एका प्रसिद्ध टेलिव्हिजन चॅनेलवरील मालिकेतील हा एक सीन. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारी एक्स ही नायिका वाय या कंपनीत काम करत असते. या कंपनीच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांनी दागिने घालणं वर्ज्य होतं. हात-पाय, गळा, बोट या कोणत्याच अवयवात धातू असता कामा नये असा नियम होता. पण नायिकेने मात्र या नियमाला कडाडून विरोध केला. ती म्हणाली मी सगळं काढून देईन, पण सौभाग्याचं लेणं असलेलं माझं मंगळसूत्र देणार नाही. यावरून तिने प्रचंड आरडा-ओरडा केला. जणू काही गळ्यातील मंगळसूत्र काढल्यानंतर लागलीच तिच्या नवऱ्याला तिथं अस्वस्थ वाटणार होतं. तिने कानातले, जोडवी, बांगड्या सगळं काढलं. पण मंगळसूत्र काढायला ती तयार नव्हती. कंपनीच्या विरोधात ती गेल्याने शेवटी तिला नोकरी सोडून द्यावी लागली. तिच्या या निर्णयाचं मालिकेच्या प्रेक्षकांनी प्रचंड कौतुकही केलं. अशाच काही कारणांमुळे ही मालिका टीआरपीतही चांगली होती.

आता मुद्दा दुसरा. ॲपल मोबाईल निर्मितीचं काम तैवानस्थिती कंपनी फॉक्सकॉनकडे आहे. या फॉक्सकॉनचा कारखाना तामिळनाडूत आहे. ॲपल मोबाईल फोन या कारखान्यात तयार होतात. दोन दिवसांपूर्वी असं वृत्त आलं की या कंपनीत विवाहित महिलांना नोकरी दिली जात नाही. खासकरून हिंदू विवाहित महिलांना नोकरी नाकारली जाते. कंपनीच्या या निर्णयामुळे कंपनीवर प्रचंड ताशेरे ओढले गेले. महिला चंद्रावर जाऊन पोहोचल्या तरी विवाहित महिलांना नोकरीसाठी नाकारलं जातं वगैरेही ट्रोल केलं गेलं. शेवटी यासंदर्भात कामगार आणि रोजगार मंत्रालयाने तामिळनाडूच्या या कंपनीकडून अहवाल मागवला. या अहवालातून कंपनीने त्यांची भूमिका स्पष्ट केली. फॉक्सकॉन कारखान्यात सध्या सुमारे ७० टक्के महिला आणि ३० टक्के पुरुष कार्यरत आहेत. तर तामिळनाडू कारखाना हा देशातील महिलांच्या रोजगारासाठी सर्वात मोठा कारखाना आहे आणि एकूण ४५ हजार कामगारांना कंपनीनं रोजगार दिला आहे. तसंच, हिंदू विवाहित महिलांनी सुरक्षेच्या मुद्द्यामुळे गळ्यात कोणत्याही धातूचे दागिने घालू नये असे आधीच स्पष्ट केले होतं. फक्त महिलांनीच नाही तर कोणत्याही व्यक्तीने कारखान्यात काम करताना शरीरावरील धातू काढणे आवश्यक आहे, असं कंपनीने स्पष्ट केलंय. त्यामुळे विवाहित महिलांना नोकरी नाकारली जाते, हा दावा चुकीचा असल्याचं कंपनीने म्हटलंय.

हेही वाचा >> ॲपलमध्ये महिलांना नोकरी नाकारली? कंपनीच्या स्पष्टीकरणात वेगळीच माहिती समोर, वाचा संपूर्ण प्रकरण

मंगळसूत्र सौभाग्याचं अलंकार असेलही. किंवा हिंदू विवाहित महिला सौभाग्याचं अलंकार म्हणून अनेक दागिने परिधान करत असतीलही, परंतु आपण कामाच्या ठिकाणी वावरत असताना आपला धर्म बाजू ठेवून कामाला प्राधान्य देणं हे आपलं कर्तव्य आहे. इतरवेळी हे अलंकार घालून तुम्ही खुशाल मिरवा. पण कामाच्या ठिकाणी कंपनीचे नियम डावलून तुम्ही तुमचे अलंकार अन् सौभाग्य जपत बसलात तर कसं चालेल? अनेक कारखान्यात विविध पद्धतीचं काम सुरू असतं. तांत्रिक कामं सुरू असताना कोणत्याही पद्धतीचे धातू आपल्या आजूबाजूला असणं सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं असतं. काही ठिकाणी केसापासून पायाच्या बोटापर्यंत कर्मचाऱ्यांना आपलं शरीर झाकून ठेवून काम करावं लागतं. ही त्या कामाची गरज असते. याचा अर्थ सौभाग्य दूर लोटण्याशी नसतो. कामाच्या ठिकाणी अंगावरील दागिने बाजूला काढून ठेवल्याने तुमच्या सौभाग्याला कुठेही ठेच पोहोचत नाही. त्यामुळे धार्मिक समजुतीला खतपाणी घालून आस्थापनाविरोधात वागलात तर बेरोजगार राहण्याचीच वेळ प्रत्येकीवर येईल.

हेही वाचा >> सार्वजनिक शौचालयात महिलांकडून पैसे आकारल्यास कारवाई होणार, कुठे झाला नियम? न्यायालयाचं म्हणणं काय?

२१ व्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. अगदी बांधकाम व्यवसायापासून ते कारखान्यात वेल्डिंगचं काम करेपर्यंत सर्वत्र महिला आढळतात. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने महिलांच्या विचारांत आमूलाग्र प्रगती झाली आहे. पण ही प्रगती चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्यासाठीही होणं गरजेचं आहे. गळ्यातील मंगळसूत्र, पायातील जोडवी, हातातील हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचं अलंकार आहेत. हे सौभाग्य तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नक्कीच मिरवू शकता. पण सौभाग्य जपल्याने पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी नोकरी-व्यवसायच करावा लागतो आणि नोकरी व्यवसाय करताना कंपनीचेच नियम पाळावे लागतात. हे नियम पाळताना सौभाग्याचे अलंकार बाजूला ठेवल्याने कोणताही धोका निर्माण होत नाही. हे निदान आजच्या आधुनिक काळातील महिलांनी तरी ध्यानात ठेवावं.