स्नेह राणाने खेळायला सुरुवात केली तेव्हा उत्तराखंडची वेगळी अशी क्रिकेट असोसिएशन नव्हती. त्यामुळे स्नेहला तिचे कोच नरेंद्र खेळण्यासाठी हरियाणाला घेऊन गेले. तिथं तिला अंडर-१९ टीममध्येही फारशी संधी मिळाली नाही. मग त्यांनी पंजाब टीममध्ये तिला जागा मिळू शकेल का यासाठी प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या संधीचं स्नेहनं सोनं केलं आणि उत्तराखंडची ही मुलगी पंजाबच्या टीमची कर्णधार बनली. त्यानंतर सीनियर टीम, रेल्वे आणि भारत ए टीमचीही ती कर्णधार बनली आणि आपल्या टीमला अनेक मॅचेस जिंकून दिल्या. पण २०१६ मध्ये श्रीलंकेत एका मॅचदरम्यान तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि जवळपास ५ वर्षांसाठी तिचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं करियर ठप्प झालं. तिच्यासारख्या खेळाडूसाठी ही सक्तीची विश्रांती खूप अस्वस्थ करणारी, निकाश करणारी होती. पण त्यातूनही ती बाहेर पडली आणि स्थानिक क्रिकेट खेळत राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या टीम इंडियानं मिळवलेल्या टी-२० विश्वचषकाचा जल्लोष सुरूच आहे. हाच आनंद द्विगुणित करणारी एक बातमी महिला क्रिकेटच्याच क्षेत्रातून आली आहे. महिला क्रिकेट संघातली स्पिनर स्नेह राणा हिनं कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुध्दच्या क्रिकेट सामन्यात ही अफलातून कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना तर जिंकला आहेच, पण त्याचबरोबर महिला कसोटीत १० विकेट्स घेणारी स्नेह राणा ही पहिली भारतीय फिरकीपटू म्हणजे स्पिनर ठरली आहे, तर एकूणात दुसरी भारतीय गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा >>> सोलो ट्रॅव्हलर आहात? एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला ‘हे’ सहा नियम माहितच असायला हवेत!

या दमदार कामगिरीनंतर स्नेह राणाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. हा विक्रम करणारी स्नेह राणा मूळची डेहराडूनची. डेहराडूनच्या सिनोला गावामध्ये तिचं बालपण गेलं. वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून गल्लीतल्या मुलांबरोबर ती क्रिकेट खेळायची. खरं तर तिच्या वडिलांना मुलींनी क्रिकेट खेळलेलं अजिबात आवडायचं नाही. पण मनापासून क्रिकेट आवडणारी स्नेह तिच्या गल्लीतल्या मुलांच्या टीममधली फेवरेट खेळाडू होती. लहानपणापासूनच स्नेह इतकं छान क्रिकेट खेळायची की तिच्या गावातल्या मुलांच्या टीममधून तिला मॅचेस खेळण्यासाठी घेऊन जायचे. तिच्या आईवडिलांनी स्नेह किंवा तिच्या बहिणीवर कोणतीही बंधनं घातली नव्हती. पण स्नेह मॅचेससाठी जेव्हा जायची तेव्हा नातेवाईक किंवा शेजारी नावं ठेवायचे, इतक्या लांब मुलीला असं कुणाबरोबरही काय पाठवता असं म्हणायचे. गंमत म्हणजे आता तेच लोक ही आमची भाची आहे, पुतणी आहे, शेजारची मुलगी आहे असं अभिमानाने सांगतात. तिच्या वडिलांचं २०२१ मध्ये निधन झालं.

तिनं खेळायला सुरुवात केली तेव्हा उत्तराखंडची वेगळी अशी क्रिकेट असोसिएशन नव्हती. त्यामुळे स्नेहला तिचे कोच नरेंद्र खेळण्यासाठी हरियाणाला घेऊन गेले. तिथं तिला अंडर-१९ टीममध्येही फारशी संधी मिळाली नाही. मग त्यांनी पंजाब टीममध्ये तिला जागा मिळू शकेल का यासाठी प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या संधीचं स्नेहनं सोनं केलं आणि उत्तराखंडची ही मुलगी पंजाबच्या टीमची कर्णधार बनली. त्यानंतर सीनियर टीम, रेल्वे आणि भारत ए टीमचीही ती कर्णधार बनली आणि आपल्या टीमला अनेक मॅचेस जिंकून दिल्या. पण २०१६ मध्ये श्रीलंकेत एका मॅचदरम्यान तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि जवळपास ५ वर्षांसाठी तिचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं करियर ठप्प झालं. तिच्यासारख्या खेळाडूसाठी ही सक्तीची विश्रांती खूप अस्वस्थ करणारी, निकाश करणारी होती. पण त्यातूनही ती बाहेर पडली आणि स्थानिक क्रिकेट खेळत राहिली. या मेहनतीचं फळ म्हणजे तिला इंग्लंडविरुद्ध खेळत असलेल्या टीममध्ये स्थान मिळालं. त्यातही तिनं आपली उत्तम कामगिरी केली. भारतीय टीमला फॉलोऑन मिळाला होता पण स्नेहनं १५४ बॉलमध्ये ८० धावा केल्या आणि आपल्या टीमला नामुष्कीतून बाहेर काढलं. मॅच ड्रॉ झाली. आता ६ मार्च रोजी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तिनं आपली भूमिका चोख पार पाडली. नाबाद ५३ धावा करत टीमचा स्कोअर २५३ रन्सपर्यंत पोचवला आणि त्यानंतर २ विकेट्सही घेतल्या. या सामन्यानंतर स्नेह खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.

हेही वाचा >>> गर्भारपणात ‘बीपी’ वाढलंय?

चेन्नईत झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यातल्या कामगिरीनंतर तिला प्लेयर ऑफ द मॅच हा किताब देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतरची स्नेहची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. “मला खूप फ्रेश वाटतंय. मला माझ्या टीमच्या विजयात काहीतरी योगदान देता आलं हेच खूप छान वाटतंय, असं ती म्हणाली होती. स्नेह राणाला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. एकेकाळी तिच्या गावात फक्त मुलगेच क्रिकेट खेळायचे. पण स्नेहमुळे बराच बदल झाला आहे. ती मॅचेस खेळल्यानंतर गावी जाते, तिथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलींशी बोलते, त्यांच्या अडचणी समजून घेते. एकेकाळी जिथे माती बाजूला करून तात्पुरतं पिच बनवून मुलांच्या संघात एखादी मुलगी असं क्रिकेट खेळलं जायचं तिथे आता मुलींच्या स्वतंत्र टीम आहेत. स्नेहनं तिच्या गावातल्या कितीतरी मुलींना तिनं स्वप्नं पाहायला शिकवलं आहे. त्यामुळेच मुलींचे पालक आता त्यांच्या हातात बॅट ठेवून स्नेह दीदीसारखं होण्याचा आशीर्वाद देत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, हे तिचं योगदान अमूल्य आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about inspiring career journey of woman cricketer sneh rana zws
Show comments