मी आज २६ वर्षांची झाली. घरी तसंच नातेवाईक, मित्र-मैत्रिणी मला सतत एकच प्रश्न विचारतात काय ग लग्न कधी करतेस? अजून किती वेळ घेणार आहेस? लग्न वेळेतच झालेले चांगलं…! उगाच लांब लांब ढकलू नये, असे एक ना अनेक सल्ले माझ्याकडे कायमच सुरु असतात. अशातच काल आमच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला पाहण्यासाठी स्थळ आले होते. कांदेपोह्यांचा कार्यक्रमही पार पडला. आधी दोघांची मनं जुळली आणि मग पत्रिका…पण अचानक एका गोष्टीवर त्यांची गाडी अडकली आणि ती म्हणजे मुलाचं घरं… मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला तुझे स्वत:चे घर आहे का? असा प्रश्न विचारला. त्याने नाही उत्तर दिले आणि क्षणार्धात सर्वच बिनसलं…!
माझ्या शेजारी राहणारी दीप्ती, तिचं वय साधारण २८; ती बँकेत चांगली नोकरी करते. मॅनेजर वगैरे पोस्टला असावी… काही दिवसांपासून अनेक स्थळं तिला पाहायला येतात. दिसायला गोरी गोमटी, उंचीही व्यवस्थित, नाकी-डोळीही अगदी नीट… पण काही केल्या तिचे लग्नच जमेना. काल तिला सहज गच्चीवर फिरताना प्रश्न विचारला, काय ग दीप्ती काल तुला मुलगा बघायला आलेला ना… मग काय ठरलं तुमचं? बरा वाटतं होता तो… त्यावर तिने सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. अगं तो मुलगा एकुलता एक होता खरा पण त्याच्याकडे स्वत:च घरंच नव्हतं. मग मी लग्न मोडलं, असे तिने सांगितल्यावर मला ते ऐकून धक्काच बसला. या निमित्तानेच तिच्यासारख्या लाखो मुलींना पत्र लिहावं असं वाटलं.
आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!
हल्ली लव्हमॅरेज, लव्ह कम अरेंज मॅरेज अशाच पद्धतीने फारशी लग्न पार पडतात. मुलं-मुली भेटतात, मैत्री होते, प्रेम होते आणि मग ते लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतात. पण हल्ली लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज… लग्न मोडण्याचे एक कारण कॉमन झालं आहे ते म्हणजे मुलाचं स्वतंत्र घर… आज माझं वय २६ वर्ष आहे. मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून निश्चितच काही तरी अपेक्षा आहेत. पण त्याचं स्वत:च घर असावं असं अजिबातच वाटत नाही.
माझ्या अनेक मैत्रिणींही या लग्नाच्या वयात आल्या आहेत. येत्या दोन तीन वर्षात त्या लग्नही करतील. पण त्यांच्या एकंदर अपेक्षा पाहून त्यांना मुलगा हवाय की पैशाचं एटीएमच हेच मला कळत नव्हतं. मला हवा तसा मुलगाच सापडत नाही. त्यांना धड कमावायची अक्कलही नसते, तरी लग्न करायला धावतात. त्यांचे असणारे पॅकेज हे माझ्या शॉपिंगच्या खर्चाच्या रकमेऐवढे असते. त्या मुलाचे स्वत:चे घर नाही. मी त्याच्या आई-वडिलांबरोबर तडजोड करुन घेणार नाही. मला माझे वेगळे घर हवेच आणि ते त्याने लग्नाच्या आधीच घेतलेले असावे, असा अनेक अपेक्षा मुली तोंड वर करुन सांगतात.
आणखी वाचा : तुमच्यासाठी ‘महिला’ म्हणजे प्रसिद्धीचं खेळणं आहेत का?
एक मुलगी असूनही मला या सर्व मुलींचा भयंकर राग येतो. तुम्ही ज्या मुलाकडून या अपेक्षा ठेवता, त्यांची पूर्तता तुम्ही किती करता? असा प्रश्न मला या अशा मुलींना विचारावासा वाटतो. आज त्या मुलाचे पॅकेज कदाचित तुमच्या पॅकेज एवढे नसेलही, पण तो तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवायाची खात्री देतोय, याची कदर तुम्हाला का असू नये? जर उद्या एखाद्या लाखभर रुपये पॅकेज असलेल्या मुलाने तुम्हाला धोका दिला तर मग तुम्ही आयुष्यभर रडत बसणार का?
