सगळं काही आनंदात आणि सुरळीत सूरू असताना अचानक एक घटना घडते आणि संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. काहीजण अपघातापुढे अपयश स्वीकारतात, तर काहीजण पुन्हा शुन्यापासून सुरुवात करून यशाकडे मार्गक्रमण करतात. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनाक्षी वाळके. चंद्रपूरमध्ये राहणारी मिनाक्षी वाळके ही सामान्य महिला आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. नुकताच त्यांच्यावर एक लघुपट देखील प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेमिनी कुकिंग ऑईलच्या #EkAurPehechan या अभियानाअंतर्गत मिनाक्षी वाळके यांच्या जीवनावर चित्रित करण्यात आलेला लघुपट प्रदर्शित झाला. त्यातून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला पुन्हा एकादा नव्याने त्यांची ओळख झाली. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे मिनाक्षी यांचं बालपण गेलं. पुढे शालेय आणि दोन वर्ष बीएससीचं महाविद्यालयीन शिक्षणही त्यांनी तिथेच घेतलं. २०१४ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या देखील एका सामान्य गृहिणीप्रमाणे पती, मुलगा, सासू अशा आपल्या छोट्याशा संसारात रमल्या होत्या. अशातच २०१८ मध्ये मिनाक्षी या सात महिन्याच्या गरोदर असताना त्यांचा गर्भपात झाला आणि एकाएकी त्यांचं आयुष्यचं थांबलं. अर्थात कुठल्याही महिलेसाठी हा एक ट्रॉमाच असेल. या धक्क्यातून आपण सावरूच शकणार नाही अशी त्यांची परिस्थिती होती. या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी मिनाक्षी यांना त्यांच्या कुटुंबाने मोठी साथ दिली. मिनाक्षी यांच्यात अंगभूत कौशल्य होतंच, फक्त गरज होती ती इच्छाशक्तीला आकार देण्याची. मग काय, चंद्रपूरच्या रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरमधून त्यांनी ७० दिवसांचं बांबू प्रशिक्षण घेतलं आणि इथून पुढे सुरू झाला ‘बांबू लेडी’चा प्रेरणादायी प्रवास.

हेही वाचा: बाईपण खरंच भारी देवा! पण सतत सांगण्याची गरज का भासते?

राखी, दिवाळीतील लॅम्प, तोरण, बांबूचे दागिने अशा १०० ते १५० प्रकारच्या वस्तू त्या बनवतात. या वस्तूंची विक्री आज भारतातच नव्हे तर परदेशातही होत आहे. आपल्यासारखंच इतर महिलांचं देखील आर्थिक सक्षमीकरण व्हावं, यासाठी त्यांनी ‘अभिसार इनोव्हेटिव्ह्स’ची स्थापना केली. गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी देशाच्या ग्रामीण भागातील १२०० ते १५०० महिला, मुलींना बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण दिलं आहे. शिवाय रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या ‘बांबू उद्योजकता आणि रचना’ या विषयासाठी त्या अभ्यागत प्राध्यापिका म्हणून आज शिकवत आहेत. शिवाय चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहातील महिलांनाही त्या बांबूकलेचे धडे देत आहेत.

५० रुपयांपासून व्यवसायाला सुरुवात

बांबूकलेचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आता खरी गरज होती ती व्यवसाय सुरू करण्याची. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात? काय करावं? हा प्रश्न मिनाक्षीसमोर होता. त्याचंही उत्तर त्यांनी स्वतःच शोधलं. प्रशिक्षण केंद्रातून मिळालेलं टूलकिट आणि ५० रुपयांचा बांबू विकत घेत त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.

बांबूवर क्यूआर कोड स्कॅनर साकारण्याचं आव्हान

बांबूपासून राखी, तोरण, दागिने या वस्तू तयार करणं ठीक होतं. पण, क्यूआर कोड स्कॅनर आणि तेही थेट बांबूवर साकारायचं? कसं शक्य आहे? हा प्रश्न एका सामान्य व्यक्तीला पडल्याशिवाय राहत नाही. मिनाक्षी यांच्या पतीच्या मित्राने हे क्यूआर कोडचं आव्हान दिलं. मिनाक्षीनं हे आव्हान नुसतंच स्वीकारलं नव्हे, तर यशस्वीही करून दाखवलं. सध्या आपल्याकडे प्लास्टिकचा क्यूआर कोड तयार केला जातो. मात्र, बांबूपासून स्कॅनर साकारला तर तो इको फ्रेंडलीही होईल या विचाराने त्यांनी काम सुरू केलं. एकदा, दोनदा, तीनदा प्रयत्न केल्यानंतर लेझर तंत्रज्ञानाच्या मदतीने अखरे बांबूवर क्यूआर कोड स्कॅनर साकारण्यात यश आलं. देशातील हा पहिलाच अनोखा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.

आज मिनाक्षी यांची जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. मिनाक्षी यांनी तयार केलेली बांबूची गणेश मूर्ती, तिरंगा ध्वज लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयातही देण्यात आले आहेत. मिनाक्षी यांच्या कलेच्या जोरावर त्यांना आणखी एक संधी मिळाली, ती मुकुट तयार करण्याची. हे ही आव्हान त्यांनी स्वीकारलं. बांबूपासून तयार केलेले मुकुट ‘मिस क्लायमेट २०१९’ या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेसाठी दिले गेले. प्रथमच एखाद्या सौंदर्य स्पर्धेत अशा प्रकारे बांबूपासून तयार केलेले मुकुट वापरण्यात आले होते. मिनाक्षी यांना बांबू क्षेत्रातील कामगिरीसाठी लंडनच्या ‘इन्स्पायरिंग इंडियन वुमन’तर्फे सन्मानितही करण्यात आलं आहे. शिवाय ‘लोकसत्ता’चा तरुण तेजांकित, यशवंतराव चव्हाण सेंटरचा राज्य युवा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. इतकंच नव्हे तर ‘बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र’ कोण? या प्रश्नाचा स्पर्धा परीक्षेतही समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: ग्राहकराणी : रिपोर्ट चुकीचे दिल्यास भरपाई?

एकेकाळी स्वतः नाउमेद झालेल्या मिनाक्षी आज हजारो महिलांना आर्थिक सक्षम करत आहेत. शिवाय महिलांनी आपल्या अंगभूत कलागुणांना वाव द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. आयुष्य बदलण्यासाठी एक गोष्टही पुरेशी असते. मीनाक्षी यांच्या आयुष्यातील ती एक सकारात्मक गोष्ट म्हणजे ‘बांबू’. आज बांबूला त्या आकार देत असल्या तरी बांबूनेच त्यांच्या आयुष्याला नवा आकार दिला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bamboo lady of maharashtra minakshi walke break down by the miscarriage but then built a successful business pck
Show comments