“हॅलो, वैशालीताई, मी मंजुषा बोलते आहे, अधीराची आई. सुजय आणि अधीरा मागच्या पंधरा दिवसांत दोन-तीन वेळा एकत्र भेटले. आता दोघांनी एकमेकांना पसंत केलंच आहे, शिवाय दोघांची पत्रिकाही जमते आहे, तर आता पुढची बोलणी कधी करायची?”
मंजुषाने सुजयच्या आईला फोन केला होता. कारण मुलांची पसंती असेल तर उगाचच थांबायला नको, असं तिला वाटतं होतं. एकदा का लग्न ठरवलं, की मग आपली काळजी संपली, असा तिचा विचार.
एक तर लग्न या विषयावर यापूर्वी अधीरा काहीच बोलत नव्हती. हा विषय काढला तरी ती उठून जायची. विवाहसंस्थेत नाव नोंदवलं तरीही ती स्थळ बघायला तयार नव्हती. आता ओळखीतून सुजयचं स्थळ आलं आणि तिलाही तो आवडला म्हणून लग्नाची पुढची बोलणी झालेली बरी असं मंजुषाला वाटतं होतं. पण सुजयच्या आई- वैशालीताई तिला म्हणाल्या, की आपण दोघीच एकमेकींना भेटू! मंजुषाला थोडं आश्चर्यच वाटलं. त्यांना अधीरा पसंत आहे असं तर त्यांनीही कळवलं होतं. मग आता एकत्र बैठक घ्यायची सोडून त्यांना मला एकटीलाच का भेटायचं असेल? त्यांच्या मनात वेगळं काही असेल का? याचा ती विचार करीत होती.
हेही वाचा – महिला साक्षरता ७७ टक्के: अजून मोठा पल्ला गाठायचाय!
वैशालीताई तिची रेस्टॉरंटमध्ये वाटच बघत होत्या. पाल्हाळ न लावता त्यांनी विषयालाच हात घातला, “मंजुषाताई, आपण अधीरा आणि सुजयचं लग्न ठरवायचं म्हणत आहोत, पण त्याआधी दोघांच्याही आईनं एकमेकींना भेटणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. बघा, मुलांनी एकमेकांना पसंत केलं की आपलं काम संपलं असं नाहीये, तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली मुलं खरंच एकमेकांना अनुरूप आहेत का? याचा आपण आधी विचार करू. तुम्ही कसे आहात? तुमची फॅमिली कशी आहे? अधीराचा स्वभाव कसा आहे? याबाबतची माहिती बाहेरून काढण्यापेक्षा तुमच्याकडून ही माहिती करून घेणं हे मला अधिक योग्य वाटतं आणि तसंच आमच्या फॅमिलीची माहिती आणि सुजयच्या स्वभावाची माहिती तुम्हाला करून देणं हे मी माझं कर्तव्य समजते.”
वैशालीताई बोलतच होत्या, “कोणतीही आईच, आपल्या मुलांना चांगलं ओळखते. त्यांच्यातील गुण-दोष हे तीच चांगल्या प्रकारे सांगू शकते. माझा सुजय कसा आहे, हे मी मोकळेपणानं तुम्हाला सांगणार आहेच, तसंच अधीराबद्दल मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. या वयात मुलं एकमेकांचं रूप, आर्थिक परिस्थिती आणि वरवरची माहिती आधी घेतात, परंतु या दोघांचं एकमेकांशी खरंच जमेल का? हे कोणत्याही गुणमिलन आणि ज्योतिष शास्त्रापेक्षा आईच जास्त चांगलं सांगू शकते. आपली मुलगी या घरात रमेल का? हा मुलगा आपल्या मुलीला समजून घेईल का? हे आई एका दृष्टीक्षेपात ओळखते. तसंच ही मुलगी आपल्या संस्कारात, आपल्या घरात रममाण होईल का? आपला मुलगा तिला समजून घेईल का? हे मुलाच्या आईलाही लगेच कळतं. म्हणूनच आपल्या दोघींना एकमेकांशी बोलणं, आपलं नातं सुदृढ करणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण एकमेकींशी मैत्री केली, तर मुलं अधिक मोकळेपणानं एकमेकांशी वागतील.”
“सध्याच्या काळात लग्न तुटण्याचं प्रमाण वाढतंय. यामागच्या प्रमुख कारणांचा अभ्यास केला, तर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घेतलेल नसतं. लग्नापूर्वी मोकळेपणानं बोलणंच झालेलं नसतं. आपल्याला जावई कसा हवा आहे, सून कशी हवी आहे, हेही बोलायला हवं आणि खरोखर आपली तार जुळणार आहे का, याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे, हे मुलांना पटकन कदाचित कळणार नाही. तारुण्यसुलभ भावनांचा अंमल मुलांच्या मनावर अधिक असतो. त्यामुळं निर्णय घेण्याची त्यांच्याकडून घाई होते. जोडीदाराबाबतच्या खूप साऱ्या अपेक्षा त्यांच्या मनात असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर कधी कधी सुरुवातीपासून एक प्रकारचा आकस मनामध्ये राहून जातो. म्हणून या प्रक्रियेत पालकांचा सहभाग असावा, परंतु तो तटस्थपणे असावा. खरोखरच आपली मुलं या नात्यात पुढे जाऊ शकतील का?एकमेकांना सांभाळून घेऊ शकतील का? याचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.” वैशालीताई भरभरून बोलत होत्या आणि मंजुषालाही त्यांचं बोलणं पटतं होतं. तिच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या.
हेही वाचा – महिलांना शस्त्रे दिल्यामुळे प्रश्न सुटणार की वाढणार ?
“खरं आहे तुमचं म्हणणं. आपण दोघी चांगल्या मैत्रिणी होऊ या. आपल्यातील मैत्रीचं नातं दृढ करू या. आपल्या मुलांनी एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांना समजावून घ्यावं, एकमेकांच्या गुण-दोषांसह एकमेकांचा स्वीकार करावा, आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात एकमेकांना साथ द्यावी, यापेक्षा आपल्याला काय हवं आहे? आणि आपणच एकमेकांशी मैत्रीच्या नात्यानं वागलो तर आपल्या मुलांच्या नात्यांची सुरुवातही चांगली होईल!”
आता दोघीही मोकळेपणाने एकमेकींशी बोलत होत्या आणि एकमेकींच्या विहिणी होण्यापूर्वी मैत्रीचं नात फुलतं होतं!
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)
smitajoshi606@gmail.com