“ताई, तू घरात आहेस ना? मी येतोय.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“होय अनुज, मी घरातच आहे, तू आणि अपर्णा दोघेही येणार आहात का? किती वाजता येणार ते मला कळव. म्हणजे मी जेवणाची सर्व व्यवस्था करून ठेवते.”

“ताई, मी एकटाच येणार आहे आणि संध्याकाळी नाही आत्ताच येतोय. जवळच आहे तुझ्या घराच्या.”  

“अरे, तू सुट्टीवर आहेस का?”

“नाही, मी ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघालो आहे, पण मी ऑफिसला न जाता तुझ्याकडे येणार आहे. अपर्णाला सांगू नकोस, मी १५ मिनिटांत तुझ्या घरी पोहोचतोय. आल्यावर सविस्तर बोलू ”

श्रुतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. बहुतेक दोघांचं काहीतरी वाजलेलं दिसतंय. अनुज आणि श्रुतीमध्ये १० वर्षाचं अंतर होतं. लहान भाऊ म्हणून अनुजला तिनं लहानपणापासून सांभाळलं होतं, मार्गदर्शन केलं होतं आणि अनुजलाही ताईबद्दल खूपच आदर होता, त्यामुळं काहीही झालं तरी ताईला येऊन सांगितल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही. श्रुती विचार करीत असतानाच दारावरची बेल वाजली. अनुज येणार म्हणून लिंबू सरबत तिनं तयारच ठेवलं होतं.

“ताई, मला काय हवं आहे हे तुला न सांगताच कसं समजतं? अपर्णाला हे कसं समजतं नाही?” त्याच्या तक्रारींचा धबाधबा सुरू झाला.

“कारण  मी तुला ३५ वर्षं ओळखते आहे आणि अपर्णा तुझ्या आयुष्यात फक्त दोन वर्षांपूर्वी आली आहे. आता मुद्द्याचं बोल, आज असं सुट्टी टाकून माझ्याकडं येण्याचं प्रयोजन काय?आणि अपर्णाला न सांगण्याचा उद्देश काय?”

हेही वाचा >>> पतीनं बाहेर संबंध ठेवू नये म्हणून पत्नींसाठी चीनमध्ये खास शिबिराचं आयोजन, सोशल मीडियावर लोक म्हणाले…

“हो ग ताई, हेच तर सर्व तुला सांगायला आलोय. माझ्या नातेवाईकांशी मी कसं वागायचं हे ती कोण मला सांगणार? माझ्या प्रत्येक गोष्टीत तिनं नाक खुपसलेलं मला आवडत नाही. मागच्या आठवड्यात आपली पूर्वा माझ्या घरी आली होती. शिक्षणासाठी ती गेली चार वर्षं परदेशात होती त्यामुळे भेटच होत नव्हती. ती घरी आल्याबरोबर धावत येऊन तिनं मला मिठी मारली, हे अपर्णाला अजिबात आवडलं नाही. पूर्वा माझी आत्येबहीण आहे. आम्ही बालपणी एकत्र वाढलो, खेळलो आहोत हे तिला माहिती असून माझ्यावर संशय का घ्यायचा? अगं, सुट्टीच्या दिवशी किंवा सणासुदीला जेव्हा आम्ही आईबाबांकडे जातो तेव्हा कधी कधी मी आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो. तिला तेही आवडत नाही. ‘आईच्या अंगलट गेलेलं मला आवडत नाही’ असं ती म्हणते. ताई तूच सांग अशा पद्धतीचे विचार मनात येणं ही सुद्धा विकृती आहे की नाही? मी तुझ्याशी मोकळेपणाने बोललेलं आणि वारंवार तुझ्याकडं आलेलंही तिला नेहमी खटकतं. अपर्णा अशी का वागते तेच कळतं नाही,म्हणूनच पुढं काय करावं हे विचारण्यासाठी मी तुझ्याकडं आलो आहे. फक्त आता ‘तिच्या कलानं घे, तिला आवडेल असं वाग,’ असलं काही मला सांगू नकोस, कारण तिला आवडेल म्हणून मी माझ्या नातेवाईकांपासून दूर जाणार नाही. मला ज्यामध्ये आनंद वाटतो ते मी करणार. तिनं माझ्यावर बॉसगिरी करू नये ”

हेही वाचा >>> ३० किलो डार्क चॉकलेटपासून अर्धनारी गणेशाची मूर्ती बनवणारी महिला आहे तरी कोण?

अनुज त्याच्या मनात साठलेल्या सर्व गोष्टी श्रुतीकडे मोकळ्या करीत होता. तिनेही सर्व ऐकून घेतलं आणि त्याला सांगितलं, “अनुज, काही व्यक्ती अशा असतात की कुणाच्याही अति जवळ गेलेलं त्यांना आवडत नाही. इतरांच्या स्पर्शापासून लांब राहणं ते जास्त पसंत करतात. लहान मुलं आईला येऊन पटकन मिठी मारतात, पण काही स्त्रिया अशा असतात की त्यांना ते ही आवडत नाही. ‘तू आता मोठा झालास. आईच्या फार जवळ यायचं नाही,’ असं त्या आपल्याच मुलांना सांगतात. हाय, हॅलो करताना कुणाच्या हात हातात देणंही त्यांना आवडत नाही. बहीण भावांनीही एकमेकांपासून लांब राहावं. मांडीला मांडी लावूनही बसू नये, कोणतंही नातं असलं तरी विरुद्ध लिंगी व्यक्तींच्या जवळ जाऊ नये, असं त्यांचं मत असतं कारण लहानपणापासून काही गोष्टी त्यांच्या मनात पक्क्या बसलेल्या असतात. लहानपणी काही पालक मुलांना ‘असं वाग’, ‘असं वागू नकोस’, असं सांगत असतात. त्याचे अर्थ त्या वयात मुलांना समजत नाहीत, पण हे असंच वागणं योग्य हे मनात धरून ठेवलेलं असतं आणि मोठं झाल्यानंतरही ते तसंच वागतात. अपर्णाच्या बाबतीत काहीसं तसं झालं असावं. ‘Don’t be close’ ही कमांड तिच्या लहानपणी तिच्या मनात रुजलेली असेल तर तिलाही कुणाचं जवळ येणं फारसं आवडत नसेल. त्याचबरोबर आपल्या जोडीदारानंही तसंच वागावं असं वाटतं असेल. या बाबतीत मी तिच्याशी बोलेन,पण ती विकृत आहे, असं समजून तिच्यावर राग धरणं, चिडचिड करणं आणि स्वतःला त्रास करून घेणं पहिलं थांबव. काही व्यक्ती अशा असतात कारण त्यांची जडणघडण तशीच झालेली असते हे लक्षात घे.”

श्रुतीने आणखीही बऱ्याच गोष्टी अनुजला समजावून संगितल्या आणि त्यालाही त्या पटल्या. अपर्णामध्ये कसा बदल होईल आणि या सर्व गोष्टींकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन कसा बदलता येईल याबाबत तो विचार करू लागला.

लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article analysis about close relationships zws