डॉ. नागेश टेकाळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनात असूनही लहान बागेची हौस पूर्ण करता आली नाही, तरी या सर्वांची एकमेव प्रतिनिधी म्हणून तुळस ही जवळपास सर्वाच्याच घरी असते.

वास्तू आणि तुळस यांचा संबंध पुराणकाळापासून आहे. तुळस ही लहान गटात मोडणारी वनस्पती म्हणूनच ती कुंडीत छान दिसते. तिचे आयुष्य जेमतेम दोन वर्षं असले तरी एक वर्षांपर्यंत ती छान फुलून भरपूर मंजिऱ्या देते. गॅलरीत अथवा स्वयंपाकघरालगतच्या सज्जात कुंडीत विसावलेली तुळस बंगलेवाल्यांच्या घरासमोर मोकळ्या सिमेंटच्या जागेत वृंदावनरूपात आढळते. अनेक लोक म्हणतात ‘तुळस आमच्याकडे वाढतच नाही.’ मात्र असे काही नाही. थोडी काळजी आणि प्रेम दिले तर ती अंगणात नसली तरी तुमच्या वास्तूमध्ये सुरेख डेरेदार होऊ शकते.

?तुळशीचे रोप कुठेही उपलब्ध असते. मात्र, लावण्यापूर्वी ते लहान आणि निरोगी असावे.

?कुंडी उभी आणि मध्यम आकाराची असावी. आतील मातीमध्ये एक ओंजळ शेणखत मिसळावे. कुंडी काठोकाठ भरू नये.

?तुळशीचे रोप मुळांच्या मातीसह कुंडीच्या मध्यावर खोलगा करून लावावे. मातीवर व्यवस्थित दाब देऊन रोप उभे राहील याची काळजी घ्यावी व नंतर हलके पाणी दिल्यावर तुळस दोन दिवसांत स्थिरावते.

?तुळशीची वाढ तीन महिन्यांत पूर्ण होते त्यावेळी उंची अंदाजे दोन फूट असते. तिची वाढ सुरू असताना खालची मोठी पाने हलक्या हाताने नियमितपणे काढून खोडास थोडे मोकळे करावे.

?दर दोन आठवड्यांनी वरचे एक-दोन शेंडे खुडल्यास त्याच्या खालून फांद्या फुटून तुळस डेरेदार होते.

?तुळशीची मंजिरी खालून वर उमलत जाते. पूर्ण उमल्यानंतर ती हळूच काढावी. तुळशीवर मंजिऱ्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास तिचे आयुष्य वाढते.

?एक-दोन मंजिरीमध्ये बिया तयार होऊ द्याव्यात. या बिया त्याच कुडीत खाली पडून त्यांची रोपे तयार होतात. मातृतुळस आणि तिची ही छान छान बाळे पाहणे हे एक विलोभनीय दृष्य असते.

?तुळशीस पाणी नियमित हवे, मात्र जेमतेम अर्धा पेला. दूधमिश्रित पाणी शक्यतो टाळावे. पाणी घालताना ते पानावर शिंपडून नंतर कुंडीत घालावे. पाण्याची धार मोठी असल्यास मुळे उघडी पडतात.

?तुळशीस खताची गरज नसते आणि तिच्यावर कीडसुद्धा पडत नाही. पाणी दिल्यानंतर कुंडीमध्ये लाकडाच्या भुशाचा थर दिल्यास आपण तुळशीस घरी एकटे ठेऊन दोन-तीन दिवस गावीसुद्धा जाऊ शकता.

?तुळस ही सुदृढ पर्यावरण आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिच्या सहवासात ताणतणाव कमी होतो, मनाची एकाग्रता वाढते आणि मुलांचा अभ्यासही छान होतो, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. म्हणूनच अनेक आदर्श शाळांमधे तुळस बागेची कल्पना रूढ होताना दिसत आहे.

तुळस ही स्त्रीचे ऊर्जास्तोत्र आहे. ‘स्त्री आनंदी तर घर आनंदी’ म्हणूनच भारतीय संस्कृतीत तुळसभरल्या घराचे प्रतीक समजतात. या प्रतीकरूपी देवतेस प्रत्येक घरात सन्मानाचे स्थान मिळणे ही खरी पर्यावरण आणि निसर्गाची पूजा आहे. आणि अशा पूजेसाठी तुमच्या वास्तूपेक्षा दुसरे वेगळे देवालय ते कोणते असणार!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basil is a plant widely used in india and mostly placed outside of house asj