अपर्णा देशपांडे
सर्वसाधारण व्यक्तीच्या आयुष्यात लैंगिक संबंध हा महत्त्वाचा घटक असला तरीही तो एकमेव घटक आहे असं मुळीच नाही. एका सुदृढ नात्यामध्ये शारीरिक संबंधांपलीकडे बरंच काही असतं. पण मग प्रश्न पडतो की, इतर कुठलेही भावनिक बंध नसताना (नो स्ट्रिंग्ज ॲट्च्ड) फक्त शारीरिक संबंध असलेलं नातं हे ‘नातं’ म्हणवलं जाईल का? असं नातं दीर्घकाळ टिकल्यावर नकळत मन गुंतत असेल का? एखाद्या व्यक्तीसोबत आपलं प्रेमाचं नातं आहे, की त्या व्यक्तीला फक्त आपल्या शरीराचं आकर्षण आहे हे कसं ओळखायचं?
स्त्री-पुरुषातील नातं हे अनेक पदरी आहे. वात्सल्य, जिव्हाळा, प्रेम, ओढ, जबाबदारी, काळजी अशा अनेक कंगोऱ्यांतून जाताना शारीरिक नातं हाही एक अत्यंत महत्त्वाचा कंगोरा आहे. शारीरिक जवळीक आणि शृंगार हा पती-पत्नी किंवा ‘आयुष्याचा जोडीदार’ या नात्याची वीण अधिक घट्ट करतो. रोमँटिक नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे.
हेही वाचा >>> नात्यातले गैरसमज धुमसत ठेवणं घातकच!
सर्वसाधारण व्यक्तीच्या आयुष्यात लैंगिक संबंध हा महत्त्वाचा घटक असला तरीही तो एकमेव घटक आहे असं मुळीच नाही. एका सुदृढ नात्यामध्ये शारीरिक संबंधांपलीकडे बरंच काही असतं. पण मग प्रश्न पडतो की, इतर कुठलेही भावनिक बंध नसताना (नो स्ट्रिंग्ज ॲट्च्ड) फक्त शारीरिक संबंध असलेलं नातं हे ‘नातं’ म्हणवलं जाईल का? असं नातं दीर्घकाळ टिकल्यावर नकळत मन गुंतत असेल का? एखाद्या व्यक्तीसोबत आपलं प्रेमाचं नातं आहे, की त्या व्यक्तीला फक्त आपल्या शरीराचं आकर्षण आहे हे कसं ओळखायचं?
जर तुमच्या पार्टनरसोबत तुमचे शारीरिक संबंध असतील आणि तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम, आत्मीयता वाटत असेल, तर त्याला/तिलाही तुमच्याबद्दल तसंच वाटत आहे का, याबद्दल बोलणं गरजेचं आहे. समोरील व्यक्तीने तसं स्पष्ट केल्यास ते संबंध असेच पुढे न्यायचे की नाही याबद्दल निर्णय घेणे सोपे होईल, पण जर तुम्हाला भावनिक बंध जुळवायचे आहेत आणि समोरील व्यक्ती फक्त आणि फक्त लैंगिक संबंधास उत्सुक आहे, तर मात्र त्वरित सावध होणं गरजेचं आहे. तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडतं का? तुमच्या आवडीनिवडी, तुमचे भावनिक चढउतार, तुमचं यश-अपयश याबद्दल त्याला/तिला किती काळजी आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमची भेट झाल्यावर आधी तो/ती तुमची विचारपूस करतो/करते का? तुमची कैफियत ऐकण्यात त्याला/तिला रुची आहे, की भेटल्यावर फक्त शारीरिक जवळीक प्रस्थापित होते? तसं होत असेल तर तुमचं नातं फक्त शारीरिक आहे.
हेही वाचा >>> कुटुंबात तुम्हाला डावललं जातंय?
याना आणि अर्जुन हे एकाच ऑफिसमध्ये काम करणारे सहकर्मी. अर्जुन घटस्फोटित तर याना अविवाहित प्रौढा. दोघांनी आपसी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, पण काहीच दिवसांत याना त्याच्यामध्ये मनाने गुंतत गेली. अर्जुनने आधीच त्याची बाजू स्पष्ट करून सागितलं होतं, की आपल्या दोघांत हा एक अलिखित करार आहे. आपण एकमेकांकडून कुठलीही अपेक्षा करायची नाही. एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करायचा नाही, पण तिला ते यांत्रिक आयुष्य जगणं अवघड होऊ लागलं, आणि तिने त्याला लग्नासंबंधी विचारलं. तिच्या मते, एकाच व्यक्तीशी शारीरिक जवळीक ठेवताना भावनिक गुंतवणूक ही होणारच. आपण काही यंत्र नाही, पण अर्जुनला लग्न नको असल्याने त्यांनी एकमेकांशी संबंध तोडले. या सगळ्याचा यानाला प्रचंड त्रास झाला. सगळी नीट कल्पना असतानाही फक्त शारीरिक संबंध ठेवणं तिला जमलं नाही.
अभ्यासक सांगतात, फक्त शारीरिक नात्यात एकूण चार टप्पे किंवा अवस्था असतात. हे नातं किती काळ टिकून आहे यावर ते टप्पे अवलंबून आहेत.
‘युफोरिक’ अवस्था : एका व्यक्तीशी सहा महिने ते दोन वर्षे कुठलीही इतर अपेक्षा न ठेवता शारीरिक संबंध असणे. यामध्ये शारीरिक गरजा शमवणे हा उद्देश.
प्रारंभिक गुंतवणूक अवस्था : एक वर्ष ते पाच वर्षे शारीरिक नातं. यात मनाचे धागे नकळत जुळले जातात.
संघर्ष अवस्था : पाच ते सात वर्षे शारीरिक संबंध आल्यास. पुढील आयुष्यात काय निर्णय घ्यावा या बाबतीत मनाचा संघर्ष होणं, संसाराची जबाबदारी घेणे न घेणे याबाबत मानसिक संघर्षाचा काळ.
खोल भावनिक गुंतवणूक : सात वर्षांहून अधिक काळ शारीरिक संबंध असल्यास. एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, काळजी निर्माण होतेच.
याचा अर्थ एकाच व्यक्तीसोबत दीर्घकाळ शारीरिक संबंध असल्यास भावनिक गुंतवणूक न करता राहाणे तसे असंभव म्हणावे लागेल. शरीर आणि मन या दोन्हीची सांगड घातली जाणे हे मानवी स्वभावाच्या आणि मर्यादेच्या कक्षेत असणारी नैसर्गिक बाब आहे. दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवणं आणि इतर कुठलीही अपेक्षा न करणं हे नुसतं अवघडच नाही तर आयुष्यात असंख्य प्रश्न समोर उभे करणारं आहे… भावनाविरहित शृंगार ही तात्पुरती ‘सोय’ असू शकते. ती फक्त वासनापूर्ती असू शकते, त्यावर आयुष्यभराचं भक्कम प्रेमाचं आश्वासक नातं जुळणं अशक्य!
adaparnadeshpande@gmail.com