चेंबूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, वाढलेली विद्या बालन हिच्या कुटुंबात जवळच्या वा दूरदूरच्या कुणाचाही अभिनयाशी काडीचाही संबंध नव्हता. विद्या लहानपणी अमिताभ बच्चनचे चित्रपट पाहून त्यांची आणि सिनेमाची चाहती बनली. माधुरी दीक्षितचा १-२-३-४ हा डान्स पाहून विद्यानं घरात आईची ओढणी घेऊन आरशासमोर पहिल्यांना नाचायला सुरुवात केली… त्या लहान वयात विद्यालाही कुठं ठाऊक होतं की भविष्यात तिला अमिताभ सोबत ‘पा’ चित्रपट करण्याची संधी मिळेल. किंवा माधुरी दीक्षितसोबत ‘भूल भुलैया -३’मध्ये तिच्यासोबतच काम करायला मिळले. इतकंच काय तर डान्सिंग क्वीन माधुरीसोबत ‘आमि के तोमार’ हा क्लासिकल डान्सची जुगलबंदी करण्याची सुवर्णसंधी सहज मिळून जाईल म्हणून…
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया -३’च्या निमित्तानं तिच्याशी गप्पा मारताना डोळ्यासमोरून झर्रकन तिची यशस्वी कारकीर्द चमकून गेली. सध्या अनिस बजमी दिग्दर्शित ‘भूल भुलैया -३’ या चित्रपटानं २०० करोडपेक्षा अधिक गल्ला मिळवला आहे. हा सिनेमा सुपरहिट ठरलाय. विद्या बालनचा स्लिम ट्रिम लूक सगळ्यांना आवडलाय. अनेक वर्षे ‘हेल्दी’ भासणाऱ्या विद्याचं वय किमान १० वर्षांनी कमी असल्याचं जाणवतय. आणि विद्याही तिच्या चित्रपटाच्या यशावर खुश होती.
हेही वाचा : काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
‘भूल भुलैया’तील भूमिकांविषयी सांगशील?
माझा ‘भूल भुलैया -१ माझा गाजला. त्यानंतर मी ‘भूल भुलैया २’मध्ये नव्हते. आता पुन्हा ‘भूल भुलैया ३’ मध्ये आहे. ती ‘भूल भुलैया २’ मध्ये का दिसली नाही या प्रश्नावर मी सांगते, मला‘भूल भुलैया २’ ची ऑफर आली होती, परंतु तेव्हा मला असं वाटलं की एका फिल्मला यश लाभलं की त्याचा सिक्वल बनतो आणि तो हिट होईल याची काय शाश्वती? या धास्तीमुळेच मी नकार दिला. मग २०२३मध्ये ‘भूल भुलैया ३’ ची ऑफर आली, आता मात्र मला‘भूल भुलैया’ मधील माझी प्रसिद्ध व्यक्तिरेखा ‘मोंजोलीका’ पुन्हा साकारण्याचा मोह झाला आणि मी ‘भूल भुलैया ३’ साइन केला. मी अक्षय कुमारसोबत आतापर्यत तीन चित्रपट केले- ज्यात ‘भूल भुलैया १’, ‘हे बेबी’ आणि ‘मिशन मंगल’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचं आणि माझं कामाचं छान टयुनिंग जुळलं आहे. पण पहिल्यांदाच मी ‘भूल भुलैया ३’च्या निमित्तानं नव्या पिढीचा स्टार कार्तिक आर्यनसोबत काम केलं. अगदी पहिल्या भेटीतच आम्हा दोघांची छान गट्टी जमवली. आम्ही सेटवर छान गप्पा मारायचो. मी एकदा सहजच त्याला कोलकाताच्या काली घाट मंदिरला येतोस का असं विचारलं आणि तो दुसऱ्या क्षणाला आनंदानं हो म्हणाला. सेटवर मी त्याची खूप चेष्ट मस्करी करत असे.
माधुरी दीक्षितसारख्या जेष्ठ अभिनेत्रीला ‘भूल भुलैया ३’’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात येईल याची तुला कल्पना होती का?
