“आई, तू का हट्टीपणा करते आहेस? तुझ्या तब्बेतीला झेपत नाही तर उपास का करतेस? गेले नऊ दिवस तुला मी बघतोय. नवरात्रीचे नऊही दिवस तू उपवास करते आहेस. याचा नंतर तुलाच त्रास होईल ना?”

“अरे, पण मी तुम्हाला कुणाला त्रास देते का? सुरुवातीला दोन-तीन दिवस त्रास होतोच, मग शरीराला सवय लागते. मग त्रास होत नाही, तू माझी काळजी करू नकोस.”

“अगं, तुला त्रास झाला म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही का? म्हणून सांगतोय, याचं अवडंबर करू नकोस. आता वयोमानानुसार हे सर्व करणं होत नाही तर कमी नको का करायला?”

हेही वाचा – Who is Han Kang : मानवी जीवनातील नाजूकपणा मांडणाऱ्या लेखिकेचा सर्वोच्च पुरस्कार, दक्षिण कोरियात साहित्यातील पहिला नोबेल मिळवणाऱ्या हान कांग कोण?

“अरे म्हणजे काय? घरातील कुलधर्म कुळाचार बंद करायचे? घरात नवरात्र बसवायचं नाही? कुमारिका पूजन, भजन हे सर्व इतके वर्षं मी करत आले आहे, ते सर्वच सोडून द्यायचं? तुम्हाला हे सर्व करायचं नाही, म्हणून मला हे सर्व बंद करायला सांगताय तुम्ही. हे सर्व थांबवलं आणि आपल्या कुटुंबावर काही संकटं आलं तर? देवाचा कोप झाला तर?”

शोभनाताई आणि मिलिंद यांचे हे न संपणारे वाद चालू झाले होते. घरातील कुळधर्म, कुळाचार असले की सर्व व्यवस्थितच व्हायला हवं असा शोभनाताईंचा दंडक होता तर मिलिंद आणि त्याची बायको मैथिली यांना या गोष्टी आपल्यावर लादल्या जात आहेत, असं वाटायचं. आईला त्रास होत असतानाही ती सर्व करण्याचा अट्टाहास करते हे योग्य नाही, असं मिलिंदला वाटायचं तर सर्व लोकांनी कौतुक करावं, वाहवा करावी म्हणून सासूबाई समाजाला दाखवण्यासाठी सर्व करतात असं मैथिलीचं मत होतं. हे वाद चालू असतानाच मेघना काकू आल्या होत्या. त्यांना शोभनाताई म्हणाल्या, “ मेघना, आता तू तरी यांना समजावून सांग. मी जिवंत असेपर्यंत माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी करतेय. माझ्या माघारी त्यांनी काय करावं, काय सोडावं हा त्यांचा प्रश्न आहे.”

आता मिलिंदही म्हणाला, “काकू, तू तरी समजावं तिला. ॲसिडिटीचा त्रास असूनही उगाचच उपवास करते. सलग ९ दिवस उपवास तिला या वयात नाही झेपत पण मनावरच घेत नाहीए. मैथिली आणि मी तिला हेच सांगतो की, कोण काय म्हणेल याचा विचार करू नकोस तुझ्या तब्बेतीची काळजी घे. पण ती आमचं काहीच ऐकतच नाहीए.”

मेघनाताईंनी दोघांचंही ऐकून घेतलं आणि मग बोलायला सुरुवात केली. “मिलिंद आणि मैथिली, हे सणवार, कुळधर्म हे आपले संस्कार आहेत. ते घरात करताना घरातील सर्व सदस्य एकत्र येतात. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे सदस्यही या निमित्ताने घराकडे येतात. सर्वजण मिळून काही धार्मिक गोष्टी करतात त्यातूनच घरातील लहान मुलांनाही संस्कार मिळतात. घरातील वातावरण सकारात्मक होतं. केवळ समाजाला दाखवण्यासाठी नाही तर कौटुंबिक नाती सुदृढ होण्यासाठीही हे महत्वाचं आहे. पण शोभना हे ही लक्षात ठेव की कालानुरूप बदलायला हवं. प्रत्येक गोष्ट ही पूर्वीसारखी व्हायलाच हवी असा अट्टाहास नको. देवाला घाबरून काही करायला नको. माझ्याकडून काही चुकलं तर देवाचा कोप होईल, संकटे येतील या गोष्टी मनात कशाला आणायच्या? नवरात्रीमध्ये तू देवीला माता म्हणतेस मग आपल्या लेकराला काही त्रास झाला तर त्या मातेला आवडेल का? मुलानं कोणतंही काम करताना त्याच्याकडून काही चूक झालीच तर आई त्याला शिक्षा करते का? मग देवाचा कोप होईल ही गोष्ट मनातचं का आणायची? आपण मनापासून केलेला नमस्कारही देवाला पुरतो. तुझी श्रद्धा महत्वाची. मुलं त्यांच्या नोकरी व्यवसायात खूप बिझी झालेले आहेत. तू तुझी नोकरी सांभाळून सगळं केलंस, पण आता त्यांच्यापुढे करिअरची वेगळी आव्हाने आहेत. त्यांना या सर्व गोष्टीत लक्ष घालायला पुरेसा वेळ मिळेलच असं नाही. तुझं म्हणणं असतं मी त्यांना त्रास देत नाही, पण तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी होण्यासाठी ते तुला मदत करतात. त्यांची कामं सोडून वेळ देतात, मग त्यांच्यावरही ताण येतो. तू सर्वच सोडून दे, असं मी म्हणत नाही. ते तुला जमणारही नाही, कारण तुझ्या आयुष्याचा पॅटर्न तू ठरवून घेतला आहेस त्यामधून तुला आनंदही मिळतो, पण कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास करणं सोडून दे तुला आत्मिक समाधान कशात मिळणार आहे त्याचा विचार कर.”

हेही वाचा – विजेचा खांब हेच कर्मक्षेत्र असलेल्या हंसा कुर्वे

मेघना काकूंचे बोलणे मंदार आणि मैथिलीला पटले होते. आपण आईला विरोध करायचा नाही आणि जमेल तेवढी मदत करायची असं त्यांनी ठरवलं. शोभनाताईना हे सर्व विचार पचनी पडण्यास नक्कीच वेळ लागणार होता, पण तरीही आपल्या कर्मकांडामुळे मुलांना आणि स्वतःलाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यायचं मात्र त्यांनी निश्चित ठरवलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)