एका जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च स्थानी नुकत्याच स्थानपन्न झालेल्या उन्मादी नेत्याला एक ६५ वर्षांची, किरकोळ देहयष्टीची महिला संयत स्वरात सांगत होती की ‘तुम्ही चुकताय’. तिच्या नजरेत भयाचा लवलेशही नव्हता. ना आपण कोणी जगावेगळे ज्ञानी वा शूरवीर असल्याचा आविर्भाव. ती फक्त तिचं काम प्रामाणिकपणे करत होती. ती एक बिशप आहे. धर्माचा अर्थ समजावून सांगणं ही तिची जबाबदारी. ती तिने प्रामाणिकपणे पार पाडली. पण अन्य किती देशांत सर्वोच्च नेत्याला असे अख्ख्या जगापुढे शहाणपणाचे चार खडे बोल सुनावणं शक्य आहे? जगाला दया- क्षमा- शांतीचे धडे देणाऱ्या भारतात या आघाडीवर काय अवस्था आहे?

अमेरिकेतल्या या धाडसी बिशपचं नाव आहे मारियाना बडी. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच्या ‘प्रेयर सर्व्हिस’मध्ये त्या बोलत होत्या. ट्रम्प यांनी ‘यापुढे देशात दोनच लिंग असतील – स्त्री आणि पुरुष, अमेरिकेत बाहेरच्या अनेक गुन्हेगारांनी घुसखोरी केली आहे, त्यांना हुसकावून लावू,’ वगैरे तारे नुकतेच तोडले होते. मारियाना यांनी त्यांना आपण सारे एकेकाळी या देशात आगांतुकच होतो. अशाच अनेक आगंतुकांनी मिळून या देशाला महासत्तापदी पोहोचवलं आहे याची आठवण करून दिली. परदेशांतून आलेले सारेच घुसखोर नाहीत आणि गुन्हेगारही नाहीत. त्यातले बहुसंख्य आपले चांगले शेजारी आहेत. आपल्या चर्च, मशिदी, सिनेगॉग, गुरुद्वारा आणि मंदिरांत प्रार्थना करतात. तेच आपल्यावर अवलंबून आहेत असं नाही. आपणही त्यांच्यावर अवलंबून आहोत. आपल्या शेतांत, हॉटेलांत, कारखान्यांत राबणारे बहुसंख्य हात परदेशांतून स्थलांतर केलेल्यांचेच आहेत, हे वास्तव मारियाना यांनी ट्रम्प यांच्यासमोर मांडलं. एलजीबीटीक्यू समुदायाविषयीही सहानुभूतीने विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. लिंग हे पक्षसापेक्ष नसतं. डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांत आणि तटस्थांत देखील गे, लेस्बिअन आणि ट्रान्स जेंडर आहेत आणि या सर्वांविषयी सहानुभूती बाळगली पाहिजे, हे मारियाना यांनी आपल्या जुनाट विचारांना चिकटून बसलेल्या अध्यक्षाला ठामपणे सांगितलं.

ट्रम्प यांनी ‘प्रेयर सर्व्हिस’ संपताच मारियाना यांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते अपेक्षितच होतं म्हणा. पण तेवढ्यावर न थांबता या महासत्ताधीशाने एक सविस्तर पोस्टही शेअर केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मारियाना या कट्टर डाव्या ट्रम्पद्वेष्ट्या आहेत. त्यांनी त्यांच्या चर्चला राजकारणात आणलं आहेत. त्यांची बोलण्याची शैली ओंगळ होती. व्याख्यान कंटाळवाणं होतं आणि अजिबातच प्रेरणादायी नव्हतं. बडी यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे.’ मरियाना यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मला राष्ट्रीय एकात्मता या विषयावर बोलण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आज माझ्या देशातले अनेक रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. एक विभाजनवादी आणि ध्रुवीकरण करणारे कथन रेटले जात आहे. त्यात लोक भरडले जात आहेत. प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे, हे बिंबविण्यासाठी मला मिळालेल्या या संधीचा उपयोग करून घ्यायचा होता आणि तो मी घेतला.’

