लेखाच्या हेडिंगवरुन अनेकांना काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट लक्षात आला असेल. पण, हा लेख म्हणजे चित्रपटाचा रिव्ह्यू नाही, तर दैनंदिन जीवनातील अनुभवावरून बाईपण कसं भारी आहे, यावर लक्ष केंद्रित करणारा आहे. मात्र, त्याआधी चित्रपटातील काही गोष्टी इथे मुद्दाम सांगाव्याशा वाटतात. चित्रपटाचा ट्रेलर पाहून थोडंफार लक्षात आलं होतं, की कथा कशावर आधारित आहे. पण ते म्हणतात ना, स्वतः चित्रपट पाहावा मगच त्यावर भाष्य करावं. चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, हे इथे सांगून चित्रपट पाहणाऱ्यांचा उत्साह कमी करणार नाही; पण तो पाहावा असं नक्की सुचवेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: ती’ आली धावून!

सहा महिला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांना चित्रपटात केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यातील आवर्जून सांगावासा वाटणारा पहिला मुद्दा म्हणजे मेकअप. मेकअप हा प्रत्येक स्त्रीला आवडतो. आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येकजण तो कॅरी करत असतो. काहींना डार्क तर काहींना लाईट मेकअप आवडतो. काही स्त्रिया या मेकअपच्या मागे दिवसभरातील आपला थकवा, तणाव, घरात झालेली मारहाण हे सगळं लपवण्याचाही प्रयत्न करतात. अनेकदा या मेकअपमुळे अनेकांची लग्नगाठही जुळलेली असते. इथे मेकअप उतरला आणि तिथे आपलाच जोडीदार आपल्याला कमी लेखायला लागतो… मेकअप हा शब्द छोटा वाटत असला तरी त्यामागची मोठी गोष्ट चित्रपट पाहताना जाणवते आणि ती खऱ्या आयुष्यातही तितकीच लागू होते.

आणखी वाचा: आहारवेद : निकोप वाढीसाठी उपयुक्त बाजरी

दुसरा मुद्दा म्हणजे ‘मेनोपॅाज’, मराठीत त्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात. एका विशिष्ट वयानंतर महिलेला तिची मासिक पाळी येणं बंद होतं. महिलांच्या प्रजनन चक्राचा तो शेवटचा टप्पा मानला जातो. त्यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होते. कायम नवरा, मुलं, सासू-सासरे, सासरच्या आणि माहेरच्या मंडळींसाठी धडपडणारी स्त्री कधी मेनोपॅाजच्या टप्प्यावर येते हे तिचं तिलाच कळत नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा तिच्या लक्षात येतं अरेच्चा… आपण आपलं अर्ध आयुष्य नीट जगलोच नाही. खऱ्या आयुष्यातही अनेक महिलांच्या बाबतीत असंच होत असावं. कारण घर, नाती आणि काम एकत्रित सांभाळताना तिची होणारी फरफट काही नवीन नाही. इतरांसाठी जगताना आपण स्त्रिया स्वतःसाठी जगणं का विसरून जातो? कारण स्वतःला आपण कायमच गृहीत धरत आलो आहोत. पण, काही महिला नक्कीच त्याला अपवाद आहेत.

आणखी वाचा: आहारवेद : प्रथिनांचा साठा ‘ज्वारी’

या सगळ्याची आकडेवारी देण्याची गरज नाही, कारण आपल्या आसपास त्याची खूप उदाहरणं आहेत. त्यादिवशी चित्रपट पाहण्यासाठी बहुसंख्य महिलांचीच गर्दी होती. चित्रपटाच्या काही संवादांवर महिला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होत्या. तर काही भावनिक दृश्यांवर महिला “हो खरंच आहे”, असं म्हणत होत्या. चित्रपटगृहातील त्या शांततेत हळूच महिलांकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया खूप बोलक्या होत्या. जणू तिथे असणारी प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यातील प्रसंग आठवून त्याला दाद देत होती. माझ्या बाजूला असणाऱ्या दोन वयस्कर महिला त्यांच्याबरोबर आलेल्या तरुण मुलीला देखील हेच सांगत होत्या. खरंच, स्त्रियांचं आयुष्य हे असंच असतं. हे बोलताना त्या तिला सांगत होत्या की, “बाई तू तुला हवं ते कर, लग्नाआधी हवं तसं जग नंतर हौस-मौज करता येईल की माहीत नाही. हेच तर आहे ना, आपण स्वतःला गृहीत धरतो. लग्नानंतर आपल्याला आपली आवड निवड जपता येणार नाही. हे आपणच म्हणत असू तर इतर लोक तरी आपला विचार का करतील?

पुन्हा एकदा सांगते, चित्रपटाची वाहव्वा करणं हा इथे उद्देश नाही. पण, पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडू पाहत असेल तर त्यातच त्या चित्रपटाचं यश आहे, असं मला वाटतं. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटगृहाबाहेर पडणाऱ्या त्या स्त्रियांमध्ये एक स्वीकृती होती, स्वतः बद्दलची. स्वतःसाठी काही गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत, याची त्यांना खंत होती. पण, आपण आपला वेळ घर, कुटुंब, संसार आणि काम यासाठी दिला याचा कसलाच पश्चातापही त्यांना नव्हता. आणि यालाच तर “बाईपण” म्हणतात नाही का? स्त्रियांमधील प्रेम, संयम आणि त्यागाची भावनाच तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. हा म्हणजे त्याचा अर्थ असा नाही, की स्त्रियांनी कायमच चूल आणि मूल या चक्रात अडकून राहावं. स्वतःसाठी वेळ काढून एकदा तरी जगावं.

चित्रपटातलं आणखी एक वाक्य जे मला खूप आवडलं. ‘YOLO’ म्हणजे You Only Live Once तुम्ही फक्त एकदाच जगता. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग वेगवेगळ्या कारणांनी आला असेल. पण स्त्रियांनी रोजच्या धकाधकीतून थोडावेळ विश्रांती घेताना YOLO हे वाक्य नक्की आठवावं. मुळात बाईपण हे भारीच असतं. ते सांगण्यासाठी खरंतर कोणत्याही चित्रपट, सीरिज किंवा नाटकाची गरज नसते. परंतु, मनोरंजनाच्या माध्यमातून ते वारंवार का मांडलं जातं याचा विचार स्त्रियांसह पुरुष वर्गानेही करणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva womanhood is awesome but why we need to keep saying that chatura pck
Show comments