मागील लेखात फळं आणि भाज्यांची जी वार्षिक प्रदर्शनं भरवली जातात त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. या लेखात त्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनांचे अनेक विभाग असतात. विभागवार केलेल्या रचनेमुळे एखाद्या विशिष्ट घटकांची साद्यंत माहिती घेणे शक्य होते.
जर फळं, फुलं, भाज्या आणि वृक्ष, वेली यांचं सर्वसमावेशक प्रदर्शन असेल तर प्रकारानुसार विभाग केलेले असतात. मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी असे एक मोठे प्रदर्शन वीर जिजामाता उद्यान म्हणजेच आपली जुनी राणीची बाग जी भायखळ्याला आहे तिथे भरवले जाते. हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असते. एकदा मुख्य प्रदर्शन पार पडल्यावर याच श्रृंखले अंतर्गत मुंबईच्या अनेक उपनगरात छोटी छोटी प्रदर्शनं भरवली जातात. तेथे स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींना वाव दिला जातो. मुलुंडला भरलेल्या एका प्रदर्शनात खऱ्याखुऱ्या पुष्परचनांसोबतच अप्रतिम अशा कृत्रिम फुलांच्या रचनांचीही मांडणी केली होती. या दोन्ही प्रकारच्या रचना बघताना कलाकारांच कसब अगदी थक्क करून सोडतं होतं. अशाच एका प्रदर्शनात मला ड्राय फ्लावर अरेंजमेंट म्हणजेच शुष्क फुले व पाने यांच्यापासून केलेल्या रचना पाीता आल्या होत्या. या सगळ्यातून नकळतच आपल्याला अनेक कल्पना सुचत जातात. आपल्या घरी समारंभाला पुष्परचना करताना त्या राबवता येतात.
आणखी वाचा-समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
पुष्परचनांचा विषय निघालाय तर त्याबद्दल थोडं लिहिते. पूर्वी या रचना करताना केन्झन वापरले जायचे. तळाला लोखंडी चकती असलेले आणि वर अणकुचीदार बारीक दाते असलेले लहान मोठे केन्झन वापरून त्यात फुलं खोचली जायची. त्या रचना अतिशय सुंदर दिसायच्या याबद्दल वादच नाही, पण ती नाजूक फुलं- जी देठाकडून खोचली जायची ती पाहून मनात एक कळ उठायची. जरबेरा, लिली, निशिगंध यांचे मुलायम देठ या टोचण्यांना लावलेले पाहताना कसेसेच होई. ते पाहून मी कधीच हे केन्झन वापरायचे नाहीत असं ठरवूनच टाकलं होतं. मग याला पर्याय काय? तर मऊ माती, दगड, झाडांच्या सुक्या फांद्या, झाडावर उगवणारी शेवाळं अशा गोष्टींचा वापर करायचा. पुढे स्पंज वापरात येऊ लागले आणि मग अधांतरी रचना करता येणं शक्य झालं, तसचं स्पंज ओला करून फुलांना पाणी मिळण्याची सोयही करता येऊ लागली. तरी अजूनही या स्पंजापेक्षाही जपानी पुष्षरचनांमधे जी जुनी झाडांची खोडं वापरली जातात, त्यांच्या सामटीत अलगद अशी जी रचना केली जाते ती मला अधिक भावते. त्यामुळे वनस्पतींना अजिबात इजा पोहचत नाही आणि योग्य तो दृष्यपरिणामही साधता येतो. शेवटी सच्च्या बागप्रेमींला झाडांबद्दल अतीव प्रेम हे असतंच नाही का?
या प्रदर्शनांत एकाच प्रकारच्या झाडांच्या अनेक जाती आपण एकाच वेळी पाहू शकतो. कसं ते उदाहरणानेच पाहूया. समजा आपण इनडोअर प्लांट विभागात गेलो तर तिथे भरपूर इनडोअर प्लांट विविध प्रकारांच्या कुंड्यांमधून लावलेली दिसतील, त्यातही मोठी, छोटी, झुलती, नाजूक असे अनेक प्रकार असतील. पानांच्या रंगातही विविधता असेल. क्रोटनसारखी रंगीत पानांची झाडं असतील तर अरेलिया म्हणजे झिपरीच्या गर्द हिरव्या जाती पाहायला मिळतील. मनीप्लांट आणि त्याचे विविध प्रकार, अळूच्या कुळात मोडणाऱ्या शोभेच्या जातींचे असंख्य प्रकार. नेचे म्हणजे फर्नचे अनेक प्रकार इथे ओळीने मांडलेले असतात.
आणखी वाचा-निसर्गलिपी : प्रदर्शनांचे दिवस
फुलझाडांमधील वैविध्य ही आपल्याला थक्क करून सोडतं. आजकाल ऑर्किड फुलांच्या रचना सर्वत्र केलेल्या आढळतात. यामध्ये बरेच प्रकार असतात- ते इथे सहज बघता येतात. यातील वांडा ही जांभळ्या फुलांची जात आपण नेहमी पाहतो, पण टायगर ऑर्किड- जे अतिशय देखणं असतं, सिंगापूर देशाचं राष्ट्रीय फुलं जे रत्न आसाम, अरूणाचल, भूतान इथल्या जंगलात सापडणारी ऑर्किडस्, वेणी सारखी फुलांची रचना असलेली ऑर्किड अशा नाना जातीं बघायला मिळतात. अनेक प्रकार,रंग वैशिष्ट्ये यांनी सजलेली ही फुलं पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं.
एक एक दालन ओलांडताना नकळत आपण अनुभव समृद्ध होतं जातो. आपलं शिक्षण आपल्याही नकळत होतं राहतं. पुढच्यावर्षी पुन्हा असंच प्रदर्शन पहाताना मागच्या वानसमित्रांची ओळख ताजी होते. त्यांची नावं मनात अधिक पक्की होतात आणि मन नवीन रोपांची ओळख करून घेण्याच्या प्रक्रियेत मन गुंतून जातं.
mythreye.kjkelkar@gmail.com