डॉ. अभिजित देशपांडे (निद्राविकारतज्ज्ञ)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्नांमधील आशय कोणते असतात, याबद्दलची सर्वसामान्य माहिती आपण मागील लेखात घेतली. या लेखात स्वप्नांचे अर्थ कसे लावावेत; वेगवेगळ्या तज्ज्ञांनी याबद्दल काय टिप्पणी केली आहे, याचे विवेचन पाहणार आहोत. हजारो वर्षांपासून स्वप्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न झालेला आहे. स्वतःला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावण्याची अनेकांना जबरदस्त उत्सुकता असते. त्याकरिता पैसे मोजण्याचीदेखील तयारी असते. इंटरनेटवर तुमच्या स्वप्नांचा अर्थ लावणाऱ्या अनेक साइट्स, डिक्शनरीज उपलब्ध आहेतच. गमतीची गोष्ट म्हणजे पॉर्नसाइटच्या खालोखाल या साइट्सवर हिट्स आहेत! अर्थात भारतामध्ये अनेक ठिकाणी ‘स्वप्न ज्योतिष’ सांगणारे आढळतातच.

आणखी वाचा : काय आहेत ‘व्हेगन सिल्क साड्या’?

सर्वप्रथम भारतामध्ये प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळातील संत/ विचारवंत यांनी स्वप्नांचा कसा अर्थ लावला आहे ते पाहू या. ऋग्वेदात स्वप्नांचे कारण ‘वरुण देवता’ मानली आहे. ही देवता तुमच्या पाप/ पुण्यांनुसार स्वप्ने देते. थोडक्यात, बक्षीस/ शिक्षा असा सोपा मामला आहे. पुढच्या काळात, अथर्ववेदात ‘कृष्णशकुनी’, ‘हर्षशकुनी’ असा स्वप्नांचा उल्लेख आहे. भविष्यकाळातील घटनांची सूचना म्हणजे स्वप्ने असा त्याचा अर्थ आहे. संस्कृत भाषेमध्ये शकुन म्हणजे पक्षी असाही एक अर्थ आहे. त्या काळात पक्ष्यांचे आवाज, दर्शन यांना महत्त्व द्यायची पद्धत होती. भारद्वाज पक्षी हा शुभ मानला गेला आहे, तर घुबड अशुभ मानले गेले आहे. त्याचा स्पष्ट परिणाम स्वप्नांचे अर्थ लावण्यावर दिसून येतो. उपनिषदांच्या काळात आणि त्यांच्यापासून निर्मिलेल्या श्रीमद्भागवतामध्ये स्वप्ने ही तिसरी चेतन अवस्था (कॉन्शसनेस्) मानली गेली आहे. ब्रह्म आणि माया यामुळेच स्वप्ने पडतात.

आणखी वाचा : आहारवेद : उष्मांक वाढवणारी साखर

रामानुजांनी ब्रह्मसूत्रांवर भाष्ये केली आहेत. त्यातही ‘ब्रह्म आणि माया’ हेच स्वप्नांचे कारक असे म्हटले आहे, पण लगेच दुसऱ्या सूत्रात भविष्य दाखवणारे असेही वर्णन केले आहे. रामायणातील सुंदरकांडात त्रिजटेला पडलेले स्वप्न याचे प्रमाण घेण्यात आले आहे. पुराण काळामध्ये मात्र स्वप्नांचे अर्थ सांगणे आणि त्यावर उपाय सुचवणे याला बहर आला आहे. अग्निपुराण आणि गरुडपुराण यात सगळ्यात जास्त उल्लेख आढळतो. अग्निपुराणात वर्णन केलेली काही स्वप्ने भविष्यात धोका दाखवतात. उदाहरणार्थ- शरीरावर गवत उगवणे, मुंडन केले जाणे, लग्न, सापाला मारणे, तेल पिणे, माकडांबरोबर खेळणे, देव, ब्राह्मण, राजा अथवा गुरूने रागावणे. त्यावर उपायदेखील सुचवले आहेत (यज्ञ करणे, वरुण, विष्णू, गणपती अथवा सूर्याची प्रार्थना इत्यादी).

