शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही धडधाकट माणसाला सहज शक्य होणार नाही अशी कामगिरी भाविना पटेल हिने करून दाखवली. अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा टेबल टेनिसमध्ये थेट अंतिम फेरीत करून धडक मारत तिने सुवर्णपदक प्राप्त केले.
भाविनाचा जन्म ६ नोव्हेंबर १९८६ साली गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील सुधिया या गावामध्ये झाला. एक वर्षाची असतानाच तिला पोलिओसारख्या आजाराचा सामना करावा लागला; त्यामुळे तिचा कमरेखालचा भाग लुळा पडला. या आघातांनंतरही भाविना कधीच खचली नाही दुःख कवटाळून न बसता ती जिद्दीने सर्व संकटांचा सामना करत राहिली. आज सातत्यपूर्व प्रयत्नांच्या बळावर तिने नावलौकिक प्राप्त केला आहे.
भाविनाने आयटी कोर्ससाठी अहमदाबाद येथील ब्लाइंड पीपल असोसिएशनमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी तिने आपल्यासोबत शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणींना खेळाचा आनंद घेताना जवळून पाहिले आणि तिच्या मनातही खेळाविषयी आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण करत असताना पहिल्यांदाच तिने टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. लालन दोशी आणि तेजलबेन लाखिया यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल टेनिसचे धडे घेतले. भविनाला हा खेळ खूपच आवडत असल्यामुळे तिने संपूर्ण वेळ खेळालाच समर्पित केला.
भाविनाच्या म्हणते, `जेव्हा टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हा फक्त आवड म्हणून खेळायची. परंतु कालांतराने ही आवडच पॅशन झाली आणि अधिक उत्कटतेने खेळण्यास सुरुवात झाली.’ जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर भाविनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शाळेसाठी तयार होणे, जेवण, प्रवासआणि शिक्षण यासह जवळपास सर्वच दैनंदिन कामांसाठी तिला कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे ती खूप खचून जायची, परंतु कुटुंबामधील सर्व सदस्यांनी कायमच भाविनाचे मनोबल वाढवून तिच्या पाठीशी खंबीर उभेपणे राहाणे पसंद केले. आपल्या यशात कुटुंबियांचा वाटा मोठा आहे, असे म्हणत भाविना कुटुंबियांविषयी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करते.
जीवनामध्ये कोणतीही समस्या कायम नसते, हा विचार मनात कायम ठेऊनच आलेल्या प्रत्येक बिकट प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या भाविनाने, टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. टेबल टेनिसच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वर्ग चारमध्ये रौप्यपदक मिळवणारी पहिली पॅरा पॅडलर बनली. भाविनाने व्हीलचेअरवर बसून एकेरी आणि दुहेरी प्रकारांमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत देशाला अनेक आंतरराष्ट्रीय पदके मिळवून दिली आहेत. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना टेबल टेनिसमध्ये तिच्याहातून पराभव पत्करावा लागला. आज या खेळात तिचे नाव जगभरात सर्वत्र सन्मानाने घेतले जाते.
सामोऱ्या जाव्या लागलेल्या प्रत्येक आव्हानांमधून भाविनाने अनेक धडे घेतले. खेळाडूंना प्रत्येकवेळी प्रशिक्षणाची सोय नसते अशावेळी तिने स्वतःच टेबल टेनिसचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यानुसार आपली खेळातील तंत्रे आणि दृष्टिकोन यामध्ये बदल करून तिने स्वतःच्या खेळात दिवसेंदिवस चांगला बदल घडवून आणला.
भाविनाच्या कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कार बहाल केला. भाविनाचा आतापर्यंतचा जीवन प्रवास पाहता तिने पुढील युवा खेळाडूंसमोर एक नवीन आदर्श उभा केला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम करत राहा आणि सकारात्मक रहा. असे केलेत तर जे हवे ते साध्य करू शकाल, असे भाविना नेहमी सांगते.