डॉ. उल्का नातू गडम
आपण ज्या प्रकारे बसतो ती स्थिती म्हणजे आसन, ज्यावर बसतो ते देखील आसनच!
हटप्रदीपेकीतील वर्णनानुसार –
आसनानि समान्तानि यावन्तो जीवजन्तव: ।
चतुर: शीति लक्षाणी शिवेन कथितं पुरा।।
विचार करा, आसने किती असतील? जेवढे जीवजंतू, म्हणजे जवळपास ८४ लक्ष, तेवढ्या प्रकारची, नावांची आसने!
म्हणजेच आजन्म ‘लोकसत्ता’मध्ये रोज एक वेगळे आसन व त्याची माहिती लिहिण्यास पुरेपूर वाव आहे. थोडक्यात, सृष्टीत आढळणारे प्राणी, पक्षी, वृक्ष, वनस्पती व इतर सजीवांच्या नावाने आसनांच्या स्थितीचे नामकरण केले गेले आहे. त्यामुळे आसनाची अंतिम स्थिती, त्याचे लाभ पटकन लक्षात येतात.
आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!
असेच एक बहुगुणी, बहुउपयोगी आसन म्हणजे मार्जारासन! आळस देणाऱ्या मांजराप्रमाणे शरीराचा आकृतीबंध दिसतो म्हणून त्याचे नाव मार्जारासन! एकाच वेळी पाठकण्याला अंतर्वक्र व बहिर्वक्र आकार देणारा हा शरीराचा आकृतीबंध आहे.
मार्जारासन करण्यासाठी प्रथम वज्रासनाची पूर्वस्थिती घ्या. आता पाठकणा जमिनीला समांतर राहील अशा रीतीने दोन्ही हात, गुडघ्यांपुढे एक हात अंतरावर ठेवा. दोन्ही गुडघे, दोन्ही खांदे व दोन्ही हात यामध्ये सारखे अंतर ठेवा. दोन्ही पायांच्या बोटांची नखे जमिनीला टेकलेली असावीत. आता सावकाश मान वर घ्या व त्याचवेळी पाठकण्याला आतल्या बाजूला खेचून घ्या. अशा रीतीने मानेवर दाब येईल. गळ्यावर ताण येईल. पाठकणा अंतर्वक्र होईल.
आणखी वाचा : पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!
अंतिम स्थितीत डोळे मिटून लक्ष श्वासावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. चार ते पाच श्वास या स्थितीत राहिल्यावर आता परत पाठकणा जमिनीला समांतर करा. आता पुढील स्थितीकडे वाटचाल करा. मान गळ्याच्या खाचेमध्ये खाली घेऊन हनुवटी छातीच्या पिंजऱ्याला टेकण्याचा प्रयत्न करा. त्याचवेळी पाठकणा वर उचला. पाठकण्याला बहिर्वक्र आकार येईल. पुन्हा काही श्वास थांबून, उलट वाटचाल करा. वज्रासनातून बैठक स्थितीत स्थिर होऊन काही क्षण विश्रांती! मिटल्या डोळ्यांनी केलेल्या आसनाची मानसिक उजळणी करा.
गर्भारपणी या आसनाचा सराव विशेष उपयुक्त आहे. या आसनाच्या सरावाने पाठीचे व पोटाचे स्नायू लवचिक होतात. पाठकण्याचे आरोग्य सुधारते.