रोजच्या वापरासाठी ‘ब्रा’ निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘कम्फर्ट’ आणि हा कम्फर्ट तेव्हाच मिळतो जेव्हा ब्राचा साईज अगदी योग्य असतो. आता अनेकजणी म्हणतील, की ब्राचा साईज मोजणं किती सोपं आहे! हाताशी कपड्यांची ‘मेजरिंग टेप’ असली की झालं. अंतर्वस्त्रांची दुकानं आणि मॉल्समध्येही ही मेजरिंग टेप उपलब्ध असते आणि साईज मोजायला सहाय्य करण्यासाठी स्त्री मदतनीससुध्दा असतात. पण आपण ‘बेस्ट फिटिंग’बद्दल बोलतोय. ते कसं मिळवायचं ते पाहूया.
साधा बस्ट साईज आपण असा मोजतो?
मेजरिंग टेपनं बस्टवरून साईज मोजलात, की तुम्हाला ३२, ३४, ३६ इंच असा काही तरी आकडा मिळतो. म्हणजे तुम्ही मोजलेला हा साईज जर ३६ असेल, तर तुम्हाला ३६ साइजची ब्रा फिट होईल असं आपण समजतो.
ही झाली आपली सामान्यांची पद्धत. अशा प्रकारे बस्ट साईज मोजताना काही गडबड होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन ‘फॅशन’वाल्या मंडळींनी त्यासाठी एक खास सूत्रही शोधलंय. आमच्या मते मात्र या गणितात पडून आपला गोंधळ करून घ्यायची काहीही आवश्यकता नाही. थेट बस्टवरून मेजरिंग टेपनी मोजलेला ब्रा साईज पुरेसा असतो. मात्र ब्राच्या बेस्ट फिटिंगसाठी आणखी एक साईज महत्त्वाचा असतो, तो म्हणजे ‘कप साईज’. तो कसा काढायचा ते मात्र जाणून घ्यायला हवं.
कप साईज
‘बस्ट साईज’ वेगळा आणि ‘कप साईज’ वेगळा! तुम्ही कोणत्याही आधुनिक ब्रॅण्डच्या ब्रा पाहिल्यात, तर त्यावर तुम्हाला असे साईज लिहिलेले दिसतील- ‘३४-बी’ , ‘३६-सी’ वगैरे. ब्राच्या स्टॅण्डर्ड साईजेस मध्ये बस्ट साईजच्या पुढे ए, बी, सी, डी, ई यातलं कुठलंतरी अक्षर लिहिलेलं असतं. आता हे ए, बी, सी, डी, ई काय असतं बुवा?
आता आकडेमोड करायला तयार व्हा! आपल्याला प्रथम मेजरिंग टेपनं प्रथम थेट बस्टवरून वर सांगितल्याप्रमाणे बस्ट साईज मोजायचा आहे. बस्ट साईज आपला आपण मोजताना चुकू शकतो, त्यामुळे आपण हात सरळ रेषेत खाली ठेवून दुसऱ्या कुणाच्या मदतीनं बस्ट साईज मोजून घेतलेला चांगला. मग मेजरिंग टेप बस्टच्या लगेच खालच्या भागावर- म्हणजे बरगड्यांवर ठेवून तिथलाही साईजही मोजायचा आहे. उदा. बस्ट साईज ३६ असेल आणि बरगडीपाशी मोजलेला साईज असेल ३४, तर ३६ मधून ३४ वजा करायचे. उत्तर आलं २. म्हणजेच तुमचा कप साईज आहे २.
आता पुढचं सूत्र सोपं आहे. कप साईज २ असतो तेव्हा ब्रा ‘बी कप’ची लागते.
म्हणजेच हा आकडा जर १ आला तर ‘ए कप’, २ आल्यास ‘बी कप’, ३- ‘सी कप’, ४- ‘डी कप’ आणि ५- ‘ई कप’ असं समजा. आता लक्षात आला ना ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’चा घोळ! (‘ए’ कपपेक्षा आणखी कमी साईजच्या आणि ‘ई’ कपपेक्षा मोठ्या साईजच्याही ब्रा मिळतात, मात्र सर्व दुकानांमध्ये नाही.)
‘कप साईज’मुळे काय फरक पडतो?
काहींना असंही वाटेल, की या ‘कप साईज’चं काय एवढं महत्त्व? समजा एखाद्या वेळी ‘३६-सी’च्या ऐवजी ‘३६-बी’ कप साईजची ब्रा घातली तर काय बिघडेल? दोन्हीत ब्राचा बस्ट साईज तर ३६ आहेच ना?
फरक पडतो! बस्ट साईज जरी तुम्ही नीट मोजलात, तरी कप साईजवरच त्या ब्राचं फिटिंग चांगलं होणं वा न होणं अवलंबून असतं. म्हणजे वरवर पाहाता फरक नगण्य वाटला, तरी ‘३६-सी’च्या ऐवजी ‘३६-बी’ कप साईजची ब्रा घातल्यास पुरेसं ‘कव्हरेज’ मिळत नाही हे तुमच्या लगेच लक्षात येईल. (अर्थात हे ब्रा मुळातच किती कव्हरेज देणाऱ्या स्टाईलची आहे, यावरही अवलंबून असतं.) मात्र योग्य कप साईजची ब्रा घातलीत तर ती उत्तम बसेल आणि अधिकाधिक कम्फर्ट देईल, याची खात्री आहे.
प्रसंगी सूत्र वापरूनही तुमची साईजबद्दल खात्री झाली नाही, तर हल्ली अंतर्वस्त्रांची दुकानं वा मॉल्समध्ये स्त्रियांच्या विभागात ‘ब्रा’ ट्राय करण्यासाठी विशेष ट्रायल रूम्स केलेल्या असतात. त्यांचा वापर करण्यास काहीच हरकत नसावी.