कोनेरू हम्पीनं जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं, त्यानिमित्ताने…
‘वयाच्या ३७व्या वर्षी एका महिलेसाठी जगज्जेतेपद पटकावणं सोपं नाही. अन्य जबाबदाऱ्यांमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. मात्र, माझ्या बाबतीत हे झालं नाही ते कुटुंबामुळे. पती आणि आई-वडिलांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मोलाचा ठरतो. मी विविध स्पर्धांसाठी परदेशात प्रवास करते तेव्हा आमचे पालकच आमच्या मुलीची काळजी घेतात. त्यांच्याविना मी यशस्वी ठरूच शकले नसते.’’ जागतिक जलद (रॅपिड) अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदानंतर भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीनं व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जातात. भारतात ज्यावेळी बहुतांश घरांमध्ये मुलींना फारसं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं, त्यावेळी आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे हम्पीनं चौसष्ठ घरांच्या पटावर राज्य करण्यास सुरुवात केली होती. आता जवळपास अडीच दशकांनंतरही हम्पी बुद्धिबळविश्वातील आपलं वेगळं स्थान राखून आहे. मात्र, याचं श्रेय स्वत: घेण्यापेक्षा ते ती कुटुंबाला देते.
भारतीय बुद्धिबळासाठी २०२४ हे वर्ष अविस्मरणीय ठरलं. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णकमाई केली. पाठोपाठ १८ वर्षीय दोम्माराजू गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करत जगज्जेतेपदाचा मान मिळवला. तो बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरला. या युवकाकडून प्रेरणा घेत अनुभवी हम्पीनं जागतिक जलद अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावताना बुद्धिबळविश्वात भारतच आता महासत्ता आहे यावर शिक्कामोर्तब केलं.
हेही वाचा >>> निसर्गलिपी : पुष्पबहराची दिनदर्शिका…
वर्षाची यशस्वी सांगता
हम्पीला वर्षभरात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे ती अगदी निवृत्तीचाही विचार करत होती. मात्र, तिनं जिद्द राखली. ती मेहनत करत राहिली. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात हम्पीचा हातखंडा आहे आणि वर्षाअखेरीस याचंच दर्शन घडलं. ‘माझ्यासाठी हे जेतेपद अनपेक्षित होतं. गेल्या काही स्पर्धांमध्ये मी अखेरच्या स्थानावर राहिले होते, त्यामुळे मी जागतिक स्पर्धा जिंकली याचं मलाच आश्चर्य वाटतं आहे,’ असं हम्पी म्हणाली. हम्पीला सुरुवातीच्या चार फेऱ्यांत केवळ २.५ गुण मिळवता आले होते. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीत ती बरीच मागे होती. मात्र, त्यानंतरच्या सात फेऱ्यांत मिळून तिनं केवळ १.५ गुण गमावला. त्यामुळे ११ फेऱ्यांअंती ८.५ गुणांसह ती विजेती ठरली. याआधी तिनं २०१९ मध्येही या स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं.
आव्हानांवर मात
आव्हानांवर मात करणं हम्पीसाठी नवं नाही. भारतात आता महिला बुद्धिबळपटूंची संख्या मोठी आहे. मात्र, हम्पीनं कारकीर्दीची सुरुवात केली त्यावेळी चित्र वेगळं होतं. पुरुष खेळाडूंमध्ये विश्वनाथन आनंदनं बुद्धिबळविश्वात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मात्र, भारतीय महिला बुद्धिबळपटूंमध्ये इतका मोठा पल्ला कोणी गाठू शकली नव्हती, त्यामुळे हम्पीसमोर असा कोणाचा आदर्श नव्हता. तसंच विविध स्पर्धांसाठी आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी परदेशात जायचं तर मोठा खर्च. मध्यम वर्गीय कुटुंबासाठी हा आर्थिक भार पेलणं सोपं नव्हतं. मात्र, आई-वडिलांनी हम्पीतील गुणवत्ता हेरली आणि तिला पूर्ण प्रोत्साहन दिलं.
