फलाहार हा उत्तम आरोग्याचा मंत्र आहे, असं म्हणतात. हीच फळं आपली त्वचादेखील सुंदर ठेवतात. यात प्रामुख्याने संत्री, पपई, लिंबू याचा वापर सर्वश्रूत आहेच. पण केळ हे फळ देखील त्वचेला सुंदरता देऊ शकतं असं म्हटलं तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे… इन्स्टंट एनर्जी देणारं फळ म्हणजे केळं. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. केळं त्वचेसाठीही अत्यंत गुणकारी असतं, हे तुम्हाला माहिती आहे का? केळ्यामध्ये केरोटीन, व्हिटॅमिन इ, बी वन, बी आणि सी अशी पोषणमूल्य असतात. त्यामुळे केळं तुमच्या त्वचेला चमकदार आणि तरुण ठेवण्यात मदत करतं. केळ्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपली त्वचा मऊसूत राहाते. बनाना फेस मास्कमुळे त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज होते. त्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि डागविरहीत होऊ शकते, नैसर्गिकरित्या त्वचा उजळते. स्कीन टाईटनिंगसाठी आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी केळ्याचा उपयोग होतो. रुक्ष, निस्तेज त्वचेला चमकदार होण्यासाठीही बनाना फेस मास्क अगदी उपयुक्त ठरतो. केळ्याबरोबर दूध, मध, लिंबू अशा गोष्टी वापरून तुम्ही हा बनाना फेस मास्क घरच्याघरी तयार करु शकता.
आणखी वाचा : T20 World Cup 2023: ‘आम्हाला माहित आहे काय महत्वाचे आहे’; भारत-पाक सामन्यापूर्वी हरमनप्रीतची गर्जना
केळ आणि मध
एक पिकलेलं केळं कुस्करुन घ्या. त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळा. हे सगळं मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा. चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून मग ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोनतीनदा तुम्ही हा पॅक लावू शकता. कोरड्या, निस्तेज त्वचेसाठी हा पॅक उपयुक्त आहे.
आणखी वाचा : सासरीही मिळतंय प्रेम आणि पाठबळ – श्रेया बुगडे
केळं, लिंबू आणि बेसन पॅक
डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि दूध, लिंबू हा पॅक तर अगदी घरोघरी तयार करून वापरला जातो. पण त्यातच केळं मिक्स केलं तर हाच पॅक आणखीनच परिणामकारक होतो. पिकलेलं अर्ध केळं घ्या, त्यात एक चमचा बेसन आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. जास्त लिंबू घालू नका, नाहीतर त्वचा कोरडी होईल. या पेस्टमध्ये थोडंसं गुलाबपाणीही मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १०-१५ मिनिटे तसाच ठेवा. कोरडा झाल्यावर थंड पाण्याने गोलाकार मसाज करत मग चेहऱ्यावरचा पॅक धुवून टाका. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी हा पॅक उपयुक्त आहे.
आणखी वाचा : विवाह समुपदेशन : सासूला सांभाळताना!
केळं आणि पपई मास्क
ऑईली म्हणजे तेलकट त्वचेसाठी हा मास्क खूप उपय़ुक्त आहे. अर्ध पिकलेलं केळं घ्या. त्यात पाव भाग पपई आणि काकडी घालून चांगली पेस्ट करा. ही पेस्ट चेहरा आणि गळा, मानेवर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका.
केळं आणि दही पॅक
अँटीएजिंग आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हा पॅक गुणकारी आहे. दोन चमचे दह्यामध्ये अर्ध पिकलेलं केळं मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर २० मिनिटं लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
आणखी वाचा : यशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन
केळं आणि तांदळाचं पीठ
एक पिकलेलं केळं घ्या, त्यात ३ चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा मध मिक्स करा. चेहरा स्वच्छ धुवून ही पेस्ट १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर गार पाण्याने चेहरा धुवून टाका.
केळं आणि कच्चं दूध
अर्ध्या केळ्यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा. त्यात दोन चमचे कच्चं दूध आणि थोडंसं गुलाबपाणी मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटे तशीच राहू द्या. साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका. या पॅकमुळे त्वचा चमकदार होते.
आणखी वाचा : मासिक पाळीच्या वेदनांनी त्रासला आहात? आता येतोय वेदना संपवणारा ‘बॉडीसूट’!
केळं आणि ऑरेंज ज्यूस
एक पिकलेलं केळं चांगलं कुस्करून घ्या. त्यात ऑरेंज म्हणजे संत्र्याचा ज्यूस आणि दही मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावून ठेवा. थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. या बनाना मास्कने स्कीन टाईटनिंग होण्यास मदत होते.
केळं आणि कोरफड
कोरफड चेहऱ्यासाठी जादुई घटक आहे. एक केळं कुस्करून घ्या. त्यात कोरफड जेल मिक्स करा. चेहरा स्वच्छ धुवून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. अर्धा तास तशीच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा मास्क तुम्ही लावू शकता. यामुळे त्वचा तजेलदार होते.
आणखी वाचा : UNION BUDGET 2023: केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ खास योजना!
केळ्याची साल
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण केळ्याची सालही त्वचेसाठी गुणकारी आहे. केळ्याच्या सालीपासूनही फेस मास्क बनवता येतो. केळ्यामध्ये ए व्हिटॅमिन असतं. त्यामुळे मुरुमं कमी होण्यास मदत होते. तसंच चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी होण्यासही मदत होते. नुसतं केळ्याचं सालही जरी तुम्ही चेहऱ्यावर थोडावेळ घासलंत तरी त्यामुळे खूप फरक पडतो. केळ्याचं साल चेहऱ्यावर सगळ्या बाजूने घासा. पाच दहा मिनिटे तसंच राहू द्या, त्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्हालाच फरक जाणवेल.
केळ्याची साल आणि कडुनिंब पॅक
अर्ध पिकलेलं केळं सालीसकटच कुस्करुन घ्या. त्यात एक टीस्पून कडुनिंबाची पेस्ट मिक्स करा (साधारणपणे मुठभर कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करा). त्यात अर्धा टी स्पून हळद मिक्स करा. पूर्ण चेहरा आणि मानेवर ही पेस्ट लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. बघा तुम्हाला तुमचा चेहरा कसा वाटतो, किती फ्रेश दिसतो.
(शब्दांकन : केतकी जोशी)