खूप दिवसांनी सायलीला फोन केला होता. आम्ही चांगल्या मैत्रिणी, पण गेले ४-५ महिने आमचं बोलणंच झालं नव्हतं. तसं तिचं लग्न झालेलं आणि ती संसारात रमली होती आणि मी माझ्या कामात व्यग्र असायची. पण आज तिला फोन करायचं ठरवलंच. तसा तिला मेसेज केला आणि संध्याकाळी फोन केला. एकमेकींच्या तब्येतीची विचारपूस करून झाली, काय चाललंय, कसं चाललंय याच्या अपडेट्स घेऊन झाल्या. मग म्हटलं काय गं, तुझ्या सासूबाई कशा आहेत? ती लगेच म्हणाली, ‘अगदी अंकिता लोखंडेच्या सासूसारख्या’. सायलीकडून मला हे वाक्य अपेक्षितच नव्हतं.
सायलीचं बोलणं ऐकून मला अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सासू म्हणजेच विकी जैनची आई रंजना जैन यांचे गेल्या ३-४ दिवसातले सगळे व्हिडीओ आणि मुलाखतीतलं त्यांचं बोलणं आठवलं. रंजना जैन फॅमिली वीकमध्ये ‘बिग बॉस १७’ च्या घरात गेल्या होत्या आणि तिथे त्या सुनेला जे बोलल्या ते आठवलं. पतीला असं कोणी मारतं का? विकीच्या वडिलांनी तुझ्या आईला फोन करून विचारलं की, तुम्ही तुमच्या पतीला असं मारायच्या का? तुमची लायकी आहे का? मुलाचं लग्न अंकिताशी लावून दिलं कारण ती खूप लोकप्रिय आहे, तिच्यामुळेच विकी इथपर्यंत पोहोचू शकला. सामान्य मुलीशी लग्न करून दिलं असतं तर तो इथवर येऊ शकला नसता. सुनेवर खूप पैसा खर्च करावा लागतो, तिचे नखरे उचलावे लागतात, असं बरंच काही त्या बोलल्या होत्या. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोलही केलं गेलं. अनेक अभिनेत्रींनी रंजना जैन यांच्यावर टीका केली होती.
मला हे सगळं आठवलं आणि मी शांत झाले. तिकडून सायली म्हणाली, ‘अगं..कुठे हरवलीस..’ म्हटलं ‘काही नाही’. ती म्हणाली, ‘मला माहितीये तू काय विचार करतेय. खरं सांगू का, तर मला तर खात्री पटलीय की तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी असलात तरी सासुरवास तुम्हालाही चुकलेला नाही. अर्थात माझ्यासारख्या कित्येक सामान्य मुलींना सहन करावा लागतो, पण इथे तर अंकिता लोखंडेबरोबरही तेच घडतंय. घरोघरी मातीच्या चुली.’
सायलीशी बोलणं झालं आणि फोन ठेवला. पण माझ्या डोक्यातून अंकिताच्या सासूबाई जाईनात. आपली सून लोकप्रिय आहे, तिचे खूप फॉलोअर्स आहेत, तिला लोक मानतात, तिचं अनुकरण करतात, तिने स्वतःच्या कामातून लोकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. या सगळ्या गोष्टींची जाणीव असूनही अंकिताच्या सासूबाईंना नॅशनल टेलिव्हिजनवर हे सगळं बोलताना कोणताच विचार केला नाही? उद्या सून त्या बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर आपण जे बाहेर बोलतोय ते बघेल आणि त्याचा आपल्या नात्यावर, आपल्या मुलाच्या संसारावर परिणाम होईल याचा विचारही त्यांनी केला नसेल का? पती देव आहे, असं त्या अंकिताला बोलल्या खऱ्या पण आपला मुलगा या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर आपल्या सूनेचा वारंवार अपमान करतोय, तिला नको नको ते बोलतोय हे त्यांना दिसलं नसेल का? सूनेच्या संस्काराविषयी तिच्या आईला फोन करून विचारण्याआधी आपण आपल्या मुलाला हेच संस्कार दिलेत का? असा प्रश्नही त्यांच्या मनाला शिवला नसेल का?
अंकिताच्या सासूबाई पाहिल्या अन् मालिकेतील ती खाष्ट सासू आठवली. अगदी तसंच वागणं, तसंच बोलणं. मालिकेतील पात्रं काल्पनिक असतात, पण ती समाजातील वास्तव मांडणारी असतात हेही खरंय. अंकिता लोखंडेच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतही तिची सासू खाष्ट दाखवण्यात आली होती, ती मालिका होती आणि इथे मात्र खऱ्या आयुष्यातही सासू तशीच. काही वेळ यावरच विचार करत बसले होते, तितक्यात आईने वहिनीला आवाज दिला. ‘अगं तुला चहा केलाय, घे’. हे ऐकताच मला सायलीचं म्हणणं आठवलं, ‘घरोघरी मातीच्या चुली’. पण इथे परिस्थिती वेगळी होती, याचं मनोमन समाधानही वाटून गेलं, अपवादही असतातच की! आणि विज्ञानात म्हणतात, अपवादानेच तर नियम सिद्ध होतो!