अपर्णा देशपांडे
“ हॅलो फ्रेंड्स! मी आहे आपली लाडकी आर.जे. ढिंच्याक! आजच्या ‘चील मार’ या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ‘बेबीमून’वर. माहीत आहे तुम्हाला, काय असतं ‘बेबीमून?’ नाही माहीत? जाणून घेऊयात आपली मैत्रीण सारिका हिच्याकडून. “हाय सारिका, तू लवकरच आई होणार आहेस. त्याबद्दल तुझं अभिनंदन. तू आणि पती निखिल दोघांचंही अभिनंदन. तुम्ही लवकरच ‘बेबीमून’ साजरा करायला जाणार आहात. काय सांगशील तुमच्या ‘बेबीमून’बद्दल?”
“गर्भारपणापासूनच फक्त त्या होऊ घातलेल्या आईचंच नाही, तर त्या जोडप्याचंच आयुष्य पूर्णत: बदलून जातं. आमचंही तसंच झालं आहे. आता इथून पुढे नेहमीसारखं कधीही केव्हाही उठून आपल्या मनासारखं काही करणं, यावर मर्यादा येणार आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्हा दोघांना आतापर्यंत एकमेकांसाठी भरपूर वेळ मिळत होता, तो आता तितका मिळणार नाही. आमची त्यासाठी मानसिक पूर्ण तयारी आहे; पण काही गोष्टी प्रत्यक्षातही आणाव्या लागणार आहेत. येणाऱ्या बाळाचं नीट संगोपन, वेळोवेळी फीडिंग, त्याच्या आमच्या झोपण्याच्या वेळात बदल, बाळाचा पसारा, आजारपण, देखभाल, डायपर बदलत राहाणं, अशा असंख्य बाबींबाबत काही नियोजन करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी पोटात बाळ असताना- सुरक्षित असताना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवणं म्हणजे ‘बेबीमून’. हनिमूनसारखंच, पण बाळाचा जन्म होण्यापूर्वी त्याच्यासमवेत बाहेर कुठे तरी जवळपास जाऊन, एक-दोन दिवस मस्त घालवून यायचं आणि पुढील येणाऱ्या बदलांना पूर्ण मानसिक तयारीनिशी आनंदाने सामोरं जायचं ही त्यामागची कल्पना. थोडक्यात हनिमून, नंतर बेबीमून.”
“क्या बात! पण याबाबतीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलला की नाही?”
“अर्थातच बोललो. डॉक्टर म्हणाल्या, की शक्यतो चवथ्या ते सहाव्या महिन्यात तुम्ही ‘बेबीमून’ साजरा करून या. फार उशीर नको आणि जाण्यायेण्यास अवघड ठिकाणी जाऊ नका. बाकी सगळी मजा चालेल. स्मोकिंग किंवा मादक पदार्थ सेवन अजिबातच चालणार नाहीत हे त्यांनी कान पकडून सांगितलं आहे बरं का.”
“थॅन्क्स सारिका, आमच्याशी जोडलेली राहा. आता आपल्यासोबत संवाद साधणार आहे, ‘बेबीमून’ साजरा करून आलेली आपली मैत्रीण अनन्या.
“हाय अनन्या. कसा झाला तुमचा ‘बेबीमून’? घरून त्यासाठी काही विरोध झाला का?”
“आमच्या ‘बेबीमून’ला जबरदस्त धमाल आली. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. मला तेव्हा पाचवा महिना सुरू झाला होता. दोघांनीही सुट्टी घेतली होती, त्यामुळे आम्हाला भरपूर निवांत काळ एकमेकांबरोबर घालवता आला. खूप गप्पा मारल्या. भविष्यातील प्लॅनिंगवर बोललो. घरी एरवी निवांत वेळच मिळत नाही ना? आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोललो. बाळाची काळजी घेताना माझ्याकडून नवऱ्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. अशा वेळी त्याने समजावून घ्यायला हवं हे बोललो. जबाबदारी कशी वाटून घ्यायची, संयम कसा राखायचा वगैरे सगळं बोललो. आमच्या लग्नानंतरचा प्रथमच मिळालेला फक्त आमचा ‘टाइम’ एकदम खास होता. आमचा बेबीसोबतचा हा ‘हनिमून’ एकदम भारी झाला. घरून विरोध म्हणशील तर नाही झाला. कुठे उगाच अवघड ठिकाणी जाऊ नका, डोंगर वगैरे चढू नका अशा सूचना आल्या, ज्या बरोबरच आहेत. आमच्या आजींना मात्र हे नसतं फॅड वाटलं. आम्हाला नाही का चार-चार पोरं झाली; पण आम्ही नाही असे कुठे गेलो वगैरे बोलत होत्या. सासूबाई मात्र खूश होत्या. जा, निवांत वेळ घालवून या म्हणाल्या.”
“थॅन्क्स अनन्या. सारिका आणि अनन्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.”
“फ्रेंड्स, घरात बाळाचं आगमन हा नक्कीच खूप आनंदाचा प्रसंग आहे. असं म्हणतात, की बाळाच्या आगमनाने त्याचे आईबाबा एकमेकांच्या आणखी जवळ येतात; पण त्यांच्या नात्यात अशा वेळी दुरावा येऊ नये म्हणून सारिका- निखिलसारखी जोडपी आधी ‘हनिमून’ आणि नंतर योग्य वेळी ‘बेबीमून’ साजरा करतात. अर्थात ‘बेबीमून’साठी घराबाहेर कुठे गेलंच पाहिजे असंही नाही. आपली मैत्रीण योजना हिने तिच्या पतीसोबत मस्त घरातच ‘बेबीमून’ साजरा केल्याचं कळवलं आहे. दोघांनी सुट्टी घेतली, छानसं जेवण बाहेरून मागवलं आणि घरच्या बागेत रात्री चांदण्यात बसून गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेतला. पुढील काही महिन्यांचं प्लॅनिंग केलं. तुम्ही असा काही ‘बेबीमून’ प्लॅन केला असेल तर आम्हाला नक्की कळवा. स्वस्थ राहा, मस्त राहा, भेटू पुढील आठवड्यात आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे, ‘चील मार’!
adaparnadeshpande@gmail.com