इतकंच नव्हे तर हल्ली अनेक मुली या लग्न झाल्यानंतर वेगळं राहू असा तगादा मुलांपुढे लावतात. मी तुझ्या आई-वडिलांबरोबर राहणार नाही, त्यांच्यासाठी मी काहीही करणार नाही. पण तू मात्र माझ्या आई-वडिलांना बघायचं. त्यांच्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची, अशी अपेक्षा मुली मुलांकडून करतात आणि तिथेच त्या फसतात. आज ज्या प्रकारे वयाची २५-२६ वर्षे तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबर राहत आहात, तसेच तो देखील राहतोय. त्यामुळे आपल्या आई वडिलांप्रमाणेच जर तुम्ही त्यांना स्थान दिलात, तर ते कधीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत. उलट तुमचे लाडच करतील.
आणखी वाचा : आलियाला लग्नाआधीच गरोदर म्हणणाऱ्या ट्रोलर्सना चपराक
आता राहिला प्रश्न मुलाच्या स्वतंत्र घराचा…. मुलं साधारण २७ किंवा २८ वय सुरु झाले की लग्न करतात. मात्र यावेळी प्रत्येक मुलीचे आई-वडील आणि मुलगी स्वत: त्याला एक प्रश्न विचारते आणि तो प्रश्न म्हणजे तुझं वेगळं घर आहे का? यावर मुलाने नकार दिला तर मात्र ते लग्न मोडलं जातं. पण हा प्रश्न विचारणाऱ्या मुलींना मला एक थेट प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आज तुम्ही त्या मुलापेक्षा जास्तच कमावता, तुमची पोस्टही चांगली असते मग तुम्ही मुली तुमचे स्वत:चे घर का घेत नाही? पैसा, हुद्दा या सर्वात पुढे असणाऱ्या प्रत्येक मुलींला मुलाचेच घर असावे अशी अपेक्षा का असते? आज तुम्हीही नोकरी करता, मग तुम्ही घर घेण्याची हिंमत का करत नाही?
त्या घरात तुम्ही दोघेही राहणार असता, मग तुम्ही हे का करत नाहीत? उद्या त्या घरावर हक्क सांगताना तुम्ही पुढेपुढे करणार आणि जेव्हा ते घर घ्यायची वेळ असेल तेव्हा मात्र तुम्ही ‘तू घरं घे’ असं सांगणार? हे कितपत योग्य आहे.
आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र
तुम्ही ज्या वयाचे असता, त्याच वयाचा समोरचा मुलगाही असतो. या वयात तुम्ही तुमचं घर घेत नाही, तर मग मुलाने त्याचे घर घ्यावे, अशी अपेक्षा तरी का ठेवता? या उलट तुम्ही एक समजुतदार जोडीदार होऊन त्याला समजून का घेत नाही? आज तुझे स्वतंत्र घर नसेलही आपण उद्या लग्न झाल्यावर एकत्र मिळून वेगळे घर घेऊया असा विश्वास तुम्ही त्याला सहजच देऊ शकता. यामुळे तुम्ही एक जोडीदार म्हणून किती समजूतदार आहात, याची खात्रीही त्याला पटते. बरं आज ना उद्या तो मुलगा जेव्हा त्याचे घरं घेईल तेव्हा निश्चित त्याच्या डोळ्यात एक वेगळा आत्मविश्वास असेल आणि त्याला तुम्ही चांगल्याअर्थी कारणीभूत असाल. किती छान गोष्ट असेल ही!
कारण मुलं कितीही समजूतदार असली तरी ती मनाने फार हळवी असतात. जसं मुलींना लग्न झाल्यावर सासरी जाण्याचे दडपण असतं, तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त दडपण हे मुलांना असतं. त्यांच्याच कुटुंबात एक नवीन मुलगी समाविष्ट होणार असते, तिला जमेल ना, तिचे दुखणे-खुपणे, रागावणे, अडी-अडचणी समजून घेणे या सर्वच गोष्टी मुलं निमूटपणे करत असतात. याबद्दल त्यांची काडीमात्र अपेक्षा नसते. पण जर तुम्ही त्याला स्वतंत्र घर घेण्यासाठी जबरदस्ती केली तर मात्र त्याचे आणि तुमचे नाते कधीच बहरणार नाही. त्यामुळे मुलाची संपत्ती, स्वतंत्र घर याकडे पाहण्यापेक्षा त्याच्या मनाच्या श्रीमंतीकडे पाहणे जास्त गरजेचे आहे, असे मला तरी वाटते.