Who is Major Sita Shelke: सीतेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या साह्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला ‘राम सेतू’ म्हणतात. आधुनिक काळातील एका सीतेनंही वायनाडमध्ये आभाळ कोसळलं तेव्हा या संकटाला आव्हान देत असाच एक सेतू उभारला. त्या सीतेचं नाव आहे मेजर सीता शेळके. रावणाच्या कैदेतली एक ती सीता होती, जिच्यापर्यंत पोहोचण्याकरिता वानरसेनेनं समुद्रात पूल बांधला. आणि आज एक ही सीता आहे, जिनं रावणापेक्षाही अक्राळविक्राळ संकटाला स्वत:च सेना होत, पूल बांधून आव्हान दिलंय. महाराष्ट्रातल्या अहमदनगरच्या या पोलादी स्त्रीनं आपल्या सहका-यांच्या मदतीनं फक्त १६ तासांत तिच्यासारखाच भक्कम पोलादी पूल बनवला, ज्याचं नाव आहे `बेली ब्रिज´. कुणीतरी पूल बांधुन सोडवायला येईल… ते मी स्वत:च पूल बांधून इतरांना संकटातून सोडवेन… असा हा सीतेचा अनेक युगं पार केल्यानंतरचा प्रवासच सीतेचं बदललेलं रूप दाखवून देतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक युगं पार केल्यानंतरचं सीतेचं बदलेलं रुप

मेजर सीता शेळके यांचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, मेजर सीता शेळके या लष्कराच्या बंगळुरू येथील मद्रास इंजिनियरिंग ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारी आहेत. या मुद्दाही अनेकांकडून वारंवार चर्चिला जात आहे. त्या चर्चा करणाऱ्या सगळ्यांनाच, सीता यांनी, “मी केवळ महिला नाही, तर मी सैनिक आहे”, असं समर्पक अन् चपखल उत्तर दिलं आहे.

केवळ महिला नाही, तर “सैनिक”

अनेकदा आपण सगळेच मिळून कळत-नकळतपणे स्त्रियांना कमकुवत, दुबळ्या लेखत असतो. त्यातच जर एखाद्या महिलेनं धाडसी कामगिरी केली, तर तिथेही तिला हे लेबल लावलं जातं की, महिला असूनही… एका महिलेनं, एकट्या महिलेनं, पहिला महिला वगैरे वगैरे.. यामागे कौतुक असलं तरीही कुठेतरी तिची तुलना ही होतेच. दरम्यान, मेजर सीता शेळके यांनी केलेल्या कामगिरीवर एक नजर टाकू.

‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज

काहीच दिवसांपूर्वीची गोष्ट. केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावं त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावंच नाहीशी झाली. पावसाचं प्रचंड थैमान सुरू असतानाच वायनाड येथे भूस्खलन झालं. शेकडो लोक माती ढिगाऱ्याखाली कायमचे गाडले गेले. मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करण्यासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीनं करणं गरजेचं होतं. या गावांजवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करणं आवश्यक होतं. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला त्यासंबंधीची माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळुरू येथील मद्रास इंजिनियरिंग ग्रुपने आपले ७० जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारं साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केलं. शूर महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके यांच्याकडे या तुकडीचं नेतृत्व सोपविण्यात आलं होतं. ७० जवानांच्या या पथकानं चुरारमला येथे बांधलेल्या बेली ब्रिजचं बांधकाम शेळके यांच्या नेतृत्वाखाली १६ तासांत पूर्ण केलं. दरडीच्या ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या लोकांना उपचारांसाठी तत्काळ हलविण्याकरिता या पुलाचा खूपच मोठा उपयोग होत आहे. तसेच या पुलाचा वापर करून बचाव पथके दुर्घटनाग्रस्त मुंडकाई गावात जलद गतीने पोहोचू शकली.

हेही वाचा >> Who is Major Sita Shelke: ‘फक्त महिला म्हणून पाहू नका’, वायनाडमध्ये नदीवर पूल उभारणाऱ्या सीता शेळके कोण आहेत?

मेजर सीता शेळके यांचा प्रवास

सीता या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या गाडीलगाव या गावात अशोक भिकाजी शेळके या वकिलाच्या पोटी जन्मलेल्या चार अपत्यांपैकी एक. लोणी येथील प्रवरा इंजिनियरिंग महाविद्यालयामधून त्यांनी (मेकॅनिकल) अभियांत्रिकीमधील पदवी प्राप्त केली. अभिमान, अधिकार व सन्मान यांनी ल्यालेला पोशाख अंगावर परिधान करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. म्हणून आधी त्यांनी आयपीएस होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच जोडीला त्यांचे भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्नही सुरूच होते. तिसऱ्या प्रयत्नात त्या एस.एस.बी.परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट चेन्नईमध्ये गेल्या. ना प्रदेश ओळखीचा, ना भाषा; परंतु सीता डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत नेटाने कठीण असा लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि अधिकारी म्हणून त्या मद्रास इंजिनियरिंग ग्रुपमध्ये सामील झाल्या. २०१२ पासून त्या सेवेत असून, आता मेजर या पदावर पोहोचल्या आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayanad landslides rescue under the leadership of sita the bridge was built in just 16 hours rescue work in wayanad under the guidance of sita shelke from maharashtra whos is sita shelke chdc srk