हेही वाचा >>> आदिवासी महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी…
वडिलांचे पाठबळ
हम्पीचे वडील अशोक यांना बुद्धिबळाची गोडी होती. ते स्वत: राष्ट्रीय ‘अ’ श्रेणीतील स्पर्धेत खेळले होते. नोकरी आणि अन्य जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पूर्णवेळ खेळाडू म्हणून कारकीर्द घडवता आली नाही. आपलं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी मुलीची स्वप्नपूर्ती व्हायला हवी, तिच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे या हेतूनं त्यांनी हम्पीला पाठबळ दिलं. पालकांचा त्याग, त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना हम्पीनं विविध वयोगटातील स्पर्धांत आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली. तिनं खुल्या स्पर्धांत, पुरुष खेळाडूंविरुद्ध खेळण्याचंही धाडस दाखवले.
भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर
हम्पीनं २००२ मध्ये वयाच्या १५व्या वर्षीच प्रतिष्ठेचा ग्रँडमास्टर किताब मिळवला. त्यावेळी ती बुद्धिबळाच्या इतिहासातील एकूण आठवी आणि भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ठरली होती. विशेष म्हणजे, सर्वांत युवा ग्रँडमास्टर म्हणून तिनं सुझान पोल्गरचा विक्रमही मोडीत काढला. पुढील वर्षीच हम्पीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यानंतर हम्पीनं मागे वळून पाहिलं नाही. २००६ मध्ये तिनं दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावं केलं. तसंच तिनं २६०० एलो गुणांचा टप्पाही ओलांडला आणि अशी कामगिरी करणारी ती पोल्गरनंतरची दुसरी महिला बुद्धिबळपटू ठरली. हम्पीच्या कारकीर्दीतील सर्वांत मोठा क्षण २०११ मध्ये आला. त्यावेेळी ती जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरली. या लढतीत तिला चीनच्या हो यिफानकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, तिचे उपविजेतेपदही भारतातील मुलींना बुद्धिबळ हे क्षेत्र निवडण्यासाठी प्रेरणा देण्याकरिता पुरेसं होतं.
पतीचीही साथ
बुद्धिबळपटू म्हणून हम्पीच्या कारकीर्दीला खिळ बसणार नाही याची पती दसारी अन्वेशनेही काळजी घेतली. या दोघांचा २०१४ मध्ये विवाह झाला. २०१७ मध्ये तिनं कन्या अहानाला जन्म दिला. त्यानंतर कुटुंबाच्या जबाबदारीमुळे हम्पीची कारकीर्द धोक्यात येईल असं अनेकांना वाटतं. मात्र, उमेदीच्या काळात ज्या प्रकारे आई-वडिलांनी हम्पीला साथ दिली, तसेच मुलीच्या जन्मानंतर पती हम्पीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. या पाठबळाच्या जोरावर हम्पीनं २०१९ मध्ये जागतिक जलद अजिंक्यपद स्पर्धा पहिल्यांदा जिंकली. तसंच पुढील काही वर्षांत ऑलिम्पियाड आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघांची ती प्रमुख सदस्य होती. तिच्या खेळाचा स्तर अजूनही कायम असल्याचं जागतिक जलद अजिंक्यपद स्पर्धेतील यशानं सिद्ध झालं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिलेची साथ हे मुख्य कारण असल्याचे म्हटलं जातं. त्याच प्रमाणे संपूर्ण कुटुंबानं पाठबळ दिल्यास एखादी महिला किती मोठी उंची गाठू शकते आणि जगात स्वत:ची वेगळी ओळख कशी निर्माण करू शकते याचं कोनेरू हम्पी हे उत्तम उदाहरण आहे. तिची ही घोडदौड इतक्यातच थांबणार नाही हे निश्चित.