नीलिमा किराणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शर्वरी या वीकएंडला घरी एकटीच असणार होती, रात्री नेहा सोबत येणार होती, पण तिला उशीर व्हायला लागला तशी शर्वरीला भीती वाटायला लागली. ‘नेहा येईल ना नक्की? उशीर झाल्यामुळे ऐनवेळी रद्द केलं तर मी एकटी कशी राहू?’ असे विचार सुरू असताना नेहा आलीच.
“आलीस एकदाची. मला टेन्शनच आलं होतं.”
त्यावर हसत नेहा फ्रेश व्हायला गेली तोवर शर्वरीने जेवणाची तयारी केली. बोलता बोलता नेहा म्हणाली,
“शरु, पुढच्या महिनाभर तुझी एक पार्टनर रसिका टूरवर आहे आणि दुसरी पंधरा दिवस गावी जायचीय ना? तेव्हा एकटी कशी राहशील?”
“मला एकटं राहायला खूप बोअर होतं बाई. तू येशीलच ना थोडे दिवस?”
“एवढे दिवस नाही जमणार गं, मला इथून ऑफिस लांब पडतं. रुटीनही खूपच डिस्टर्ब होतं.” शर्वरी विचारात पडली. “बघू, मावशीकडे जाईन रहायला, नाहीतर ऋचाच्या हॉस्टेलवर.” यावर नेहा गप्प बसलेली शर्वरीला जाणवलं.
“गप्प का झालीस ग?”
“मावशीकडे छोट्या घरात अडचण नको म्हणून तू या दोघींसोबत फ्लॅट शेअर करते आहेस ना? मग पुनः तिथेच? ऋचाच्या हॉस्टेलवर एवढे दिवस राहिलीस तर तिलाही प्रॉब्लेम येऊ शकतो. दहा-बारा दिवस कुणालाही जास्तच होणार ना?”
“मला एकटीला राहायचा खरंच कंटाळा येतो.”
“कंटाळा येतो की भीती वाटते? तुला पहिल्यापासून भुताची, चोराची भीती वाटते ते आठवतंय मला. अजूनही तशीच भितेस, पण मान्य करत नाहीस.”
“गावी घराला कधी कुलूप सुद्धा लागत नाही. कोणीतरी सोबत असायचीच सवय आहे मला लहानपणीपासून. इथे या शहराच्या गर्दीत सगळेच एकटे,” शर्वरी फुणफुणली.
“मग जा ना गावी परत. इथे कशाला आलीस करिअर करिअर करत?” नेहाच्या म्हणण्यावर शर्वरी गप्प झाली.
“भीतीचं कौतुक करत कायम कुणावर तरी अवलंबून राहायचं की त्या भीतीला सामोरं जाऊन विषय कायमचा संपवायचा हे ठरव एकदा.” नेहा आज सोडायला तयारच नव्हती.
“खूप प्रयत्न केला, पण जमतच नाही.”
“ काय प्रयत्न केला? आज एकटी राहीन म्हणायचं आणि रात्र वाढायला लागल्यावर कासावीस व्हायचं. फोन करून कोणाला तरी बोलवून घ्यायचं. आता उद्याची रात्र एकटी राहूनच बघ. पाहू कुठलं भूत येतंय ते. सोसायटीचं गेट रात्री बंद असतं, शिवाय तीन वॉचमन आहेत. या मजल्यावरच्या चारी फ्लॅटमध्ये लोक राहतात. ते सगळे तुझ्या ओळखीचे आहेत, तरीही नाहीच जमत? मला नाही आवडत माझी मैत्रीण अशी भित्री आणि डिपेंडंट असलेली.”
“खरं आहे, पण ‘जा’ म्हणून भीती जाते का?”
“इथे आल्याआल्या तुला, चुकण्याची भीती वाटायची. कॅबने जायची भीती वाटायची पण जॉब करायचाच आहे म्हटल्यावर जमवून घेतलं, सवय झालीच ना? तशीच ही पण भीती जाईल.”
“पण एवढी का जबरदस्ती? मैत्रिणी कशाला असतात?” शर्वरीला झेपेना.
“मैत्रिणी भित्रेपणा कुरवाळायला नसतात. एखाद्या दिवशी कुणालाच सोबत येणं शक्य नसेल, ऋचा हॉस्टेलवर नसेल्, मावशीकडे पाहुणे आले असतील. अशी वेळ कधीही येऊ शकते. त्यामुळे, उद्याची रात्र एकटं राहण्याच्या भीतीचा बॅरिअर तोडण्यासाठी वापरायची. मी उद्या रात्री सोबतीला येणार नाहीये. आता तू निश्चय कर, की यावेळी मी ऋचा, मावशी कोणाकडेही जाणार नाही. हा गृहीत धरलेला मदतीचा दरवाजा बंद केल्यावर, स्वतःच्या भीतीशी कंपलसरी लढावंच लागेल, उपाय शोधावेच लागतील.”
“कसे?”
“जसं की, रात्रभर दिवा चालू ठेवायचा, आवाज बारीक करून टीव्ही चालू ठेवायचा..”
“पण लाईट गेले तर?”
“तर इमर्जन्सी लॅम्प जवळ ठेव. तुझा विश्वास आहे म्हणून, ‘हनुमान चालीसा’ उशाशी ठेव. कसलाही आधार घे, पण काहीतरी कारणं सांगून भीतीला जस्टीफाय करणं इज नॉट डन शरु. एक रात्र काढलीस की कॉन्फिडन्स वाढेल, मग जमेल हळूहळू. तर, मी उद्या रात्रीऐवजी परवा सकाळी कॉफी प्यायला येते – आत्मनिर्भर झाल्याबद्दल अभिनंदनाचा मोठ्ठा बुके घेऊन.” नेहा हसत म्हणाली.
नेहाचं म्हणणं शर्वरीला पटत होतं. सगळा धीर एकवटून, नेहाचा हात घट्ट धरत ती म्हणाली,
“डन नेहा. आता तात्पुरते उपाय बंद, भीतीला सामोरं जायचा चॉइस करतेय मी. रविवारी सकाळी ब्रेकफास्टला बुकेसह तुझी वाट पाहते.”
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com