नीलिमा किराणे
सोसायटीच्या ट्रॅकवर अमृता अस्वस्थपणे फिरत होती. गेला आठवडाभर आठवीतल्या शाल्वच्या शाळेच्या सबमिशन्ससाठी अमृता-अनिरुद्धच धावपळ करत होते. ऑफिस सांभाळून हे करताना दोघांची दमछाक होत होती, त्यात परवा कहर झाला. सायन्स प्रोजेक्टची सोमवारी ‘लास्ट डेट’ आहे हे शाल्वला शनिवारी संध्याकाळी आठवलं. मग रात्री मटेरियलसाठी धावपळ, शाल्वला नीट जमेना म्हणून रविवारभर प्रोजेक्ट आई-बाबांनीच केला. मोबाइलवर खेळत शाल्व नुसता शेजारी बसून होता. अमृता भडकली होती.
“नेहमीच कशी तुझी ऐनवेळी धावपळ? आधी नाही सांगता येत?” अमृताचा पट्टा थांबेना तेव्हा शाल्व म्हणाला, “आई, माझा काय दोष? मी तर तुला तेव्हाच प्रोजेक्टची लास्ट डेट सांगितलेली. तू का विसरलीस?”
अमृता बघतच राहिली. ‘याच्या सबमिशनच्या तारखा लक्षात ठेवण्याची जबाबदारी आपलीच?’ आपण काही चुकीचं बोललोय, हे शाल्वच्या लक्षातही आलंही नव्हतं. अमृताला धक्काच बसला. तेव्हापासून ती त्याच विचारांत होती.
तिला समोरच्या इमारतीतल्या अद्वैतची, शाल्वच्या वर्गमित्राची आई येताना दिसली. “हाय, कशी आहेस दीपा? झाली का अद्वैतची सगळी सबमिशन्स? प्रोजेक्ट?” अमृतानं विचारलं.
“प्रोजेक्ट तर अद्वैतनं पंधरा दिवसांपूर्वीच दिलाय. ज्याअर्थी तो काल मॅचला गेला होता आणि माझ्याकडे शंका घेऊन आलेला नाही, त्या अर्थी सबमिशन्सही झाली असणार.” दीपा हसत म्हणाली.
“म्हणजे? तुम्ही मदत नाही करत प्रोजेक्टला?” अमृता आश्चर्यचकित.
“थोडी मदत लागते त्याला, पण त्याचं रोजचं होम वर्क, सबमिशन मी पाहात नाही. शाळेत तो जातो ना? मग ती त्याचीच जबाबदारी नाही का?”
“तू त्याचा अभ्यासही घेत नाहीस?” अमृताचा विश्वासच बसेना.
“पाचवीपर्यंत घ्यायचे. नंतर हळूहळू सोबत बसायचं कमी केलं. अधूनमधून प्रश्नोत्तरं घेते, अडलेलं शिकवते. प्रोजेक्टबद्दल चर्चा, सामान आणून देणं हे आम्ही करतो. प्रत्यक्ष काम मात्र त्याचंच.”
“गुणी आहे गं अद्वैत.”
“छे गं, गुणी कुठला? ‘होमवर्क टाळतो’ म्हणून टीचरनी बोलावलं होतं मागे एकदा. तेव्हा ते पेंडिंग काम पूर्ण करायला आम्ही त्याला मदत केली. नंतर शांतपणे सांगितलं, ‘तू आता लहान नाहीस. शिकायचं तुला आहे. शाळेच्या कामांची आणि त्याच्या चांगल्या-वाईट दोन्ही परिणामांची जबाबदारी तुझी आहे. त्यासाठी आम्हाला गृहीत धरू नकोस. अडचण आली तर आम्ही आहोत, पण पुन्हा असं टीचरना भेटायला येणार नाही.’ तेवढा मेसेज पुरला. त्याचा तो स्वतंत्रपणे करायला लागला. होमवर्क टाळतो कधीमधी, पण तेवढं चालतं या वयात.” दीपा हसत म्हणाली.
आपल्याला नेमकं काय खुपतंय ते अमृताला लख्खच झालं. ‘तू कसाही वाग, आम्ही निभवायला आहोतच,’ असा मेसेज आपण शाल्वला देत राहिलोत. लहानपणी उशिरा उठायचा, रिक्षाकाका निघून जायचे. तेव्हा त्याच्या आळशीपणाबद्दल रोज आरडाओरडा करायचो, पण शाळेत वेळेवर पोचवत राहिलो. ‘रिक्शा गेली तर आम्ही पोहोचवणार नाही’ अशी जबाबदारीची जाणीव शाल्वला कधी ठामपणे दिली नाही. एक-दोनदा रिक्षा चुकल्यामुळे शाळा बुडली असती, टीचरची बोलणी बसली असती तर आळशीपणा तेव्हाच संपला असता. अजूनही आपण त्याच्या वह्या पूर्ण करतो, खोटी सिक-नोट देतो. त्यामुळे, आपली शाळा ही डायरेक्ट जबाबदारी आईबाबांची आहे, अगदी सबमिशन डेट लक्षात ठेवण्यापर्यंत असं गृहीतच धरलं त्याने. चांगलीच गडबड झाली आपल्याकडून.’
काय बदलायला हवं ते अमृताला नेमकं लक्षात आलं. ‘यापुढे आरडाओरडा करायचा नाही. ‘आई-बाबा ओरडले तरी करतात सगळं’, असा जो मेसेज शाल्वने घेतलाय, तो बदलायचा चॉइस आपल्याकडे अजूनही आहे. ‘आई-बाबा हल्ली रागवत नाहीत, पण आपल्या शाळेची आणि आळशीपणाची जबाबदारीही घेत नाहीत, ती आपल्यालाच घ्यावी लागते.’ हा मेसेज आता जायला हवा. यापुढे त्याला मदत करायची. मात्र त्याच्या कुठल्याही वागण्याच्या परिणामांची जबाबदारी त्याचीच असेल.’
आपला नवा ‘चॉइस’ अनिरुद्धसोबत शेअर करायला अमृता घराकडे वळली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com