Kamya Karthikeyan: जर तुमच्यात एखादी गोष्ट पूर्ण करण्याची ओढ असेल तर ती तुम्ही नक्कीच पूर्णत्वास आणता. पण, यासाठी फक्त जिद्द आणि आत्मविश्वास हवा असतो. आजकालच्या स्त्रिया पुरुषांच्या एक पाऊल पुढे जाऊन स्वतःला वेळोवेळी सिद्ध करताना दिसतात. अशीच एक अभिमानास्पद कामगिरी १६ वर्षाच्या काम्या कार्तिकेयननेदेखील केलेली आहे. काम्याने २० मे रोजी माऊंट एव्हरेस्ट (८८४९ मीटर) सर केला असून जगातील हे सर्वोच्च शिखर सर करणारी ती भारतातील पहिली विद्यार्थिनी (मुलगी) ठरली आहे. संपूर्ण मोहिमेदरम्यान काम्याचे वडील कमोडोर एस. कार्तिकेयनने मुलीला प्रत्येक पावलावर साथ दिली.
माहितीनुसार, काम्याने तिच्या वडिलांच्या गिर्यारोहणाच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ट्रेकिंगला सुरुवात केली. हिमालयात तिच्या ट्रेकिंगची सुरुवात २०१५ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी चंद्रशिला शिखराच्या ट्रेकने झाली. तिने वयाच्या नवव्या वर्षी स्टोक कांगरी पर्वताची यशस्वी मोहीमदेखील पूर्ण केली होती.
प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित
काम्याला प्रतिष्ठित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार, १८ वर्षांखालील लोकांसाठी असलेल्या सर्वोच्च नागरी सन्मानानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. केवळ इतकंच नव्हे तर काम्याने २० हजार फुटांहून अधिक उंचीची शिखरे सर करणारी सर्वात अल्पवयीन मुलगी होण्याचा बहुमानदेखील मिळवला आहे; शिवाय तिला माऊंट अकोनकागुआ शिखर सर करणारी आणि माऊंट एल्ब्रसच्या शिखरावरून खाली स्की करणारी सर्वात तरुण मुलगी म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे.
सात खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न
हेही वाचा: गरिबीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर बनली भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी! कोण आहे जाणून घ्या…
नौदलाच्या वेस्टर्न कमांडने X (ट्विटर) वर पोस्ट करून काम्या कार्तिकेयनच्या कामगिरीची माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, “काम्याने ३ एप्रिल २०२४ रोजी तिच्या वडिलांसोबत मोहीम सुरू केली होती, काम्या ही ‘नेव्ही चिल्ड्रन स्कूलची १२वीची विद्यार्थिनी असून तिने तिच्या वडिलांसोबत एव्हरेस्टची चढाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.”
माऊंट एव्हरेस्टवर काम्याची ऐतिहासिक चढाई ओळखून भारतीय नौदलाने तिचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, “नौदलाने तिला नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जागतिक स्तरावर दुसरी सर्वात तरुण मुलगी म्हणून घोषित केले आहे. काम्याने आतापर्यंत सातही खंडातील सर्वात उंच शिखर सर करण्याच्या मोहिमेतील सहा टप्पे पूर्ण केले असून या डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन मॅसिफवर चढाई करून ‘सात शिखरांचे आव्हान’ ती पूर्ण करणारी सर्वात पहिली तरुण मुलगी होण्याची तिची इच्छा आहे.”