अशी ठाम भूमिका मांडण्याची किंवा धाडसी विधानं करण्याची मरियाना यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०२० मध्ये त्यांनी ट्रम्प यांच्या एका कृतीवर टीका केली होती. तेव्हा जॉर्ज फ्लॉइड प्रकरणाने अमेरिकाच नव्हे तर जगाला धक्का दिला होता. अमेरिकेसारख्या अतिप्रगत मानल्या जाणाऱ्या देशात कृष्णवर्णीय तरुणाचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते आणि या कृत्याविषयी जगभर निषेध व्यक्त होत होता. याच मुद्द्यावर वॉशिंग्टन डीसीमधल्या एका चर्च समोर शांततापूर्ण आंदोलन सुरू होतं. तिथे ट्रम्प येणार म्हणून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं. ट्रम्प आले आणि त्यांनी हातात बायबलची प्रत घेऊन फोटो काढून घेतला. त्यावरून मरियाना यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. केवळ ट्रम्प यांच्या प्रसिद्धीसाठी सामान्य आंदोलनकर्त्यांवर बळाचा प्रयोग करण्याची त्यांनी स्पष्ट शब्दांत निर्भर्त्सना केली होती. ‘त्यांनी आध्यात्मिकतेचा मुखवटा घालण्यासाठी पवित्र प्रतीकांचा वापर केला. मात्र प्रत्यक्षात हातातल्या बायबलमधील शिकवणीच्या विरुद्ध भूमिका घेतल्या,’ असे त्यांनी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधल्या लेखात नमूद केलं होतं. त्याच महिन्यात त्यांनी ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की ‘मी ट्रम्प यांच्याशी बोलणं सोडून दिलं आहे. आपण त्यांना पायउतार होण्यास भाग पाडलं पाहिजे. आपल्या देशासाठी पात्र असेल असा नेता गरजेचा आहे,’ आपल्या समाजमाध्यमी खात्यांवरूनही त्यांनी जॉर्ज फ्लॉइडला न्याय मिळावा यासाठी करण्यात येत असलेल्या शांततापूर्ण आंदोलनांचे समर्थन केलं होतं.

मारियाना बडी या नेहमीच वांशिव भेद, अंदाधुंद गोळीबार करून केल्या जाणाऱ्या हत्या, स्थलांतरितांसंदर्भातील कायद्यांत सुधारणा, एलजीबीटीक्यू प्लस यांचा पूर्ण स्वीकार यासाठी लढा देत आल्या आहेत. त्यांनी इतिहासातील पदवी संपादन केली असून, देवत्व या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. ‘हाऊ वुई लर्न टू बी ब्रेव्ह – डीसिसिव्ह मोमेंट्स इन लाइफ अँड फेथ’, ‘रिसिव्हिंग जिजस : द वे ऑफ लव्ह’ आणि ‘गॅदरिंग अप फ्रॅगमेंट्स – प्रीचिंग ॲज स्पिरिच्युअल प्रॅक्टिस’ या पुस्तकांतून त्यांनी आपले विचार मांडले आहेत.

मारियाना यांचं कृत्य अशा प्रत्येक देशातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे, जिथे सत्ताधारी अतिशक्तिशाली आहेत किंवा हुकूमशाही मनोवृत्तीचे आहेत. भव्य बहुमताच्या आधारे पदावर बसलेल्यांना आपल्या विरोधातही आवाज उमटू शकतात, याची जाणीवच राहिलेली नसते. अशावेळी असे संयत, मात्र निडर आवाज त्यांना आपण अजेय नाही, याची जाणीव करून देत राहतात. भारतात केवळ सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविला म्हणून खटला दाखल झालेले, सुनावण्यांशिवाय वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडलेले अनेक आहेत. अनेकांना आपल्या तारुण्यातील तीन-चार वर्षे तुरुंगात गमावावी लागली आहेत. एखाद्याला शहरी नक्षलवादी ठरवून महिनोन् महिने तुरुंगात ठेवलं जातं, गंभीर आजार बळावता, अपंगत्वापर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर गुन्हा सिद्ध न होता, सुटका होते. अशा सुटकेला काय अर्थ? कोणीतरी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणारा चित्रपट निर्माण करतं आणि तो प्रदर्शितच केला जाऊ देत नाही. कोणी सरकारपुढे आपल्या मागण्या मांडण्यासाठी मैलोन् मैल चालत येतं, पण त्याला राजधानी दिल्लीत पोहोचूच दिलं जात नाही. हे सारं ज्या देशात चाललं आहे, त्या देशाने मारियानाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

अमेरिका महासत्तापदापर्यंत कशी पोहोचली? कोणामुळे पोहोचली? डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या सत्ताधाऱ्यांमुळे की इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांमुळे? त्यांचं योगदान आहेच. पण कोणत्याही देशाला योग्य मार्गावर ठेवण्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते मारियाना बडीसारखे सुजाण, निर्भीड आवाज…

vijaya.jangle@expressindia.com

Story img Loader