एखादा आगळावेगळा बहर निरखणं, एका विशिष्ट जातीच्या, प्रकारांच्या फुलांचा बहर अनुभवणं हे ही विलक्षण आनंद देणारं असतं. आजपासून आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय, नवीन आशा, नवी स्वप्ने घेऊन पुढच्या वाटचालीसाठी सज्ज होतोय. यासाठीच नवीन वर्षात विशिष्ट फुलांच्या बागा कोणत्या वेळी, कोणत्या महिन्यात फुलतील याविषयी…
आपण घरी बाग फुलवतो, अनेक फुलझाडे लावतो म्हणजे नेमकं काय करतो, तर निसर्गाचं प्रतिरूप रेखतो. निसर्ग आपल्या अगदी घरात फुलवण्याचा प्रयत्न करतो. त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हे मोठं असतं हे तर खरंच!
पण त्याच बरोबर एखादा आगळावेगळा बहर निरखणं, एका विशिष्ट जातीच्या, प्रकारांच्या फुलांचा बहर अनुभवणं हे ही विलक्षण आनंद देणारं असतं. आजपासून आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय, नवीन आशा, नवी स्वप्ने घेऊन पुढच्या वाटचालीसाठी सज्ज होतोय. यासाठीच नवीन वर्षात विशिष्ट फुलांच्या बागा कोणत्या वेळी, कोणत्या महिन्यात फुलतील याची थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न मी आजच्या या लेखात करणार आहे- जेणेकरून तुम्ही नीट ठरवून त्या- त्या वेळी या फुलांच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकाल.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरमध्ये ट्युलिप फुलांना बहर येतो… ट्युलिप हे अतिशय देखणं असं विदेशी फुलं आहे. अँमस्टरडॅम मधील ट्युलिपच्या बागा, तिथले फोटो आपण पाहिलेले असतात. विविध पर्यटन कंपन्या मे महिन्या दरम्यान अनेक सहलींचे आयोजनही करतात. त्यांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध होत असतात. पण जर ही ट्युलिपची फुलं आपल्याचं देशात बघायला मिळाली तर!
हेही वाचा >>> आदिवासी महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी…
त्यासाठी मग अगदी नक्की एप्रिलमधले सुरुवातीचे तीन आठवडे राखून ठेवा. या दिवसांत काश्मीर हॉर्टिकल्चर विभागातर्फे लागवड करण्यात आलेल्या ट्युलिपच्या कंदांना बहर येतो. विविध रंगाची, आकाराची फुलं फुलतात. एक अख्खा दिवस जरी आपण या बागेत घालवला तरी मन भरत नाही. झबरबन पर्वत रांगांच्या पार्श्वभूमीवर लांबवर पसरलेल्या ट्युलिपच्या बागा, तिथली सुखद हवा, चैतन्य, उत्फुलता अनुभवणं हे विलक्षण आनंददायी असतं.,. ट्युलिपच्या जोडीलाच इथे इतर भागांमधे प्लमची झाडं गुलाबी नाजूक फुलांनी बहरलेली असतात. लहानखुऱ्या गवतावर रेनलीलीची असंख्य फुलं उमललेली असतात. एकाच वेळी प्लंम, ट्युलिप, रेन लिली यांचा एकत्रित बहर तर अनुभवता येतोच, पण त्या जोडीला विपिंग विलो, पिस्ता, चिनार यांसारखे डेरेदार वृक्ष- जे एरवी सहज बघायला मिळत नाहीत- त्यांचही सौंदर्य निरखता येतं.
ट्युलिपच्या बागांमधे फिरताना स्वर्गिय फुलांचा आनंद आपण घेत असतोच, पण त्याबरोबरच काश्मिरी खाद्यपदार्थ आणि महत्त्वाचं म्हणजे गरमागरम कहावा तर लाजवाब. जपानी चहा पिण्याचा जसा समारंभ असतो तसाच सोमावर मधील हलकासा गरम कहावा पितपित संगीताचा आस्वाद घेत सभोवताली पसरलेली ट्युलिप अनुभवण हाही सोहळाच असतो.
तेव्हा हा ट्युलिप मोहोत्सव एकदा तरी नक्की अनुभवा. फुलं फुलण्याचा कालावधी आणि या संदर्भातील सगळी माहिती तुम्ही नेटवरून सहजी मिळवू शकाल.
हेही वाचा >>> पुनर्विवाहित विधवेसही वारसाहक्क!
यानंतर अनुभवता येणारा पुष्पोत्सव म्हणजे सरत्या पावसाळ्यातील कोकण कड्यावरचा रानफुलांचा बहर, फुललेली सोनावळीची रानं, कास पठारावरील मनोहारी सोंदर्य. कास पठारावर प्रत्येक महिन्याला एका विशिष्ट जातीच्या फुलांचा बहर असतो. त्यात कधी आमरी म्हणजे ऑर्किडची इवली पांढरी फुलं सर्वदूर बहरलेली दिसतील तर कधी कवळ्याची पिवळी धम्मक लाल सुरेख ठिपका असलेली फुलं आढळतील. कधी तेरड्याचा बहर मन मोहून टाकेल. सुरुवातीचा एक महिना सोडला तर पावसाळ्याचे उरलेले तीनही महिने आपण हा पुष्पोत्सव कोकण आणि देशावर दोन्ही ठिकाणी अनुभवू शकतो.
सरत्या पावसाळ्यात आणि थंडी सुरू होण्याच्या सुमारास ठिकठिकाणी कमळाची तळी फुलतात. एखाद्या प्रवासादरम्यान शंकराच्या मंदिरातील तळ्यात, पालीसारख्या तिर्थक्षेत्री गेलात तर वाटेवर आढळणाऱ्या लहानशा जलाशयात कुमुदिनी फुललेल्या असतील. मुंबईच्या अगदी जवळ शेवा गावातील शेवेश्वराचं तळं त्यातील पांढऱ्या, लाल कुमुदिनी अनुभवणं हाही एक विलक्षण योग आहे.
फुलांपानांच आकर्षण असलेल्या फुलवेड्यांसाठी अशा अनेक संधी आपल्या भोवतीच असतात. आपल्याला जाणून घ्यायचंय ते फक्त त्यांचं ऋतूमानुसार उमलणं. एकदा ते जाणलं की मग वर्षभर हा पुष्पोत्सव आपण अनुभवू शकतो.
पुढील लेखात आसाममधील साकुरा, कुर्गमधील कॉफीचे मळे अशा वैशिष्ट्य पूर्ण बहरांबद्दल जाणून घेऊ या. तोवर समस्त बागप्रेमी आणि निसर्गपूजक वाचकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
mythreye.kjkelkar@gmail.com