लता दाभोळकर
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ झरदारी यांनी नुकतीच दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपली ३१ वर्षीय मुलगी- आसिफा भुट्टो हिचं नाव औपचारिकपणे देशाची ‘फर्स्ट लेडी’ म्हणून जाहीर केलं. पाकिस्तानात मुलीला फर्स्ट लेडीचा दर्जा देण्याची ही पहिलीच घटना आहे. हा मान राष्ट्रपतींच्या पत्नीला मिळतो, परंतु २००७ मध्ये झरदारी यांच्या पत्नी व पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांची हत्या झाली. झरदारी जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपती झाले (२००८ ते २०१३) त्यावेळी हे पद रिक्त होतं. परंतु अलीकडेच पाकिस्तानचे १४ वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली व फर्स्ट लेडी म्हणून मुलगी आसिफाचं नाव जाहीर केलं.
झरदारी यांच्या या निर्णयाला पाकिस्तानात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आसिफाच्या नियुक्तीनंतर तिची मोठी बहीण बख्तावर भुट्टो यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून तिच्या नियुक्तीबद्दल तिचं अभिनंदन करताना म्हटलंय, ‘आसिफा… राष्ट्रपती आसिफ झरदारी यांना त्यांच्या न्यायालयीन लढ्यात पाठिंबा देण्यापासून ते तुरुंगातून सुटकेसाठी लढा देण्यापर्यंत… ते आता देशाची फर्स्ट लेडी म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.’ आसिफाच्या अधिकृत निवडीनंतर तिला फर्स्ट लेडीचे राजशिष्टाचार पाळावे लागतील आणि त्या पदाचे विशेषाधिकारही प्राप्त होतील. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ॲन्ड्य्रु जॅक्सन यांनी भाचीला, तर चेस्टर आर्थर आणि ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी त्यांच्या बहिणींना हा मान दिला होता.
आणखी वाचा-विदेशातून ‘या’ विषयात पदवीचं शिक्षण ते मॉडेलिंगमध्ये करिअर, सारा तेंडुलकरने निवडली वेगळी वाट
आसिफा हे आसिफ झरदारी आणि बेनझिर भुट्टो यांचं शेंडेफळ. ती केवळ झरदारी यांची मुलगी आहे म्हणून तिला हा मान मिळाला आहे असं नाही, ती भुट्टो आणि झरदारी कुटुंबीयांचा राजकीय वारसा समर्थपणे नेटाने चालवत आहे हे पाकिस्तानातील तिच्या सक्रिय राजकारणातून दिसून येतं.
लंडनमध्ये जन्मलेल्या आसिफाचा ३१ वर्षांचा प्रवासही राजकीय-सामाजिक घडामोडींचा आहे. पाकिस्तानात पोलिओ निमूर्लन मोहिमेतर्फे लस दिलेली ती पहिली बालक. दुबईमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलेल्या आसिफाने ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांत पदवी प्राप्त केली. नंतर तिनं लंडनमधून जागतिक आरोग्य आणि विकास या विषयातून मास्टर्स केलं.
सोळा वर्षांची असतानाच तिनं पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन मोहिमेवर भर दिला होता. समाजकारण आणि राजकारण यांचा उत्तम मेळ साधणं हे तिचं कौशल्य. पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन मोहिमेची ती सदिच्छा दूत होती. पोलिओ निर्मूलनासाठी तिनं मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. पोलिओग्रस्तांच्या कुटुंबांच्या भेटीगाठी, पोलिओच्या उच्चाटनासाठी प्रचार मोहिमा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात ती पुढे होती.
२०१२ साली अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल’ला संबोधित करणारी पाकिस्तानातील ती पहिली व्यक्ती. या भाषणात तिनं पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलनाच्या कामात जगाला पाठिंब्यासाठी आवाहन केलं होतं. २०१४ साली ऑक्सफर्ड युनियनमध्ये भाषण करणारी पाकिस्तानातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली.
पाकिस्तान पीपल्स पार्टीने आयोजित केलेल्या मुल्तान रॅलीमधून तिनं खऱ्या अर्थाने राजकीय पदार्पण केलं. २०२० नंतर ती पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या निवडणूक प्रचारामध्ये सहभागी घेऊ लागली. भाऊ बिलावल याच्या प्रचाराची धुरा तिने समर्थपणे सांभाळली. अत्यंत प्रभावीपणे त्याचा प्रचार केला. तिच्या दोन भावंडांपेक्षाही आसिफावर बेनझिर भुट्टो यांचा प्रभाव अधिक जाणवतो, असं पाकिस्तानातील जाणकारांचं मत आहे. आपल्या पक्षाची बाजू ती ठामपणे जनतेसमोर मांडते. पक्षातील तिचा वावरही समोरच्यावर प्रभाव टाकणारा असतो. तालिबान्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मलालाला भेटण्यासाठी ती आपल्या वडिलांसमवेत गेली होती. तेव्हा ती अवघी १५ वर्षांची होती.
आसिफा समाजमाध्यमांवर पाकिस्तानातील राजकीय घडामोडींबाबत सक्रिय असते. पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन मोहिमेतील तिच्या कामामुळे ती तिच्या दोन भावंडांपेक्षा पाकिस्तानी जनतेला जास्त जवळची वाटते. अनेक राजकीय समारंभ, पक्षाच्या सभांमध्ये ती वडिलांबरोबर सावलीप्रमाणेच असते. त्यामुळे तिच्या दोन भावंडांपेक्षा आसिफा आपल्या आई-वडिलांचा राजकीय वारसा प्रभावीपणे चालवेल अशी इथल्या लोकांची धारणा आहे. राजकारणातील तिचा प्रभावी सक्रिय सहभाग आणि वावर पित्यालाही त्यांच्या राजकीय प्रवासाची धुरा पुढे नेणारा असाच वाटत असावा.
lokwomen.online@gmail.com