अर्चना मुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात कामाला येणाऱ्या बायांचं आणि घरातल्या बाईचं नातं किती का घनिष्ट असो, तिने रजा मागितली की हिचा पार चढतोच चढतो. त्यामागे कारणं आहेतच, पण द्यायला नको का रजा गरज असते तेव्हा?

“वैनी, पुढच्या आठवड्यात तीन दिवस मी येणार न्हाई.” “अगं पण, मागच्याच महिन्यात सुट्टी घेतलीस ना? सारखी काय गं सुट्ट्या घेतेस तू?” “वैनी, मागल्या येळी देवाला गेले होते. आता सासू पडली पाय घसरून. माझा नवरा गेला तवा तिनंच मला सावरलं. लेकीचं लगीन तिनंच करून दिलं. मला तिला बघाय नको?” “जरा पाहुणे येण्याची कुणकुण लागली तर लगेच सुट्टी घेतेस. कसं कळतं तुला काय माहीत? तू अशी का वागतेस? माझ्या कामाच्या वेळेतच तुला सुट्टी का हवी असते? परत अशी सुट्टी मागितली तर पुढच्या पगारात पैसेच कट करणार म्हणजे तुला कळेल?” “वैनी, लई गरज आहे आत्ता म्हणून मागितली सुट्टी. नाहीतर कामाच्या बाबतीत काय तक्रार हाय का?. तुमच्या सासूवानी आणि माझीपन सासू हाय ना. वैनी जावं तर लागणारच.”

हेही वाचा >>> आहारवेद : ई-जीवनसत्वयुक्त मसूर

सरिता वहिनी आणि त्यांची मोलकरीण सावित्री यांच्यातील हा वादातीत संवाद ‘वर्क फ्राॅम होम’ नोकरी करणाऱ्या वरुणने, तिच्या लेकाने ऐकली. तो बाहेर आला. खरं तर सावित्री अनेक वर्ष त्यांच्या घरी कामाला आहे. बाकी सगळं ठीक असतं. पण तिने रजेचा विषय काढला की आई बिथरते, हे त्याला माहीत झालं आहे म्हणून आईची समजूत काढण्याच्या सुरात म्हणाला. “आई, मी घरातच आहे. हवी तर तुला सगळी मदत करतो. सावित्री मावशीला सुट्टी देऊन टाक.” “नाही देणार. तू मधे पडू नकोस. तिने बदली बाई द्यावी मग जावं हवं तर. तिला आठवड्याला सुट्टी घे. असं कितीवेळा सांगितलंय. पण ते नाही ऐकणार. नको त्यावेळी हवी असते हिला सुट्टी.” “आई, फक्त तीन दिवसांचा प्रश्न आहे. आणि गरजेला मागतेय ना. तू काहीही करू नको. मी करेन सगळं.” “वैनी, तुम्ही सुट्टी न्हाई म्हणलात तरी मी काय येणार न्हाई. मला जमणारच न्हाही तर. आठवड्याच्या सुट्टीपेक्षा मला हवी तेंव्हा आनंदानं सुट्टी दिला तर बरं.” आईच्या खांद्यावर हात ठेवत वरुण आईला आतल्या खोलीत घेऊन गेला. “हे बघ आई… तुला कितीतरी वेळा कंटाळा येतो म्हणून आपण हाॅटेलमधून जेवण मागवतो. आपल्या फॅमिली फंक्शनसाठी, शिवाय आजीच्या हाॅस्पिटलसाठी बाबांना कितीतरी वेळा सुट्टी घ्यावी लागते. शिवाय मी तुला सारखाजवळ हवा म्हणून तू मला ‘वर्क फ्राॅम होम’ घ्यायला लावलंस. आई, लक्षात घे. आपल्याला सुट्टी लागते ना तशीच तिला का नको. विचार कर ना जरा.” अगदी नाईलास्तव सरीता वहिनींनी तिला सुट्टी दिली. पण नाराजी, कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर राग, सावित्रीशी अबोला, आदळआपट हे सगळं नेहमीप्रमाणे चालू झालं. ते वरुणला अजिबात आवडलं नाही. तो आईला काहीतरी बोलणार एवढ्यात सावित्रीच म्हणाली. “वहिनी कितीही बोलल्या, रागावल्या तर चालतंय. मला काय वाईट वाटत न्हाई त्याचं, त्या खूप चांगल्या हैत. आता सुट्टी घ्याची म्हंटल्यावर थोडं नाराज हुणारच. दादा, परत आल्यावर बघा कशी रुसवा काढत्या ते.” “दादा, वैनी लई चांगल्या हैत. माझ्या पोरांना वह्या पुस्तकं देत्यात. अडीअडचणीला मदत करत्यात. मला सोडून काय खात न्हाईत. पोरांसाठी कपडेलत्ते देत्यात. हे सगळं मनापासून करत्यात. फक्त सुट्टी मागितली म्हणून वैनी चिडल्या.”