छे ! अजिबात नाही. आणखी एका अभिनेत्रीला घ्यावं हे नंतर ठरलं. अनिस भाई (दिग्दर्शक अनिस बजमी ) यांनी सहज माधुरीला एक भूमिका ऑफर केली आणि या तिनेही ती सहजपणे स्वीकारली. ज्याक्षणी माधुरीनं हा चित्रपट स्वीकारला त्या क्षणी मला अंदाज आला की आम्ही दोघींच्या जुगलबंदीचं नृत्य यात असणा आणि झालंही तसंच ! कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी ‘आमि के तोमार’ ची कोरिओग्राफी केली. एकीकडे मी ‘दो और दो प्यार’ चं प्रमोशन करत होते आणि त्या नंतर ‘आमि के तोमार’ ची रिहर्सल ! खूप थकून जात असे. ज्या माधुरीला पाहून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले, ती माझी प्रेरणा होती, त्याच माधुरीसोबत मी नृत्याची जुगलबंदी करणार होते. पण नृत्य म्हटलं की माधुरी इज अल्टिमेट ! त्यामुळे माझ्यावर माधुरीसोबत डान्स करण्याचा ताण होताच. ‘आमी के तोमार’ वरचं माझं ऩृत्य खूप प्रसिद्ध झालं. लोक त्यामुळे मला ओळखायला लागले. या गाण्यानं माझं नाव झालं, त्यामुळे माधुरीसारख्या उत्तम डान्सरसोबत नाचून मला माझं हसू करायचं नव्हतं. मी प्रचंड सराव केला. आमच्या दोघीही वेगवेगळा सराव करायचो. प्रत्यक्ष डान्सचं शूटिंग सुरू झालं आणि माधुरीने स्टेप बदलली, मी खूप गडबडले. मला हे जमणार नाही असं मी सांगितलं. पण हा माधुरीचा मोठेपणा की तिनं स्वतः मला त्या स्टेप्स करून दाखवल्या, शिकवल्या आणि मी सहजपणे ‘आमि के तोमार’करू शकले ! माधुरी फिल्म इंडस्ट्रीतली माझी प्रेरणा होती, पण तिच्यासोबत प्रत्यक्ष काम केल्यावर मला तिच्यातला प्रेमळपणा, तिचं उत्तम माणूस असणं हे अनुभवता आलं. हॅट्स ऑफ टू हर !
हेही वाचा : मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
तिच्या स्लिमट्रीम लुकबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, गेली अनेक वर्षे मला ॲसिडिटीचा त्रास आहे. काही हार्मोनल इशूज होते, मी पूर्णपणे शाकाहारी आहे. जिममध्ये जाऊन, नियमित व्यायाम आणि काटेकोर दिनचर्या पाळूनही माझं वजन नेहमी वाढतच होतं. मला माझ्या वाढत्या वजनाचा काही इशू नव्हता. मी जशी आहे त्यावर मी खूश होते ! पण मला नीट जेवण जात नव्हतं. माझ्या ॲसिडीटीवर योग्य उपाय हवे होते. त्या काळात पती सिद्धार्थ चेन्नईच्या अमूरा ग्रुपसोबत काही प्रोग्रॅम करत होतो. त्याानंच मला सुचवलं की माझा हेल्थ इशू त्यांना (अमुरा ग्रुप )सांगावा. मी त्यांच्याशी संपर्क केला. आणि काय आश्चर्य पालक, दुधी सारख्या कुणालाही सहज पचणाऱ्या पौष्टिक भाज्या मला त्यांनी तात्पुरत्या बंद करण्यास सांगितल्या. वेगळा आहार आखून दिला आणि त्यांची थेरपी सुरू झाली आणि माझी ॲसिडिटी कमी झाली. माझं वजन झपाट्यानं कमी झालं. माझ्यातील या कायापालटानं एकूणच आत्मविश्वास वाढला.
तुझा कुठला चित्रपट तुला अतिशय जवळचा वाटतो ?
‘सिल्क ’ (अभिनेत्री सिल्क स्मिताचा बायोपिक -डर्टी पिक्चर ) अगदी क्षणाचाही विलंब न करात तिनं सांगितलं. ही भूमिका माझ्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये एक आश्चर्यकारक बदल घडवण्यास कारणीभूत ठरली ! या भूमिकेसाठी सेक्स अपील असणं आवश्यक होतं. मला वाटत होतं, माझ्याकडे सेक्स अपील नाही. मला स्वत:ला माझ्याच शरीराचा संकोच वाटत असे. पण मी मोठं धाडस केलं आणि माझा संकोच दूर झाला. आत्मविश्वास वाढला. स्वतःबद्दलचं मत बदललं. मी स्वतःला बोल्ड ॲन्ड ब्युटीफुल समजू लागले. सिल्क स्मिताच्या व्यक्तिरेखेनं एका वेगळ्या विद्याला जन्म दिला ! मी ‘फियरलेस’ झाले. अभिनयाच्या क्षेत्रात लाजरीबुजरी व्यक्ती टिकू शकणार नाही. सिल्कच्या व्यक्तिरेखेनं मला आत्मविश्वास दिला की, मै भी परफेक्ट हूँ ! ‘
मी समस्त महिलांना सांगेन, तुम्ही जशा आहात तसा स्वतःचा स्वीकार करण्यास शिका. फक्त स्वतः चे आरोग्य सांभाळा. तुमच्या आरोग्यविषयक समस्या दूर झाल्या की आत्मविश्वास वाढतोच आणि तुम्ही सुंदर दिसता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखादीला बदाम उपयुक्त ठरतील, पण दुसरीला ते बदाम योग्य ठरतीलच असे नाही. प्रत्येक स्त्रीने प्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी- ज्यात योग्य आहार, पुरेशी झोप, किमान १५ मिनटे व्यायाम केला पाहिजे. उत्तम आरोग्य हीच सौंदर्याची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घ्या! ‘