टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी जेमतेम होती. त्या अपयशातून सावरलेल्या भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची रांग लावली आहे. प्रामुख्याने भारतीय नेमबाजांनी त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत दररोज किमान पाच ते सहा पदकं पटकावत आहेत. यावर्षीच्या स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या यादीत अनेक नवीन नावं पाहायला मिळत आहेत. यामध्ये एक खेळाडू अशी आहे जी अवघी १८ वर्षांची आहे. परंतु, तिच्याकडे पाहिलं तर ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हा वाक्प्रचार आठवतो. कारण ईशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने एकटीने चार पदकांवर आपलं नाव कोरलं आहे.
ईशाने १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक, १० मीटर एअर पिस्तूल महिला वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. तत्पूर्वी तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह तिने एकटीने चार पदकं पटकावली आहेत.
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिल्यांदा रायफल उचणाऱ्या ईशाचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. ईशा ही नवव्या वर्षी तिचे वडील सचिन यांच्याबरोबर पहिल्यांदा शूटिंग (नेमबाजी) रेंजवर गेली होती. तिथेच तिने पहिल्यांदा बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला होता. त्यानंतर तिलाही बंदुकीने नेमबाजी कराविशी वाटली. त्यामुळे ती रायफल उचलायला गेली आणि जमिनीवर पडली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला शॉटगन भेट दिली.
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन बनली
ईशाचा नेमबाजीतला रस पाहून तिच्या पालकांनी तिला त्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू ईशा नेमबाजी शिकू लागली. तसेच ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेमबाजी करू लागली. त्यानंतर ती राज्य स्तरावरील स्पर्धा जिंकू लागली. ईशा ही २०१८ साली झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या वेळी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. त्यावेळी तिने हीना सिद्धू आणि मनू भाकर या दोन नावाजलेल्या नेमबाजांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावलं होतं. तेव्हा ईशा केवळ १३ वर्षांची होती. तसेच त्या स्पर्धेतील सर्वात लहान सुवर्णपदक विजेती खेळाडू ठरली होती.
हे ही वाचा >> Asian Games: नेमबाजीत टीम इंडियाची घोडदौड कायम! पुरुषांनी सुवर्ण तर महिला संघाने पटकावले रौप्यपदक
ईशाचे वडील रॅली ड्रायव्हर होते. आपल्या मुलीनेही खेळात मोठं नाव कमवावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मुलीच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम केलं. त्यांनी स्वतःच्या करिअरला बाजूला सारून मुलीच्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं. मुलीला प्रत्येक स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याबरोबर कोणीतरी हवं होतं. त्यामुळे त्यांनी रॅली ड्रायव्हिंग सोडून दिलं. त्यांनी ईशासाठी फीजिओ आणि मानसशास्त्रज्ञाचीदेखील नेमणूक केली आहे.