आणखी वाचा : ‘ब्लू अॅण्ड ग्रे कॉलर’: महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत केवळ एक टक्का वाढ

काही स्वप्ने शुभ मानली आहेत. उदा. स्वप्नात पर्वत, राजमहाल, नाग, घोडा, ग्रहण, ओले मांस खाणे इत्यादी दिसणे. गंमत म्हणजे काही भयंकर स्वप्ने – डोके धडावेगळे होणे, घर जळून जाणे, स्वत:चा मृत्यू, मदिरा प्राशन करून धुंद होणे अशी स्वप्ने सगळ्यात जास्त लाभकारी मानली आहेत. गरुडपुराणात भुतांमुळे पडलेल्या स्वप्नांबद्दल माहिती आहे. यात १२ वेगवेगळ्या प्रकारांची स्वप्ने आणि त्यांचे अर्थ सांगितले आहेत. या स्वप्नांपासूनचा उपायदेखील सांगितला आहे.
जगात सगळ्यात पहिला, स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे. ‘बृहतनिघंटू रत्नाकरम’ या ग्रंथात ‘स्वप्न प्रकाशिका’ असा अध्याय आहे. स्वप्नांचा आणि शारीरिक स्थितीचा पहिला उल्लेख चरकाचार्यांनी केला आहे. चरकांनी स्वप्नांचे सात प्रकारचे अर्थ सांगितले आहेत. त्यात वर्तमान स्थितीमुळे होणारे दृश्य/ श्राव्य/ कल्पित/ कफ, वात, पित्त या त्रिदोषांतील बिघाडांमुळे येणारी स्वप्ने इत्यादी प्रकार आहेत. मध्ययुगीन युरोप, इजिप्त आणि चीनमध्येदेखील स्वप्नांतील चिन्हांचा अर्थ भारतामधील विचारधारणेशी मिळताजुळता आहे.
आधुनिक काळातील स्वप्नांचा अर्थ सांगताना सिग्मंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाच्या विचारांचा आढावा घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. २४ जुलै १८९५ रोजीची रात्र, डॉ. फ्रॉइड यांना इर्मा नावाच्या रुग्णाचे स्वप्न पडले. त्यात तिला दूषित इंजेक्शन देतात. सकाळी उठल्यावर हे स्वप्न त्यांनी लिहून काढले. त्यावर विचार करताना या रुग्णाबद्दल असलेली अपराधी भावना या स्वप्नास कारणीभूत ठरली आहे, असे त्यांच्या लक्षात आले. जागेपणी अमूर्त स्वरूपात असलेल्या अथवा अपूर्ण राहिलेल्या वासनांची पूर्ती करण्याचा ‘स्वप्ने’ हा राजमार्ग आहे, असे सांगणारे त्यांचे ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीमस्’ हे जगप्रसिद्ध पुस्तक सन १९०० साली प्रसिद्ध झाले.

मानसशास्त्रामध्ये क्रांतिकारी बदल घडवण्याचे सामर्थ्य फ्रॉइडच्या तत्त्वज्ञानात होते. ‘स्वप्न’ म्हणजे सूचक गोष्टींची गुंतावळ आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार सूचक गोष्टींचा अर्थ वेगळा असतो. हा अर्थ ‘फ्री असोसिएशन’ या सायकोॲनालीसमधील पद्धतीने लावता येतो. ही पद्धतीदेखील फ्रॉइडची देणगी आहे. फ्रॉइडने अपूर्ण वासनांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व ‘लैंगिक’ भावनांना दिले आहे. जागेपणी या भावना उघडपणे व्यक्त करता येत नाहीत. त्या सुप्त मनात असतात. मनाच्या या भागाला त्याने ‘ईड’ असे नाव दिले. जागेपणी या ईडला वेसण घालण्याचे काम ‘इगो’ करतो. झोपेमध्ये जेव्हा ही वेसण ढिली पडते, तेव्हा सुप्त कामेच्छा स्वप्नरूपी दिसतात. ईडला वेसण घालण्याच्या प्रक्रियेत जर बिघाड झाला तर माणसे विचित्र वागू लागतात.

