चित्रपट पहायला जाताना प्रचंड उत्साहात असणारी श्रेया परत आली तेव्हा तिचा मूडऑफ झाला होता. तिने तिच्या आवडीची काॅफी केली आणि एकटीच गॅलरीत जाऊन बसली. तेव्हा तिच्या आईला, राधिकाला लक्षात आलं होतं, की श्रेयाच्या विचारांच्या इंजिनमधे काही गडबड झालीय. राधिकानेही चहाचा कप घेतला आणि ती तिच्याजवळ जाऊन बसली.
श्रेयाला म्हणाली, “हॅलो डाॅटर, काय झालंय? बोला… माझ्याशी बोलल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. सांग पटकन.”
“काही नाही गं आई. आम्ही सिनेमाला गेलो होतो. तो सिनेमा थ्रीडी होता. थ्रीडी सिनेमा बघताना चष्मा लागतोच ना, पण तो चष्मा त्याच तिकिट दरात द्यायला हवा किनई? त्यांनी आमच्याकडून प्रत्येकी वीस रुपये जास्तीचे मागितले.”
“ओह, म्हणून मूड गेलाय. अगं, ठीक आहे ना. तुम्ही सिनेमा एन्जाॅय केलात की नाही ?”
“केला गं, पण किती फसवतात बघ. सिनेमा हाॅलमधे किमान २०० लोक बसतात. दिवसातून त्यांचा ४ वेळा आणि किमान आठ दिवस शो चालतो. त्याप्रमाणे हिशोब केला तर फक्त चष्म्यासाठीचे एक लाख बारा हजार रुपये जास्तीचे पैसे घेतात. हा आकडा मोठा नाही का?”
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: ‘उद्गार’ अर्थात ढेकर
“अगं आपल्याला त्याच्याशी काय देणंघेणं? त्यांचा व्यवसाय आहे ते बघतील. तू कशाला मनाला लावून घेतेस?.”
“ त्यांनी सामान्य ग्राहकांना सरळ सरळ फसवत राहायचं आणि आपण का म्हणून बघत बसायचं?”
“ ए बयो, भांडली बिंडली नाहीस ना तिथे?”
“ भांडले ना, सोडते काय? त्यांना ठणकावून सांगितलं. आम्ही तिकिट काढलंय, चष्मा विकत घेणार नाही. त्यांनी बाहेर जायला सांगितलं. आम्ही आमचे तिकिटाचे पैसे मागितले. ते पैसे देईनात. आम्ही तिथेच थांबलो. आम्हाला चष्मा द्या, म्हणून मागे लागलो. बाकीचे पैसे देत होते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. चष्मा फ्री देईनात आणि तिकिटाचे पैसैही परत देईनात. मग मी जरा आवाज वाढवला. म्हणाले, ‘जोपर्यंत आम्हाला चष्मा मिळणार नाही. तोपर्यंत सिनेमा चालू करू देणार नाही. सिनेमा चालू केलाच तर समोर येऊन दंगा करणार.
“मग..?”
“मग काय, आम्ही असा वाद घालत असतानाच आमच्या बाजूने एक नुकतीच पास आऊट झालेली वकील आणि एक इन्स्पेक्टर जात होते. काहीतरी प्राॅब्लेम झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी प्राॅब्लेम समजून घेतला. त्या माणसाला समजावून सांगितलं. तुम्ही सगळ्यांचे पैसे घेतले आहेत. तुम्ही लोकांना फसवत आहात. दोघांनी त्यांचं आयकार्ड दाखवलं. काही उपयोग झाला तेव्हा पोलीसांनी सिनेमागृहाच्या मालकाशी संपर्क साधला. मालकाला ग्राहक न्यायालयाची थोडी भीती घातली. त्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. सिनेमागृहातील सगळ्यांना चष्म्याचे पैसे परत मिळाले.
“झालं ना मग..”
“अगं, पण अशा फसवणुकीतून हे लोक लाखो रुपये कमवत आहेत. आपल्यासाठी ते वीसच रुपये असतात. पण त्यांची भरमसाठ कमाई होते.”
“पण तुला कसं कळलं की, हे चष्मे तिकीट दरातच उपलब्ध करायला हवेत म्हणून.?”
“अगं परवा काॅलेजमधे ग्राहक हक्क याविषयावर सरांनी माहिती दिली. तेव्हा कुणीतरी सिनेमागृहातील चष्म्यांबद्दल विचारलं होतं. त्याचं उत्तर देताना सरांनी सांगितलं होतं. इतकंच नाही जर सिनेमागृहात बाहेरुन पाणी आणण्यावर बंधन असेल तर सिनेमागृहाने सर्वांना मोफत पाणी दिलं पाहिजे, असाही नियम आहे. आपल्याला याची माहिती नसते. दरवेळी आपण पैसे देतो. सेवा घेतो. बऱ्याचदा फसत राहतो.”
हेही वाचा… चॉइस तर आपलाच: निर्णय घेता येत नसल्याने गोंधळायला झालंय?
“पण, आपली फसगत होते हे लक्षात आल्यावर काय करायचं?”
“ग्राहक तक्रार निवारण केंद्रामधे जाऊन तक्रार द्यायची. मागे एकदा अशाच एका सिनेमागृहाने थ्रीडी सिनेमासाठी चष्म्याचे वेगळे पैसे घेतले होते. त्याची तक्रार ग्राहक न्यायालयात नोंद केली गेली. (केस नंबर – सी सी नंबर २६/२०२३ आणि आदेश दिनांक २१/०७/ २०२३) निकाल देताना न्यायालयाने सांगितलं, की अशा पध्दतीने जास्तीचे पैसे घेणं म्हणजे ग्राहकावर अन्याय आहे. सिनेमागृह असे पैसे घेत असतील तर त्यांनी त्यावर मनोरंजनकर भरणं आवश्यक आहे. जे सिनेमागृह भरत नाहीत. न्यायालयाने त्या सिनेमागृहाला चष्म्याचे पैसे, मानसिक त्रास दिल्याबद्दल १० हजार रुपये भरपाई द्यायला लावली.”
“कसलं इंटरेस्टिंग आहे. थांब, मी माझ्या मैत्रिणींना आधी सांगते. आज त्या सिनेमाला जाणार आहेत. त्यांना यातलं काहीही माहीत नाही.” राधिकाने मैत्रिणीना फोन लावला.
ग्राहक हक्क जाणून घेतले तर छोटी मोठी बचत होते. फसगत झाल्याचं लक्षात आल्यावर जो मानसिक त्रास होतो त्यापासूनही आपली सुटका होते.
(समुपदेशक,सांगली)
archanamulay5@gmail.com