अर्चना मुळे
“आई, आपण दिवाळीची खरेदी कधी करायची? मी डिझायनर वन-पीस घेणार आहे.”
“बरं. पण तुझा ड्रेस कुठून घ्यायचा ते ठरवलं आहेस का?”
“ऑनलाइन बघून ठेवलाय मी. तोच घेणार आहे. खूप मस्त आहे.” “अगं, वेळ किती कमी राहिलाय बघ. कपडे, आकाशकंदील, रांगोळी, पणत्या, सजावटीचं साहित्य, सगळंच आणायचंय. शिवाय लाडू, चकली, शेव, चिवडा, चिरोटे या सगळ्याचं सामान आणावं लागणार आहे. तुला तुझ्या ड्रेसमध्येच इंटरेस्ट फक्त. बाबांना कुठलीच खरेदी करायला वेळ नसतो. उलट त्यांचेही कपडे मलाच खरेदी करावे लागतात. आता नुसती धावपळ होईल.” “कशाला पळायचं? तू लिस्ट काढून दे. सगळं सामान ऑनलाइन मागवते. तुला दुकानात जावंच लागणार नाही.”
आजकाल शिरीषाला बाहेर जायचा कंटाळा यायचा. तिनेही सगळ्या सामानाची पटकन लिस्ट काढून दिली. कपड्याच्या ऑनलाइन खरेदीवर ५० टक्के सूट अशी ऑफर होती. किराणा सामानामध्ये दिवाळी म्हणून एक किलो साखर आणि एक किलो तेल फ्री मिळणार होतं. काही वस्तूंवर खोबरेल तेल, उटणं, साबण अशा वस्तू फ्री होत्या. या सगळ्या ऑफर्स बघून किती पैसे वाचतील किंवा जास्तीच्या वस्तू कशा मिळतील यावर चर्चा झाल्या. खरं तर अशा ऑफर्स ऑफलाइन शॉपिंगमध्येही असतात. पण ही शॉपिंग घरबसल्या होणार होती. त्यामुळे आधीच घर स्वच्छ करण्याने दमलेली शिरीषा खूश होती. लिस्टप्रमाणे त्यांची ऑनलाइन खरेदी झालीसुद्धा.
आणखी वाचा-लग्नापूर्वीच घटस्फोटाची शक्यता गृहित धरून करार करावा का?…
दुसऱ्याच दिवशी सगळं सामान घरपोच झालं. सामान बघून मात्र शिरीषाने कपाळावर हात मारला. कारण सगळ्या सामानात गडबड होती. हरभरा डाळ मऊ होती. शेंगदाणे देशी हवे होते. ते वेगळेच आले होते. हवं असणारं तेल उपलब्ध नाही म्हणून वेगळ्याच कंपनीचं पाठवलं होतं. साखरही काळसर होती. ऑफर्समधील वस्तूंना क्वालिटीच नव्हती. बाबांना घेतलेले एकावर एक फ्रीमध्ये सेम दोन शर्ट आले होते. शिरीषाची चिडचिड चालू झाली. लेकीला वाट्टेल ते बोलून झालं. एकूणच शिरीषाचं आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास झाला होता. मुळात शिरीषाला ऑनलाइन सेल असतो हे माहीतच नव्हतं किंवा तिला घरबसल्या खरेदीचा अनुभव नव्हता. हा अनुभव लेकीने तिला दिला खरा, पण आता शिरीषाला लेकीचा खूप राग येत होता. सेलचं आकर्षण कसं वाईट असतं, वगैरे ती बडबडत होती. “मी हातात वस्तू घेऊन ते हाताळल्याशिवाय खरेदी करायला नको होतं. डोळ्यांनी बघून आणि हाताने स्पर्श करून जी खरेदी होते त्यात वेगळाच आनंद असतो. या ऑनलाइन शॉपिंगचा त्रासच झाला नुसता.
यंदा दिवाळीची सुरुवातच खराब झाली.” शिरीषाच्या आनंदावर विरजण पडलेलं पाहून लेकीला वाईट वाटलं. तिने कपडे तर परत पाठवले. रिफंडसाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. किराणावाला त्याच शहरातला होता. त्याच्याकडून त्यातील नको असलेलं सामान बदलून आणलं. पण तरीही शिरीषाला मात्र या सगळ्याचा खूप मानसिक त्रास झाला. आधीच वेळ झाला होता. आता आणखी वेळ झाल्यामुळे तिच्यावरचं दडपण वाढलं होतं. शिरीषाने दिवाळीची तयारी सुरू केली. मध्ये आठ दहा दिवस गेले. शिरीषाला खरेदीतील कपड्यांचे पैसे आले नाहीत याची आठवण झाली. आता या माय-लेकींचा त्या ड्रेसच्या बदल्यात पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. सगळा वेळ त्यातच जाऊ लागला. त्यांनी परत परत त्या कंपनीला ईमेल पाठवले. रिप्लाय आला नाही. कंपनी मोठ्या शहरातील होती. त्यांचा पत्ता होता, पण ते खरं ऑफिस नसावं. काही कळत नव्हतं. तरी त्या कंपनीचा पाठपुरावा करतच तिची दिवाळी संपली. त्यानंतर तिने पुन्हा कंपनीकडे मागणी केली. त्यानंतर दोन महिन्यांनी तिला कळलं, की कंपनी फ्रॉड होती. ती बंद झाली.
आणखी वाचा-नातेसंबंध: नवऱ्याची एक्स अजूनही फोन करते?
तिने तिच्याजवळ असणाऱ्या पुराव्यानिशी ग्राहक तक्रार आयोगाकडे तक्रार केली. तिचे पैसे वाया गेले होते. आता रडूनही उपयोग नव्हता. परिस्थिती स्वीकारायला दोघींनाही वेळ लागला. ऑनलाइन असो की ऑफलाइन, सेल्ससारख्या आकर्षणाला बळी पडू नये. इथे मोठ्या प्रमाणात फसगत होण्याची शक्यता असते. अशा आकर्षणापोटीच शिरीषाची फसगत झाली. ग्राहकराणी, दहा दिवसांवर दिवाळी आली आहे. या बाजारपेठेची तू सगळ्यांत मोठी ग्राहक आहेस. तुझ्याजवळचा पैसा ग्राहक म्हणून खर्च करताना नीट काळजी घेशील. वस्तू आणि सेवा खरेदी करताना ग्राहक हक्क नीट समजून घेशील. सगळी बिलं नीट बघशील. ती बिलं जपून ठेवशील. नंतर तक्रारीला संधी नको. वर्षातून एकदाच येणारा दिवाळी हा सण. दिवाळी आनंदात जावी आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून कोणत्याही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन खरेदी करणं टाळावं.
१) वस्तूची सुरक्षितता उत्पादक कंपन्यांनी जपलेली असावी.
२) इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना आयएसआय किंवा ॲगमार्कचं चिन्ह असणाऱ्या वस्तूच खरेदी कराव्यात.
३) कोणत्याही वस्तूची संपूर्ण माहिती घेण्याचा अधिकार आपल्याला असतो. त्यामुळे नि:संकोच प्रश्न विचारून समाधान झाल्यावरच वस्तू खरेदी करावी.
४) एवढं करूनही आपली फसवणूक झाली आहे असं वाटलं तर ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे तक्रार करण्याची सोय सरकारने केली आहे, हे नेहमी लक्षात ठेवावं.
archanamulay5@gmail.com