फ्रॉइडच्या स्वप्न विश्लेषणाचे एक उदाहरण देतो. त्याची एक स्त्री रुग्ण विचित्र वागायची. तिला स्वप्नांमध्ये काळी गाडी दिसायची. या गाडीचे ड्रायव्हर तिच्या ओळखीच्या व्यक्ती असत. ही सर्व मंडळी तिच्यावर गाडी आदळून मारून टाकायचे. फ्रॉइडच्या मते ही ‘काळी गाडी’ पुरुष लिंगाचे द्योतक होती. तिची सुप्त लैंगिक आकर्षणे आणि त्याची भीती या स्वप्नांत दिसते. विशेष म्हणजे या स्वप्नांचा उपयोग करून तिच्यावर उपचार झाले तेव्हा तिचा विचित्रपणा, झोपेतून दचकून जागे होणे हे प्रकार बंद झाले. फ्रॉइडचा शिष्य कार्ल युंग यानेदेखील स्वप्नांच्या अर्थावर महत्त्वपूर्ण योगदान केले आहे. फ्रॉइडने लैंगिकतेवर अतिरिक्त भर दिला आहे, असे त्याचे मत होते. युंगवर ग्रीक तत्त्ववेत्त्यांचा प्रभाव होता. प्रत्येक माणसांत द्वंद्व असते. काही प्रमाणात प्रत्येक पुरुषात एक स्त्री स्वभाव तर स्त्रीमध्ये थोडा पुरुषी स्वभाव असतो. युंगच्या मते मनाचे दोन भाग, ज्यांना तो ॲनिमस’ आणि ‘ॲनिमा’ असे संबोधतो.
जेव्हा हे दोन्ही भाग एकत्रित काम करतात, तेव्हा प्रचंड शक्तीची अनुभूती त्या माणसांस होते. स्वप्नांचा वापर या दोघांतील तेढ कमी होण्याकरिता करावा असे मत युंगने मांडले. स्वप्नांचा अर्थ कसा लावावा याबद्दल प्रत्यक्ष सूचना-

१. कितीही भयंकर स्वप्न पडले तरी घाबरून जाऊ नका. कित्येकदा ही स्वप्ने वर्तमानकाळाशी संबंधित असतात.

२. स्वप्ने लिहून काढा. त्यातील छोट्या, किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मुख्य आशय काय आहे हे कॉमन सेन्स वापरून ठरवा.
३. स्वप्नांतील हालचाली/ भावना मुख्य काय आहेत हे लक्षात घ्या.

४. वर्तमानकाळातील भावनिक घटना काय घडल्या याची नोंद घ्या. अनेक वेळेला आपण स्वत:लाच फसवत असतो. स्वप्नांचा वापर ही फसवणूक थांबवण्यासाठी करा.
५. बऱ्याच वेळा मृत्यू, सर्पदंश आदी घटना जीवनात होणारे बदल दर्शवतात.

६. लैंगिक आकर्षण ही स्वाभाविक घटना आहे. त्याबद्दल दोषी वाटण्याने हे आकर्षण कमी होत नसते. ‘स्वप्ने’ ही या भावनेचा निचरा करण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे ‘अशी स्वप्ने पडतातच कशी?’ अशी आत्मटीका करू नका.
७. काही लोकांना सतत स्वप्ने पडत असतील, एखाद्या फिल्मच्या ट्रेलरसारखी स्वप्नमालिका दिसत असेल, स्वप्नांमुळे जाग येत असेल, अथवा झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल तर अशा परिस्थितीत निद्रेच्या ८४ विकारांपकी एखादा विकार असण्याची दाट शक्यता असते. आधुनिक तंत्रज्ञानाने हे विकार ओळखता येतात. स्वप्नांचे विकार, मेंदू आणि स्वप्ने याबद्दल माहिती पुढच्या लेखात पाहू, तोपर्यंत सर्व वाचकांना ‘स्वीट ड्रीम्स’.
abhijitd@iiss.asia

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Better sleep happiness meanings of dreams sigmund freud vp
Show comments