझाईन आणि कंट्रोल सिस्टीम अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलं. रिसोर्स सॅट- २ ए, या भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटच्याही त्या सहाय्यक प्रकल्प संचालक होत्या. इस्रोच्या बंगळूरु येथील ‘सॅटेलाईट टेलिमेट्री सेंटर’च्या त्या प्रमुख होत्या. शाजी यांचे पतीही शास्त्रज्ञ आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्यं आहेत. त्यांचा मुलगाही शास्त्रज्ञ असून तो सध्या नेदरलँड्समध्ये वास्तव्यास आहे.

हेही वाचा… आहारवेद : निरोगी शरीरासाठी हळद

संशोधनाच्या क्षेत्रात ३५ वर्षांहूनही जास्त काळ अनुभव असलेल्या निगार शाजी यांचे कंप्रेशन आणि सिस्टीम इंजिनियरिंगवर अनेक शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्या आदित्य एल-१ या मोहिमेवर काम करत आहेत. “ही तर स्वप्नपूर्ती आहे,” अशी प्रतिक्रिया शाजी यांनी आदित्य एल-१ चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर दिली होती. ध्येयाच्या दिशेनं अविरत आणि जिद्दीनं प्रयत्न करत राहिले की कसं यश मिळतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाजी आहेत.

हेही वाचा… राधा-कृष्णाची प्रेमभक्ती, अन् तुम्ही-आम्ही केलं तर पाप?

याच मोहिमेमध्ये आणखी एका नावाची चर्चा होत आहे, ते म्हणजे अन्नपूर्णी सुब्रमण्यम्. आदित्य एल -१ मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या अन्नपूर्णी या केरळमधील पल्लकड जिल्ह्यातील आहेत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स’च्या त्या संचालक आहेत. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत चालवली जाणारी ही एक स्वायत्त संस्था आहे.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: करियर आणि गृहिणीकामातला बॅलन्स कसा साधणार?

भौतिकशास्त्रात ‘पीच.डी.’ असलेल्या अन्नपूर्णी यांनी पल्लकडच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून आपलं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केलं. ‘आय.आय.ए.’मधून त्यांनी पीच.डी. मिळवली. स्टार क्लस्टर (तारेसमूह), ताऱ्यांच्या संरचना, गॅलेक्टिक संरचना, मॅगलेनिक क्लाऊड्स आणि स्टेलर पॉप्युलेशन या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आदित्य एल-१ ला वाहून नेण्यासाठीच्या उपकरणाचं डिझाईन अन्नपूर्णी यांच्या टीमनं तयार केलं. या मोहिमेमुळे पहिल्यांदाच सूर्याच्या अगदी आतील भागही पाहण्यास मदत होणार आहे. अवकाश आणि तारे यांच्याबद्दल लहानपणापासूनच अतीव कुतुहल असलेल्या अन्नपूर्णी यांनी त्याच क्षेत्रात प्रचंड अभ्यास करुन आपलं नाव कोरलं आहे. मोकळं, ताऱ्यांनी चमचमतं आकाश बघण्यासाठी प्रत्येक गाव, शहरामध्ये एकतरी जागा असावी असं त्यांना मनापासून वाटतं. केलेल्या गुंतवणुकीचा किती फायदा होईल याच्या पलिकडे जाऊन विज्ञान आणि त्यातल्या संशोधनाचा विचार व्हावा असं त्यांचं मत आहे. संगीताची वैभवशाली परंपरा लाभलेल्या त्यांच्या घरात आई वडील हे दोघेही संगीतकार. अन्नपूर्णी या स्वत: उत्तम व्हायोलिन वादक आहेत. कर्नाटक संगीताचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आजही संधी आणि वेळ मिळेल तशी त्या संगीताची आवड जोपासतातच. संगीतावर मनापासून जीव असलेल्या अन्नपूर्णी यांनी करिअरसाठी मात्र खगोलशास्त्राची निवड केली.

आपल्या बुध्दिमत्तेच्या, अनुभवाच्या जोरावर देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या, प्रतिष्ठेच्या अशा अंतराळ मोहिमांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम् या आपल्या देशाचा अभिमान तर आहेतच, पण विज्ञान, संशोधन क्षेत्रात पाय रोवून काही तरी नवं करु पाहणाऱ्या लाखो तरुणींसाठी त्या दिशादर्शकही आहेत हे नक्की!

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annapurni subramaniam isro solar women scientist of aditya l1 mission asj
Show comments