वनिता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अमुकतमुक स्त्री सुंदर आहे, म्हणून तिला सगळ्या गोष्टी सहजपणे मिळतात…’ हा अगदी नेहमी केला जाणारा दावा. या वेळी तो केला आहे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी. तोही शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या बाबतीत. पण असं काहीतरी बोलून त्यांनी फक्त, प्रियंका चतुर्वेदी यांचाच नाही तर सगळ्याच स्त्रियांचा अपमान केला आहे. अर्थात असल्या शेऱ्यांची सगळ्याच कर्तृत्ववान स्त्रियांना सवय असते. आणि अशी शेरेबाजी फक्त पुरुषांकडूनच नाही, तर इतर स्त्रियांकडूनही केली जात असते. ती खरी असते की खोटी यापेक्षाही ती का केली जाते, ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

पुरुषप्रधान वातावरणात वाढलेल्या आपल्या समाजामधल्या पुरुषांना स्त्रियांनी महत्त्वाकांक्षी असणं काही केल्या पचनी पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एव्हाना स्त्रियांनी शिकणं, घराबाहेर पडणं, अर्थार्जन करणं त्यांनी स्वीकारलं आहे, कारण ते काही अंशी त्यांच्या फायद्याचं आहे. पण तिने जे काही करायचं आहे, ते तिची, घराची, कुटुंबाची मानमर्यादा सांभाळून. ठरवून दिलेल्या चौकटीत राहून. ती त्यापलीकडे जाऊन महत्त्वाकांक्षा बाळगायला लागली, की त्यांना तिचे पंख कापणं गरजेचं वाटायला लागतं. तिचे पंख छाटण्यासाठीचं पहिलं हत्यार असतं तिच्या चारित्र्यावर घाला घालणं. असं झालं, की मग तिच्या स्वप्नांची अर्धी लढाई तिथेच संपते. कुणीतरी वेडवाकडं बोलू नये, आपल्याकडे बोटं दाखवली जाऊ नयेत, म्हणून ती आपले पंख आवरते घेते आणि जागच्याजागी फडफडत राहते. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे स्वत: धुतल्या तांदळासारखे असतात, असं अजिबात नाही, पण त्यांना तिला थांबवायचं असतं आणि त्यांचा हेतू अगदी सहजसाध्य होतो,

परंतु काही वेळा हे हत्यार उपयोगाचं नसतं, एखादीसमोर ते बोथट ठरू शकतं, तेव्हा पुढचं हत्यार असतं, तिने तिच्या सौंदर्याचा वापर करून तिला हवं ते मिळवलं, अशी तिची बदनामी करण्याचं. रूप ही गोष्ट कुणाच्याच हातात नसली, तरी आपल्या आसपासची सुंदर दिसणारी व्यक्ती कुणाला हवीहवीशी वाटणार नाही? सुंदर स्त्रिया, देखणे पुरुष ही तर निसर्गाची निर्मिती… पण त्या सौंदर्याला, देखणेपणाला बुद्धिमत्तेचं, कर्तृत्वाचं, कौशल्याचं कोंदण नसेल, तर त्या संबंधित व्यक्तीला कुणीही कितीही वर चढवलं तरी तिचं यश मर्यादितच असणार.

एखादी स्त्री अप्रतिम सुंदर असली, एखादा पुरुष आत्यंतिक देखणा असला आणि त्यांच्याकडे अभिनयकलेची देणगी नसेल तर ते जास्तीतजास्त मॉडेल होऊ शकतात. त्यांच्यापेक्षा सामान्य दिसणारी, पण अभिनयकला जाणणारी एखादी व्यक्ती पडद्यावर त्यांच्यापेक्षा जास्त बाजी मारून जाते. हे जसं अभिनयात आहे, तसंच इतर क्षेत्रातही आहे.

प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार आहेत. राज्यसभेत तसंच दिल्लीतील राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांसमोर इंग्रजी भाषेत शिवसेनेची बाजू मांडण्याची त्यांची क्षमता हे शिवसेनेसेसाठी त्यांचं उपयोगमूल्य असू शकतं. पण त्या सुंदर आहेत, म्हणून त्यांना खासदारकी मिळाली, असं म्हणणं म्हणजे त्यांना अवगत असलेलं कौशल्यच नाकारणं. हे त्यांच्याच बाबतीत झालं आहे, असं नाही. एरवीही असं म्हणून एखाद्या स्त्रीची बुद्धिमत्ता, तिचं कर्तृत्व, तिचं कौशल्य नाकारलं जातं. तिची लायकी आहे, तिच्याकडे क्षमता आहे म्हणून तिला एखादी गोष्ट मिळाली आहे, असं नाही, तर ती सुंदर आहे, पुरुषांना आकर्षून घेते, पुरुषांना आपल्या आसपास सुंदर स्त्रिया हव्या असतात, म्हणून तिला ती गोष्ट मिळाली असं बिनदिक्कतपणे सूचित केलं जातं. कर्तृत्ववान स्त्रीला नाउमेद करण्याचा हा एक मार्गच आहे, असतो.

काही पुरुष जसे आपल्या वरिष्ठांच्या पुढे पुढे करून आपल्याला हवं ते मिळवतात, तशा काही स्त्रिया स्वत:च्या सौंदर्याचा वापर करून हवं ते मिळवतात, ही गोष्ट कुणीच नाकारणार नाही. पण या ‘काही’ पुरुषांच्या पुढे पुढे करण्याची चर्चा होत नाही, कारण त्यांना अपवाद समजलं जातं, अनुल्लेखाने मारलं जातं, त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणून दुर्लक्ष केलं जातं, तोच न्याय तसं करणाऱ्या ‘काही’ स्त्रियांना मात्र लावला जात नाही, तो का? आणि त्यांच्या उदाहरणातून सगळ्याच स्त्रियांचं सरसकटीकरण का केलं जावं? त्यांचं कर्तृत्व का नाकारलं जावं?