नीलिमा देशपांडे
प्रश्न : लग्नापूर्वी शारीरिक संबंधांची नीट माहिती असणे किती गरजेचे असते?
उत्तर : आजही आपल्या समाजामध्ये अशी समजूत आहे, की लग्नापूर्वी नवरा-बायकोला शरीरसंबंधांची माहिती नसली तरी फारसा फरक पडत नाही. हे अर्थातच चुकीचे आहे, कारण त्याविषयीची माहिती असणे आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेणे या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या नवरा बायकोंच्या नात्यावर मोठा परिणाम करू शकतात.
लग्नापूर्वी शरीरसंबंधांचा आनंद घेणे आजही आपल्या समाजामध्ये फारसे चांगले समजले जात नाही. कुटुंबियांकडूनही त्याला पाठिंबा मिळत नाही. खोटं वाटेल, पण आजही अशी परिस्थिती आहे, की माझ्याकडे आलेल्या एखाद्या जोडप्याला अगदी बेसिक्सपासून म्हणजे सेक्स म्हणजे काय? लिंग म्हणजे काय? गर्भारपण म्हणजे काय? गर्भाशय म्हणजे काय? लिंगाचा ताठरपणा म्हणजे काय? शीघ्रपतन म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर समजावून सांगाव्या लागतात.
हेही वाचा… कामजिज्ञासा : स्त्रीची कामेच्छा
याचा अर्थ लग्न म्हणजे काय, हे सुद्धा समजून सांगावे लागेल. ती कोणाची जबाबदारी आहे? तर मला असे वाटते, की शाळेमध्ये असल्यापासून, जेव्हा मुलांना शरीराविषयीचे कुतूहल सुरू होते, शरीरात बदल होऊ लागतात तेव्हा आपल्या अवयवांबद्दल, प्रेमाबद्दल, रोमान्सबद्दल, किसिंगबद्दल कुतूहल वाटायला लागते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणे गरजेचे असते. सेक्स एज्युकेशन देणे गरजेचे आहे. घरी आई-वडील आणि शाळेत शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर याविषयी मन मोकळेपणाने चर्चा होणे गरजेचे आहे. मग निदान त्यांना बेसिक सेक्स म्हणजे काय, इथपासून समजून सांगण्याची गरज भासणार नाही.
नवीन लग्न झालेल्या मुला-मुलींना ‘सेक्स’ म्हणजे काय हेच माहिती नसणे, हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. गर्भधारणा म्हणजे काय? ती कशी होते? ती कशी रुजते? कशी वाढते? आणि बाळाचा जन्म कसा होतो या मूळ जीवशास्त्रीय गोष्टी आहेत. ज्या प्रत्येकाला माहीत असायलाच हव्यात. कारण त्यापलीकडे अनेक गोष्टी आहेत ज्या काहीशा गुंतागंतीच्या वाटू शकतात. म्हणजे कौमार्य (Virginity) म्हणजे काय? ‘सेक्सी सेक्स’ म्हणजे काय? सेक्सच्या आनंदात उत्स्फूर्तपणा कसा आणायचा? त्यासाठी काय करायला हवे? या गोष्टी नवरा बायकोचे नाते टिकवायला अत्यंत महत्वाच्या आहेत.
हेही वाचा… कामजिज्ञासा : कमी -जास्त होणारी स्त्री कामेच्छा
त्यासाठी हे पाहाणे गरजेचे आहे, की सेक्स वा शरीर संबंधाची अजिबात माहिती नसण्याने काय समस्या येऊ शकतात. माझ्याकडे अनेक तरुण मुली माहितीसाठी येतात. त्यांच्या मनात शरीरसंबंधांविषयी खूप भीती असते. त्यांचे प्रश्न असतात, कौमार्यभंग म्हणजे काय? पहिल्या शरीरसंबंधात योनीतील पडदा फाटतो म्हणजे काय? नेमके काय फाटणार असते? त्यामुळे खूप रक्तस्त्राव होतो का? त्याने मला खूप दुखेल का? या प्रश्नांची योग्य उत्तरे माहिती नसली मुली लग्नाला किंवा लग्नानंतरच्या शरीरसंबंधांना खूप घाबरतात. आणि हे जर अधिक काळ राहिले आणि नवरा-बायकोला शरीरसुखाचा आनंदच मिळाला नाही तर जोडप्याचा घडस्फोटही होऊ शकतो. म्हणूनच लग्नाआधीच सेक्स वा शरीरसंबंधांची नीट माहिती करून घेणे गरजेचे आहे.
(डॉ. नीलिमा देशपांडे स्त्रीरोग तज्ज्ञ असून सेक्स थेरपीस्ट आहेत. )
deshnp66@gmail.com
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.