हेही वाचा >>> भांडण बाप-मुलाचं… शिक्षा आईला का?

सावित्री सुट्टीवरून परत येईपर्यंत वहिनींची चिडचिड टिकली. सावित्रीला वर्षानुवर्षे या घरात कामाची सवय झाली होती. या घरातील माणसांची तिला गोडी लागली होती. घरातल्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव तिला माहीत झाले होते. तिला कामवाली मावशी असं कुणीच म्हणत नव्हतं. ती सगळ्यांसाठी हक्काची सावित्री होती. ती त्या कुटुंबाचाच एक भाग झाली होती. सावित्री सुट्टीवरून परत आली तशी सरीता वहिनींना प्रचंड आनंद झाला. “आलीस का बाई, लाग आता कामाला.” म्हणत वहिनीनी हातातली सगळी कामं तिथल्या तिथं सोडून दिली. त्यांना हुश्श झाला होतं. सावित्रीने आल्या आल्या मस्त गरमागरम चहा केला. त्याबरोबर दोघींच्या मनसोक्त गप्पा चालू झाल्या. सासूची तब्येत कशी आहे? कोण सांभाळतंय आता तिला? किती पैसे संपवले? पैशांवरून बचतीचे काही धडे देणं, बॅंकेत खातं उघडून देणं इ. गोष्टींबाबत वहिनींचं मार्गदर्शन करून झालं.

हेही वाचा >>> गच्चीवरची बाग : भिंतीवरील हरित बाग

एकदा सरिता वहिनींकडे त्यांच्या मैत्रिणींची भिशी होती. वहिनी कौतुकानं सावित्रीबद्दल बोलल्या होत्या. “ ही होती ना… म्हणून भिशी झाली बरं आपली. हिच्यामुळे मी सगळं निभावून नेलं. भिशीची माझी सगळी भिस्त हिच्यावरच होती. ती कामाला अजिबात कंटाळत नाही.“ कोण होती ही सावित्री? ती एक अशी व्यक्ती होती जी वहिनीच्या घरातलं अबोल, पण अनमोल होती. तिच्याशिवाय वहिनींचं पान हलत नव्हतं. सावित्री त्यांच्या तोलामोलाची असू शकत नाही. कधी कामचुकारपणा करणारी होती. कधी अचानक दांड्या मारत होती. कधी काम जास्त पडलं म्हणून तोंड वाकडं करत होती. कधी अबोला धरत होती. कधी कधी नको तिथं नको ते बोलायची. कशीही असेल पण वहिनींच्या हृदयात तिला खास जागा होती. तिच्या कामाच्या सवयीमुळे ‘तिला काम आणि वहिनीला आराम’ असंच वर्षानुवर्षे चालू होतं. वहिनींची नाराजी तिला कळत होती. तर तिच्या छोट्या छोट्या समस्या वहिनींना समजत होत्या. तिचे जास्त लाड केले तर ‘डोक्यावर मिरे वाटायला नकोत’ म्हणून त्या काळजी घेत होत्या. वहिनींच्या हृदयात कसं स्थान मिळवायचं हे तिला पक्कं ठाऊक होतं. दोघीत वैचारिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अंतर प्रचंड मोठं होतं. तरीही सरिता वहिनीनी तिला माणूस म्हणून स्वीकारलं होतं. खरंतर..नोकरी व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आठवड्याला, सणासुदीला सुट्टी लागतेच. तर मग सावित्रीला का नको? या वरुणच्या प्रश्नाने सरीतालाही आपली चूक लक्षात आली होती. दोघींमधे सुसंवाद व्हायला लागला. सुट्टीवरून होणारे लुटुपुटुचे वाद संपले. वेगळं नातं वाढलं.

 ( लेखिका समुपदेशक आहेत) archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about leave for domestic workers leave for house maids zws