प्रेमात पडल्यावर विवाहबद्ध होणे ही तशी सहज आपसूक घडणारी प्रक्रिया नाही का ? राज कपूर ह्यांचा नातू रणबीर आणि महेश भट यांची लेक आलिया अयान मुखर्जीच्या महत्वाकांक्षी ‘ब्रह्मास्त्र ‘चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना भेटले आणि ३-४ वर्षांच्या डेटिंग नंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले . ऋषी कपूर हयात असताना हे लग्न व्हायचे होते पण त्याच्या गंभीर आजारपणामुळे हे लग्न पुढे ढकलले गेले . अखेरीस १४ एप्रिल २०२२ रोजी हे दोघं बोहल्यावर चढले .. वयाच्या १७व्या वर्षीच स्टारडम लाभलेल्या आणि ‘कमर्शिअली सक्सेसफूल ‘ठरलेल्या आलियाने कमी वयातच अनेक यशस्वी चित्रपट द्यायचा धडाकाच लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमी वयात लाभलेले स्टारडम आणि त्यापाठोपाठ मिळणारे फायदे

आलिया अनेक ब्रॅण्ड्सना हवीहवीशी वाटू लागली. तिचे वडील महेश भट्ट आपल्या लेकीला मिळालेल्या यशाने आनंदून जाणे स्वाभाविक होतेच पण एका पित्याला मुलीशी भेट होणे ही दुरापास्त झाले होते . महेश भट्ट ह्याबाबत म्हणाले होते , मुंबईत शूटिंग असले की प्रवास करतांना तिच्याशी फोनवर बोलणं होतं. ती आऊट डोअर शूटिंगला गेली की मी तिला व्हिडीओ कॉल करतो, माझी लेक मला किमान ‘ऑन कॅमेरा’ तरी दिसते …थोडक्यात काय तर आलियाच्या आयुष्यात वेळेचा अभाव आहे. मूळातच अभिनय क्षेत्रातील कलाकारांना तसा वेळ कमी. शिवाय अलीकडे ते सोशल लाईफ ते सोशल मीडिया असे व्यग्र असतात. त्यामुळे अभिनेत्रींना स्वयंपाक करता येत नाही हे सत्य आता सर्वांनीच गृहीत धरले गेले आहे़.

पण लग्नानंतर आलियात झालेले बदल सुखावह आणि अचंबित करत आहेत. लग्नाआधी देखील गर्भश्रीमंतीत आणि लाडाकोडात वाढलेल्या आलियाने तिच्या घरच्या किचनमध्ये कधीही पाऊल ठेवलं नव्हतं, पण लग्नानंतर ‘खवय्ये कपूर ‘ अशी ओळख असलेल्या कपूर घराण्यात सून म्हणून पाऊल टाकल्यावर आलियाने स्वयंपाक शिकण्याचे भलतेच मनावर घेतले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘डार्लिंग्ज ‘ या फिल्मसाठी आलिया भेटली तेव्हा ती तिच्या नव्याने जागृत झालेल्या ‘किचन प्रेमाबद्दल’ सांगत होती.

मी प्रेग्नन्ट असल्याने डॉक्टर वारंवार मला होमफूड घ्या असे सांगतात. मी डाएट फूड ,आहारात पथ्यं, असे कसलेही स्वतःचे चोचले करत नाही. जे आवडेल ते खायचे, फक्त खाण्यात अतिरेक न करता, शक्यतो होम फूड असल्यास उत्तम असा माझा प्रयत्न असतो. जगात होम फूडपेक्षा अधिक सकस – अधिक चविष्ट काहीही असू शकत नाही, विशेषतः गर्भवतींसाठी !, आलिया सांगते.

महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची आवड

दररोजचा आहार हेल्दी असतोच पण काही विशिष्ट पदार्थ खावासा वाटल्यास तो घरगुती असावा, असाही प्रयत्न असतो. माझ्या लग्नांआधीच ‘कपूर कुटुंबीय खवय्ये आहेत ह्याची मला जाणीव होती. खाण्याचे आवडीचे पदार्थ समोर आलेत की ते डाएट पार विसरून जातात हे ही ठाऊक आहे. आलिया म्हणते, मी आणि रणबीर तीन महिने लंडनला होतो. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलीवूड पटाचे शूटिंगही होते तिकडे. माझ्यासाठी घरगुती- भारतीय खिचडी लंडनमध्ये रणबीरने मिळवली. आज इथे दही वडा दिसला आणि खाण्याची इच्छा झाली, मग काय मी घेतला. मला कांदे -पोहे , उपमा, थालीपीठ हे सगळे महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. मूग डाळीचा हलवा खूप प्रिय आहे मला.

बहुधा नाश्त्याला हेच असते. भविष्यात माझ्या अपत्यालाही घरचे अन्न मिळणे मला आता आवश्यक वाटू लागले आहे. मी बिझी आहे. चित्रपट निर्मितीत उतरलेय. त्यामुळे काम वाढले आहे. लग्नांनंतर काही पदार्थ शिकून घ्यावेत असं मला खूप वाटत होतं, पण वेळच मिळत नाहीये. अंड्याचे ऑम्लेट बनवणे, चहा -कॉफी करणे इथपर्यंत माझी प्रगती झालीये, पण काही जुजबी खाद्यपदार्थ मी शिकून घेणार हे नक्की. सध्या खिचडी शिकण्याकडे माझे प्राधान्य आहे. मॅगी खाऊन फार तर एक दिवस भूक भागेल, पण काही तरी अन्न विशेषतः आपले भारतीय खाद्यपदार्थ मला करता आले पाहिजेत असं मला वाटते. अगदी करियर करणाऱ्या स्त्रीलाही थोडे बहुत पदार्थ करता आलेच पाहिजेत .. ‘

देर आये दुरुस्त आये ह्यालाच म्हणतात बहुधा !

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress alia bhatt learning indian cooking at home for kapoor family nrp