निराधार आरोपांनी विवाहाचा पायाच हलतो आणि अशा वैवाहिक नात्यात राहणे जोडीदारास असह्य आणि अशक्य होते. पतीचे पत्नीच्या चारित्र्यावरील निराधार आरोप ही मानसिक क्रुरताच आहेत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलत्या सामाजिक परीस्थितीत घटस्फोट आणि तत्सम वैवाहिक याचिकांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यातच क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोट मागणार्‍या याचिकांची संख्या लक्षणीय आहे. आपल्याकडील कायद्यानुसार शारीरिक आणि मानसिक क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोट मागता येतो. क्रुरतेकरता घटस्फोटाची कायदेशीर तरतूद असली तरी क्रुरतेची त्रिकालाबाधित व्याख्या करणे हे जवळपास अशक्य आहे. एखादे कृत्य क्रुरता ठरते का? हे एकंदर त्या त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या काळाच्या कसोटीवर तपासणे आवश्यक असते.

असेक एक प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोचले होते. पत्नीच्या चारित्र्यावर निराधार संशय घेण्यास क्रुरता म्हणता येईल का? हा या प्रकरणातला कळीचा मुद्दा होता. या प्रकरणात विवाहानंतर काही काळ सगळे व्यवस्थित होते. कालांतराने पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. पत्नीचा फोन तपासणे, त्याच कारणास्तव शारीरिक इजा करणे अशा प्रकारांना सुरुवात झाली. एकदा तर पत्नी दुसर्‍या व्यक्तीकडून गर्भवती असल्याचा आरोप केला गेला. मात्र पत्नीच्या तपासणीअंती पत्नी गर्भवती नसल्याचे निष्पन्न झाले. या सगळ्याला कंटाळून पत्नीने घटस्फोटाकरता याचिका दाखल केली. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

हेही वाचा: विवाह अवैध ठरला तर पोटगीसारखे कायदेशीर हक्क गमवावे लागणार का?

उच्च न्यायालयाने- १. उभयतांमधल्या नात्याबद्दल वाद नसून, पत्नी क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोटास पात्र आहे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, २. पत्नीचे परपुरुषाशी संबंध असून ती त्याच्याशी विवाहास इच्छुक असल्याचा आरोप पतीद्वारे करण्यात आल्याचे उलटतपासणीत बर्‍यापैकी सिद्ध झालेले आहे, ३. विवाह आणि वैवाहिक नाते हे मुख्यत: विश्वासावर आधारेलेले असते, जेव्हा एखादा जोडीदार दुसर्‍या जोडीदारावर विनापुरावा चारित्र्यहननाचा आरोप करतो तेव्हा अशा आरोपास बिनबुडाचा आरोपच म्हणावे लागेल. ४. अशा निराधार आरोपांनी विवाहाचा पायाच हलतो आणि अशा वैवाहिक नात्यात राहणे जोडीदारास असह्य आणि अशक्य होते. ५. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पतीचे पत्नीच्या चारित्र्यावरील निराधार आरोप हे मानसिक क्रुरताच आहेत असे आमचे मत आहे. ६. साहजिकच या प्रकरणात पत्नीने मानसिक क्रुरता सिद्ध केलेली आहे असे म्हणावे लागेल. ७. उभयतांनी एका समारंभात एकत्र हजेरी लावल्याच्या कारणास्तव उभयतांना घटस्फोटाची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष काढून कौटुंबिक न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळली होती. ८. एखाद्या समारंभात उभयतांनी एकत्र हजेरी लावली म्हणजे त्यांच्यात सारे काही आलबेल आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. उभयतांच्या एकत्र हजेरीचा एक फोटो वास्तवदर्शी आहे असे म्हणता येणार नाही अशी निरीक्षणे नोंदविली आणि पत्नीची याचिका मान्य केली.

हेही वाचा: अवघ्या १६ व्या वर्षी काम्या कार्तिकेयन ठरली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिला भारतीय मुलगी

कोणत्यातरी समारंभातील एकत्रित हजेरीच्या फोटोवरून वैवाहिक नात्यातील वास्तवाचा निष्कर्ष काढता येऊ शकत नाही हे उच्च न्यायालयाचे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. पत्नीवर चारित्र्यहीन असल्याचे निराधार आरोप करणे क्रुरता ठरविणारा म्हणूनसुद्धा हा निकाल महत्त्वाचा आहे. एखाद्या प्रकरणातील परिस्थिती आणि बदलती सामाजिक परिस्थिती याच्या अनुषंगाने एखादे कृत्य क्रुरता ठरते किंवा नाही हे ठरविण्याकरता, कायद्याचा अर्थ लावण्याच्या न्यायालयीन अधिकारांचा उपयोग होत असतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा: थेट King charlesला भेटली पिंक रिक्षा चालवणारी १८ वर्षीय आरती, जिंकला युकेचा रॉयल ॲवॉर्ड, वाचा प्रेरणादायी गोष्ट

कोणत्याही नात्यात, विशेषत: वैवाहिक नात्यात विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. परस्परांप्रती असा विश्वास असल्याशिवाय असे वैवाहिक नाते टिकणे किंवा अशा वैवाहिक नात्यात आनंदाने राहणे हे केवळ अशक्य आहे. बदलत्या काळात विविध सामाजिक आणि तांत्रिक प्रगतीचे फायदे आपण अनुभवतोय. मात्र याच सामाजिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे, वैवाहिक नात्यातील अविश्वास वाढायला लागलेला आहे हे खेदजनक असले तरी वास्तव आहे. या सगळ्याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baseless suspicion on the character of spouse is cruelty css