सिंधूमावशी म्हणून आमच्या एक नातलग होत्या. चाळीतल्या छोट्याशा दोन खोल्यांचा त्यांचा संसार, पण त्यातली प्रत्येक वस्तू ‘भारी’ असायची, कारण ती खूप जुनी आणि खणखणीत असायची. “चाळीस वर्षं झाली गं या पितळेच्या डब्याला, बघ अजूनही कसा चमकतोय. आता मिळत नाहीत असे खणखणीत डबे. ते मापटं तर पन्नास वर्षांपूर्वीचं.” असा दर वेळी तोच संवाद आणि त्यांच्या टोनमध्ये तोच ‘थोडासा तोरा’!
हेही वाचा- बचत करायची आहे? तर मग ‘या’ सवयी सोडाच!
“तुमच्या घरी आहेत का अशा दुर्मिळ, जुन्या वस्तू?” असं मावशी न बोलता विचारतायत असं लहानपणी वाटायचं मला. त्यांचं घर जादुई वाटायचं.
आमच्या घरात जुनी भांडी फारशी नव्हती. एकत्र कुटुंबातून वेगळे होताना आजीनं आठवणीपुरती दोन-तीनच भांडी आणली होती. विषय निघाल्यावर ती त्याबद्दल काहीतरी सांगायची, पण त्यात काही तोराच नसायचा. त्यामुळे आपलं घर भारी नाही, थोडं कमीच आहे, असं मला वाटत राहायचं.
एकदा सिंधू मावशींकडे जाऊन आल्यावर, “आपल्या घरात मावशींसारखी जुनी भांडी का नाहीत?” अशी मी जरा जास्तच भुणभुण केली, तेव्हा सिंधू मावशींसारखा वरचा अनुनासिक सूर लावून आजी म्हणाली, “हे बघ, हे मोदकपात्र माझ्या माहेरून आणलंय, शुद्ध तांब्याचं आहे, पंचेचाळीस वर्षं झाली, चमक बघ त्याची. या परातीला छत्तीस वर्षं झाली, एक पोचा नाही पडलेला. आता मिळतात का इतक्या मोठ्या, खणखणीत पराती?…”
हेही वाचा- अपत्यं जन्माला घालावीत की नाही?
मी बघतच राहिले. आजीनं वरचा स्वर लावून, सांगण्याची पद्धत बदलल्याबरोबर तीच भांडी ‘भारी’ झाली. आमचंही घर जादुई वाटलं मला. मग आजी नेहमीच्या सहज स्वरात म्हणाली, “अगं, हे मोदकपात्र माझ्या आईची आठवण आहे, माझ्या लग्नात दिलेलं. ही मोठी परात तुझ्या आजोबांनी स्वत: कारखान्यातून बनवून आणली, कारण घरातली परात छोटी पडायला लागल्यावर मला पुन्हापुन्हा कणिक मळायला लागायची, हे त्यांच्या लक्षात आलं. आमच्या वेळी असं न बोलता प्रेम असायचं. पण ते पुन्हापुन्हा सांगून मिरवायचं कशाला? आपली भावना आपल्यापाशी. सिंधूला आहे आवड जुन्यापुराण्यात गुंतून बसायची. एवढ्याशा दोन खोल्यांत लख्ख, नीटनेटकं राहते ते कौतुकाचंच आहे. नवं आणलं तरी ठेवायला जागाही नसणार तिच्याकडे. पण म्हणून आपलं घर पुराणवस्तूसंग्रहालय असल्यासारखं पुन्हापुन्हा तेच तेच मोठं करून कशाला सांगायचं? असू दे, तिचं तिच्यापाशी. मला नव्या वस्तूपण आवडतात. उत्साह वाटतो बदलामुळे.”
हेही वाचा- घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!
आजी स्पष्ट काहीच म्हणाली नाही, तरी त्या वयातही मला काहीतरी उमगलं. सिंधूमावशी, जुन्या वस्तू, स्वरातला तोरा आणि आजीचं सांगणं याचं काहीतरी कोलाज मनात राहिलं. समज आल्यावर वाटलं, ‘आमचं सगळं केवढं भारी’वाल्या टोनच्या मागे सिंधूमावशी आपल्या छोट्या दोन खोल्यांबद्दलचा थोडा विषाद आणि थोडी असूयाही लपवत असतील किंवा कदाचित त्यांच्या विचारांची झेप भांड्याकुंड्यांपलीकडे पोहोचतच नसेल.
अशा कुणाच्यातरी ‘थोड्याशा तोऱ्याच्या’ प्रभावामुळे आणि तुलनेमुळे लहानपणी मनात रुजलेली कमीपणाची भावना मोठेपणीही कशी ठिकठिकाणी डोकं वर काढते ते पुढे दिसायला लागलं.
हेही वाचा- …तर मग ‘लोक काय म्हणतील’ हा विचार का करायचा?
‘माझ्या मुलाला नव्वद टक्के मिळाले’ असं कुणीतरी छुप्या तोऱ्यात सांगतं, तेव्हा आपल्या मुलाचा एखादाही कमी टक्का मनाला खट्टू करतो. त्या वेळी त्यानं हातानं बनवलेल्या एखादया सुंदर वस्तूचं कौतुक कमी वाटतं. फेसबुकवरचे जोडप्यांचे अतिउत्साही फोटो पाहिल्यावर ‘आपल्याकडे नाही असं काही’ असं वाटून उदास व्हायला होतं. प्रत्यक्षात त्या जोडप्याची पोझ फोटोपुरतीही असू शकते. तसे फोटो टाकत राहणाऱ्यांचा उद्देश आपल्या जोडीदाराबरोबरचा विसंवाद जगापासून लपवण्याचाही असू शकतो. पण त्या वेळी आपल्या जोडीदाराबरोबरच्या समंजस नात्यापेक्षा, नात्याच्या जाहिरातीचे ते फेसबुक-फोटो आपल्याला अस्वस्थ करतात.
हेही वाचा- शरीरधर्माचाही सन्मान हवा! (भाग ४ था)
मनात कुणाशी तरी, कशाशी तरी अशी तुलना होऊन त्रास व्हायला लागला, की अनेकदा आजीचा सहजस्वर ऐकू येतो. ती म्हणत असते, “अगं, प्रत्येकाकडे मिरवण्यासारखं काहीतरी असतंच, पण आपण कुणाच्या तरी मिरवण्याच्या तोऱ्यात वाहून जायचं, की तारतम्य बाळगायचं? आपल्या वस्तूमागच्या, आठवणींमागच्या भावना जपायच्या, की प्रदर्शन मांडत सुटायचं? याचा चॉइस आपलाच असतो, हे लक्षात ठेव बरं का!”
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com