Baipan Bhari Deva: केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा सिनेमाने बॉलिवूड- हॉलिवूडच्या कित्येक चित्रपटांना टक्कर देत मराठी भाषारूपी ‘आई’ची आणि प्रत्येक ‘बाई’ची ताकद दाखवून दिली. पण बाईपणाचा गौरव करताना अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या नायिकांविषयी जे लिहिलं गेलं त्यातून एक हास्यास्पद विसंगती अधोरेखित होते. तू चाल पुढं मालिकेतून पुन्हा एकदा घरोघरी पोहोचलेली, बाईपण भारी देवामधील चारू अर्थात ‘दीपा’ विषयी काही लेख अलीकडे वाचले. बहुसंख्य पोस्ट्सच्या शीर्षकात दीपाचा उल्लेख, अंकुश चौधरीची पत्नी असा केला होता. यावरून पटकन डोक्यात एक विचार आला की, यापैकी कोणालाच ‘दीपा’चं नाव/ काम/ ओळख माहीत नव्हती का? अगदी तिच्या एकांकिका, नाटक सोडा पण मालिकाही माहीत नसाव्यात का?
प्रामाणिकपणे सांगायचं तर, आपण लिहिलेला लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून असे वेगवेगळे कीवर्डस वापरावे लागतात आणि त्यानुसारच अंकुशचं नाव अशा शीर्षकांमध्ये जोडलं गेलं असणार. पण या साध्याश्या प्रयत्नापोटी आपण एका सुंदर अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीची ओळखच संपवून टाकतोय हे ही लक्षात घ्यायला हवं. बाईपण भारी देवामध्ये दीपा, अगदीच ओळख ठसठशीत करून दाखवायची असेल तर दीपा परब, व त्याहूनही अधिक अधोरेखित करायचं असेल तर दीपा परब- चौधरी असं नाव लिहिता आलं असतं पण अमुक व्यक्तीची पत्नी म्हणून एखाद्या स्त्रीची ओळख सांगणं हे तिने केलेल्या कामाला पुसून टाकण्यासारखं झालं.
बरं, ही बाब फक्त दीपापुरतीच नाही तर एरवी सुद्धा स्त्रीला तिच्या संबंधित पुरुषांच्या नावाने ओळखण्याची/ संबोधण्याची पद्धतच फार संकुचित वाटते. काही वर्षांपूर्वी जेव्हा ब्रिटनचा राजपुत्र प्रिन्स हॅरी याने अभिनेत्री मेघन मार्कलशी लग्न केलं होतं तेव्हा मेघनची मैत्रीण म्हणून प्रियांका चोप्राची मुलाखत घेण्यात आली होती. एका पत्रकाराने तिच्यासमोर मेघनचा उल्लेख प्रिन्स हॅरीच्या नावाला जोडून करताच प्रियांकाने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आलं होतं, मेघन मार्कल ही स्वतः एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिची ओळख सांगण्यासाठी तिचं काम पुरेसं आहे असं सांगताना प्रियांकाने अगदी सहज वर्षानुवर्षे चालत आलेल्या पुरुषसत्ताक विचारसरणीला आरसा दाखवला होता.
आजच सकाळी क्रिकेटपटू उत्कर्षा पवार हिची एका मुलाखत ऐकली असता तिनेसुद्धा आपल्याला संबोधताना अनेकजण ऋतुराज गायकवाड याची पत्नी असे म्हणत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे “मी फक्त क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची पत्नी नाही तर, स्वतः एक क्रिकेटपटू आहे” हे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत सुद्धा दाखवली. हिंमत म्हणण्याचं कारण असं की, अनेकदा जेव्हा स्त्री स्वतःसाठी अशा प्रकारचा स्टॅण्ड घेते तेव्हा तिला अहंकारी म्हटलं जातं. वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावायला काय लाज वाटते का असंही विचारलं जातं. आपल्या वडील किंवा नवऱ्याने त्यांच्या मेहनतीच्या बळावर केलेल्या कामाचं कौतुक याला त्या व्यक्तीचा अभिमान वाटणं म्हणतात. पण त्यांच्या ओळखीवर आपली ओळख तयार करण्याचा प्रयत्न ही एका अर्थी वशिलेबाजी आहे. कोणत्याच स्त्रीने असा प्रयत्न करण्याची गरज नाही आणि इतरांनीही तिला त्या ओझ्याखाली ठेवण्याचे कारण नाही.
ही बाब केवळ स्त्रियांच्या बाबत नाही तर अनेक धडाडीच्या राजकारण्यांच्या, अभिनेत्यांच्या, उद्योगपतींच्या बाबतही दिसून येते. वडिलांच्या नावावरून झालेलं राजकारण सुद्धा काही महाराष्ट्राला नवं नाहीच. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचा अभिमान वाटणं, आपण आपल्या कामात त्यांनी दिलेला शिकवणीचा आदर्श कायम ठेवणं, हा खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा सन्मान आहे. माझं घराणं कर्तृत्ववान होतं म्हणून माझी ओळख त्या नावावर तयार करणं हा दुबळेपणा आहे. कदाचित, म्हणून समर्थ रामदास म्हणून गेले असावेत, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख!
हे ही वाचा<< आज कोण नागवं झालं? आज कोणी लाज सोडली?
सख्ख्या- पक्क्या नात्याच्या माणसाचं नाव घेऊन स्वतःला गौरवणं हा सोपा स्वार्थ आहे आणि कोणाचंही नाव न लावता स्वतःच्या कामाच्या बळावर स्वतःची ओळख साकारणं हा ‘स्व’त्वाचा अर्थ आहे. हे आपणही लक्षात घ्या आणि यापैकी तुमची ओळख तुम्हाला कशी हवी हे तुम्हीच ठरवा.
-सिद्धी