अफाट निळाशार सागराची भुरळ कोणाला पडत नाही? या महासागराच्या लाटांवर अलगदपणे तरंगण्याचं स्वप्नं प्रत्येकानं कधी ना कधी पाहिलेलं असतं. पण प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. पण मूळच्या बंगळुरूच्या अनन्यानं मात्र हे स्वप्नं पाहिलं आणि जिद्दीनं पूर्णही केलं. अटलांटिक महासागर किंवा असा कोणताही महासागर एकटीने पार करणारी अनन्या ही पहिली भारतीय किंबहुना पहिली अश्वेत महिला ठरली आहे. तिनं ५२ दिवसांत ३,००० मैलांचा टप्पा पार केला आहे.
३४ वर्षांच्या अनन्याने ३,००० मैलांची ही जगातील सर्वांत कठीण समजली जाणारी वार्षिक सागरी मोहीम ५२ दिवस ५ तास आणि ४४ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या यशामागे अनन्याच्या सागरी प्रेमाबरोबरच असाधारण मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे. स्पेनच्या कॅनरी आईसलँडपासून ११ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झालेली ही सागरी मोहीम ३१ जानेवारी २०२५ रोजी कॅरेबियाच्या अँटीगुआमध्ये समाप्त झाली. महत्त्वाचं म्हणजे अनन्याने ही अत्यंत खडतर सागरी मोहीम सामाजिक उद्देशाने केली. भारतातील मानसिकदृष्ट्या विकलांग आणि अनाथ मुलांच्या मदतीसाठी तिनं या मोहीमेतून १५०,००० पाऊंड पेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.
अनन्या उत्तम नौकानयनपटू तर आहेच, पण तिची आणखीही एक ओळख आहे. प्रसिध्द कन्नड कवी जी. ए. शिवरुद्रप्पा हे अनन्याचे आजोबा आहेत. तिचा जन्म बंगळुरूला झाला. ती सहा वर्षांची असताना तिचं कुटुंब लंडनमध्ये स्थायिक झालं. सुरुवातीला गंमत म्हणून अनन्यानं नौकानयन शिकायला सुरूवात केली. पण नंतर तेच तिचं पॅशन बनलं. या मोहिमेसाठी अनन्यानं साडेतीन वर्षं खास प्रशिक्षण घेतलं.
महासागर पार करून जाताना फक्त शारीरिकच नाही तर मानसिक ताकदीचीही परीक्षा असते. हवेतील बदल, सागरी वादळे, पाऊस, ऊन, थंडी अशा वातावरणातील विविध बदलांसह कोणतंही संकट उभं ठाकू शकतं. त्यांना सामोरं जाताना मानसिकरित्याही तितकंच कणखर असावं लागतं. तांत्रिक गोष्टीही शिकून घ्याव्या लागतात. अनन्यालाही याचा अनुभव आला. या मोहिमेदरम्यान एकदा तिच्या नावेचा रडार तुटलं. पण नौकानयन करत असतानाच तिला ते दुरुस्त करावं लागलं. तर एकदा तिचा फोन पाण्यात पडला. बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचं ते मुख्य साधन होतं. पण या मोहिमेसाठी तिनं पूर्ण तयारी केली असल्यानं तिच्याकडे दुसरा हँडसेट होता. त्यामुळे त्यातूनही तिनं निभावून नेलं.
मोहिमेत अनन्या दररोज १२ तास नौकानयन करायची. आवश्यकतेनुसार छोटे ब्रेक घ्यायची. रात्रीच्या वेळेस पाच ते सहा तास सलग झोप घ्यायची. तिच्याबरोबर तिनं डिहायड्रेटेड फूड आणि खाण्याचे काही कोरडे पदार्थ ठेवले होते. हे पदार्थ शिजवण्यास सोपे असल्याने तिचा स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जायचा नाही. संपूर्ण मोहीम एकटीच पार करत असूनही आपल्याला कधी एकटेपणा जाणवला नाही असं अनन्याने मोहिमेनंतर सांगितलं. एकतर आपण सतत आपल्या तांत्रिक, हवामान सांगणाऱ्या आणि सोशल मीडिया टीमच्या संपर्कात होतो. आणि आपल्याला विशाल महासागराची साथ होती असं ती सांगते. या मोहिमेला सामोरं जाण्यासाठी अनन्यानं घेतलेल्या प्रक्षिक्षणात खोल समुद्रातलं नौकानयनाचं प्रशिक्षण तर होतंच, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा अभ्यास, कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची लवचिकतेसाठी आणि अटलांटिक महासागराच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये जीव वाचवण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं. सागरी वादळं, उसळणाऱ्या उंचच उंच लाटांचा सामना करताना तिला याच प्रशिक्षणाचा उपयोग झाला.
‘‘महाकाय सागरात निसर्गाची विविध रूपं अनुभवण्यासाठी मी उत्सुक होते’’, असं अनन्यानं मोहिमेनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. खरं तर २०१८ मध्ये तिनं जेव्हा या मोहिमेबद्दल ऐकलं होतं तेव्हा ती सुरुवातीला ती घाबरली होती. त्यानंतर तिनं एका टीमबरोबर या मोहिमेत सहभागी व्हायचं ठरवलं. पण त्यामध्ये खूप वेळ गेला असता. त्यामुळे शेवटी ती एकटीच या मोहिमेत सहभागी झाली. या मोहिमेत तिनं खरोखरंच निसर्गाची विविध रूपं अनुभवली. पण चमचमत्या ताऱ्यांनी भरलेलं आकाश आणि खाली समुद्राचं पाणी हे अविस्मरणीय चित्रं तिच्या मनावर ठसलं आहे. निसर्गाचं सान्निध्य, प्रदूषणमुक्त हवा यामुळे या मोहिमेचे ५२ दिवस आपल्याला अद्भुत शांतता आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव मिळाला असं अनन्याचं म्हणणं आहे.
अनन्याचं हे यश तिच्या एकटीचं नाही. तर सामाजिक मर्यादा, बंधन ओलांडून पुढे जात साहसी खेळात काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीचं यश आहे. या मोहिमेच्या सोलो विभागात अनन्या एकटीच होती. देश, धर्म, वर्ण आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन साहसी खेळात काहीतरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रत्येक तरुणीला अनन्यानं प्रेरणा दिली आहे. खेळामध्ये खेळाडूची जिद्द, ताकद, प्रयत्न आणि मेहनत हेच महत्त्वाचं असतं. स्त्री असो की पुरुष… जिद्द, मेहनत, चिकाटी आणि प्रयत्नांच्या जोरावर शारीरिक आणि मानसिक सीमा ओलांडता येतात हे अनन्यानं सिद्ध केलं आहे.