डॉ. वैशाली वलवणकर
सर्व चतुरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केस. स्त्री अथवा पुरुष व्यक्तीचे व्यक्तिमत्व केसांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. केसांचे सौंदर्य सुद्धा केवळ लांबीवर अवलंबून नसते तर ते किती निरोगी चमकदार आहेत यावर अवलंबून असते. सध्या जवळपास ९० टक्के लोकांना केसांच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या कोणत्या आणि त्यावर उपाय कोणते ते आपण पाहू यात.
आणखी वाचा : सुंदर मी होणार! – त्वचेचे सौंदर्य
केसांविषयीच्या समस्या
१) केस गळणे / तुटणे
२) कोंडा होणे
३) केस पांढरे होणे (पालित्य)
४) टक्कल पडणे
आणखी वाचा : सुंदर मी होणार – काळजी तेलकट त्वचेची
१) केस गळणे /तुटणे
प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सुमारे एक ते दीड लाख केस असतात. त्यातले ६० – ७० केस गळणे हे नॉर्मल असते. प्रत्येक केस हा तीन टप्प्यांमधून जात असतो. ॲनोजेन, कॅटाजेन आणि टिलोजेन. टिलोजेन टप्प्यामधील केस जावून नंतर त्या जागी नवीन केस येतो. जर गेलेल्या केसाच्या जागी नवीन केस आला नाही तर मग केस विरळ होत जातात.
केस गळण्याची प्रमुख कारणे
१) हार्मोन्समधील असंतुलन (उदाहरणार्थ थायरॉईड, PCOD)
२) मानसिक ताणतणाव
३) जीवनसत्त्वांची कमतरता
४) तीव्र रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर.
५) हेअर ड्रायरचा अति वापर
६) हेअर डायचा वापर
आणखी वाचा : सुंदर मी होणार – चेहरा उजळवण्यासाठी…
केसांच्या आरोग्यासाठी काय टाळावे
१) केस धुण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करू नये.
२) केस ओले असताना विंचरू नयेत.
३) केस धुण्यासाठी तीव्र शाम्पूचा वापर करू नये.
४) केसांना जास्त घट्ट क्लीप अथवा रबर बँड बांधू नये.
५) कृत्रिम रंगाचा (डायचा) वापर शक्यतो टाळावा.
६) केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा सतत वापर करू नये. हेअर ड्रायरमध्ये असणाऱ्या गरम हवेच्या वापरामुळे केसांचे क्युटिकल ओपन होतात आणि केसांच्या शाफ्टला इजा होते. केसांमधील नैसर्गिक तेलांचा ऱ्हास होवून केस अधिकाधिक कोरडे होतात आणि त्याचा लवकर गुंता होतो. तसेच डोक्याची त्वचा (SCALP) ला सुद्धा कोरडेपणा येवून केसांत कोंडा होतो.
७) केस सतत विंचरू नयेत.
८) पमिंग, रिबॉडिंग, हायलाटनिंग अशा कृत्रिम प्रकारांचा वापर टाळावा.
९) बाहेर जाताना केस मोकळे सोडू नयेत.
१०) पांढरे झालेले केस तोडू नयेत किंवा ओढून काढू नयेत.
११) अति प्रमाणात मानसिक किंवा शारीरिक त्रास करून घेवू नये.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : सेक्स्च्युअल शेअरिंग म्हणजे काय गं?
मजबूत केसांसाठी काय करावे
१) रोज १० – १२ ग्लास पाणी प्यावे.
२) आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळाशी हलक्या हाताने तेलाने मसाज करावा.
मसाजसाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचा वापर करू शकतो. तसेच आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाचाही वापर करू शकतो. मालिश नेहमी हलक्या हातानेच करावी. केस जास्त जोरात चोळू नयेत.
३) आठवड्यातून एकदा केसांना वाफ द्यावी.
४) तीन महिन्यातून एकदा केसांची टोके कापावीत. (ट्रीमिंग करावे.)
५) केसांमध्ये कोंडा होणार नाही याची काळजी घ्यावी.
६) आहारात कॅल्शिमयुक्त पदार्थांचा (उदाहरणार्थ दूध, पनीर, पालक, खारीक, खाण्याचा डिंक, तूप), हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
तसेच जीवनसत्व ‘ब’ असणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.
(उदाहरणार्थ – हातसडीचा तांदूळ, यीस्ट, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या)
७) नेहमी आनंदी रहावे. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी ध्यान करावे.
८) अनुलोम – विलोम, कपालभाती अशा प्राणायामच्या क्रियांचा अवलंब करावा.
९) आठवड्यातून दोनदा नस्य करावे. (नाकात औषध टाकणे)
१०) आठवड्यातून एकदा पादाभ्यंग करावे. (तळपायांना तेल लावावे)
११) बाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा.
v.valvankar@gmail.com