डॉ. किशोर अतनूरकर
सोनोग्राफी तंत्रज्ञान विकसित झाल्यापासून त्याद्वारे गर्भाशयातील लहानातली लहान गाठ सहज दिसू शकते. पण लगेच ती कर्करोगाची आहे, असा अर्थ काढावा का? नसेल तर ती कसली असते गाठ?
गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांच्या प्रमाणात अलीकडे खूप वाढ झाली आहे त्याची विविध कारणं आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे गर्भाशयात असलेली गाठ. ज्याला वैद्यकीय परिभाषेत फायब्रॉईड ( Fibroid ) असं म्हणतात. त्या गाठीमुळे काही त्रास नसल्यास त्याची काहीही आवश्यकता नसते.
हेही वाचा >>> Women’s Day 2024 : जागतिक महिला दिनासाठी भेटवस्तू शोधताय? मग पाहा या भन्नाट गिफ्ट आयडिया…
एका स्त्रीच्या अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तपासून गोळ्या लिहून दिल्या. तिने त्या घेतल्या, पण पोटात दुखायचं फारसं कमी झालं नाही म्हणून ती पुन्हा त्याच डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी परत तपासून ‘मुतखडा’ असावा असं तात्पुरतं निदान करून तिला सोनोग्राफी करण्यास सांगितलं. सोनोग्राफीच्या रिपोर्टमधे मुतखडा आढळला नाही, पण सोनोग्राफी करताना त्या डॉक्टरांना गर्भाशयात एक छोटी गाठ आहे असं लक्षात आलं, तसं त्या डॉक्टरांनी रिपोर्टमधे नमूद केलं. सोनोग्राफीचा रिपोर्ट तिने पहिल्या डॉक्टरला दाखवला. तो रिपोर्ट पाहून, ‘मुतखड्याची शंका होती म्हणून आपण सोनोग्राफी केली, मुतखडा आढळून आला नाही, ते ठीक आहे. मी तुम्हाला वेगळ्या गोळ्या लिहून देतो, त्यानं तुमचं पोटात दुखायचं कमी होईल.’ असं डॉक्टरांनी सांगितलं. ती रुग्ण सुशिक्षित असल्याने तिने रिपोर्टमधे नमूद केलेल्या गर्भाशयातील गाठीबद्दल डॉक्टरांना विचारलं, “डॉक्टर, माझं पोट या गर्भाशयात असलेल्या गाठीमुळे तर दुखत नसेल? ती गाठ कर्करोगाची नसेल ना? या गाठीसाठी गर्भाशय काढून तर टाकावं लागणार नाही ना?”
डॉक्टर म्हणाले, “तुमची शंका रास्त आहे, परंतु तुमच्या पोट दुखण्याचा आणि सोनोग्राफीत दिसणाऱ्या या गाठीचा काही एक संबंध नाही. सोनोग्राफी करताना अशी गाठ आहे, असं त्या डॉक्टरला दिसलं म्हणून त्यांनी ते रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे इतकंच.’
“ठीक आहे, डॉक्टर,” असं म्हणून ती घरी गेली, परंतु तिच्या डोक्यातून हा विचार जाईना. आपल्या गर्भाशयात गाठ आहे, आज ती गाठ आकाराने लहान आहे, पण उद्या ती वाढली तर? काही प्रॉब्लम तर होणार नाही ना, भविष्यात त्या गाठीचं रूपांतर कर्करोगात झालं तर? या विचाराने ती बेचैन झाली.
हे हिच्याच बाबतीत झालंय असं नाही, अनेकींच्या बाबतीत होतं. असं अचानकपणे लक्षात आलेल्या गाठीचं करायचं तरी काय? अशा फायब्रॉईडच्या गाठी कशामुळे होतात? मी तांबी ( कॉपर-टी ) बसवलेली आहे, त्यामुळे तर गर्भाशयात गाठ तयार झाली नसेल ना? ती गाठ औषधोपचाराने विरघळून जाईल का? तुमच्याकडे औषध नसेल तर मग आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीचं औषध घेऊ का? शस्त्रक्रिया करून ती गाठ काढूनच टाका डॉक्टर. फक्त गाठच काढणार की गर्भाशयही काढावं लागणार आहे? अशासारखे अनेक प्रश्न गर्भाशयात गाठ आहे असं लक्षात आल्यानंतर अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पडतात. त्यांच्या या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देणं हे डॉक्टरचं काम आहे, जेणेकरून त्यांच्या मनातील भीती नाहिशी होईल.
हेही वाचा >>> लग्नात Moye Moye गाणं ते बायकोच्या ताटाखालचं मांजर बनणं? Wife jokes खरंच विनोदी आहेत का?
स्त्रियांच्या प्रजननसंस्थेमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरके (Hormones) कार्यरत असतात. ही संप्रेरके तयार होण्याच्या प्रक्रियेत बिघाड झाला अथवा या संप्रेरकांचा गर्भाशयाच्या स्नायूंवर होणाऱ्या परिणामात काही नैसर्गिकरित्या चूक झाली तर गर्भाशयात फायब्रॉईडच्या गाठी तयार होतात. सोनोग्राफीचं तंत्रज्ञान विकसित झाल्यापासून गर्भाशयातील अगदी १ सेंमी इतक्या लहान आकाराची गाठ देखील लक्षात येऊ शकते. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये गाठ आहे असं दाखवून देण्यात आलं तरी काळजी करण्याचं कारण नसतं. त्या गाठी लगेच काढून टाकाव्यात असंही नसतं. गाठ किंवा गाठी गर्भाशयाच्या कोणत्या भागात आहेत. गाठ एक आहे की अनेक?, रुग्णाला मासिकपाळीत होणाऱ्या जास्तीचा रक्तस्त्राव आणि असणाऱ्या वेदना गाठीमुळेच आहेत का, की या त्रासाची काही अन्य कारणं आहेत, रुग्णाचं वय, तिला मूल, मुलं आहेत किंवा नाहीत, भविष्यात तिला मूल व्हावं अशी इच्छा आहे का, या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून शस्त्रक्रिया करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेतला जातो.
फायब्रॉइड्सच्या गाठी सहसा कर्करोगाच्या नसतात. फायब्रॉईडच्या गाठीचं कर्करोगामध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण नगण्य आहे. गाठ छोटी असेल आणि त्यापासून काही त्रास नसेल तर ती काढण्याची गरज नाही. उगाच कशाला रिस्क घेता म्हणून डॉक्टर गर्भाशय काढण्याचा सल्ला देत नाही, उलट रुग्णाला धीरच देतात. रुग्णानेही त्याचा ताण घेऊ नये. डॉक्टरांना शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यास भाग पडू नये.
फायब्रॉईडच्या गाठी कमी होण्याच्या गोळ्या उपलब्ध आहेत, परंतु त्याचा अजून सर्रास उपयोग सुरु झाला नाही, कारण गोळ्यांनी गाठी कमी होतीलच, असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्यामुळे रुग्णांनी त्याचा फार ताण घ्यायची गरज नाही. दरवर्षी काही महत्वाच्या टेस्ट करत राहा. त्याने आरोग्य नक्कीच चांगलं राहील.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत atnurkarkishore@gmail.com