ईशा आणि आदित्यच्या ब्रेकअपला तीन महिने झाले, पण वर्षभराची रिलेशनशिप ईशाला अजून विसरता येत नव्हती. तासन्तास मोबाइलवर बिंज वॉचिंग किंवा गेम्स खेळत बसायचं, चेहरा सतत दु:खी करून फालतू गोष्टीवरून घरात, ऑफिस, ग्रुपमध्ये वाद घालायचे, कुठल्याही वेळी काहीही खात राहायचं आणि वाढत्या वजनाचीही चिडचिड हे रुटीन झालेलं. मुख्य म्हणजे कामात खूप चुका व्हायच्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज बॉसच्या केबिनमधून बाहेर पडलेल्या ईशाचा चेहरा चांगलाच उतरलेला सुरभीला जाणवला. “बॉसनं लास्ट वॉर्निंग दिली मला आज. तुझ्याकडून अशा चुकांची अपेक्षा नव्हती ईशा. महिन्याभरात परफॉर्मन्स सुधारला नाही, तर तुझ्याकडचा जर्मनीचा नवा प्रोजेक्ट दुसऱ्या कोणाकडे तरी द्यावा लागेल म्हणे.” कॅंटीनमध्ये जेवायला बसल्यावर ईशानं सांगून टाकलं. “मग आता कसा प्लॅन करणारेस येत्या महिन्याचा?” या सुरभीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ईशा उसळून म्हणाली, “हे सगळं आदित्यमुळे होतंय. तो भेटण्याच्या आधी बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड्स होती मला. माझं काम, संडे ट्रेकिंग, सायकलिंग सगळं मस्त चालू होतं. रिलेशनशिपच्या सुरुवातीलाही मी आजिबात डिपेंडन्ट नव्हते त्याच्यावर. आदित्य ट्रेकच्या ग्रुपमध्ये आल्यावर हळूहळू ग्रुप मागे पडला आणि आम्ही दोघंच डेटवर जायला लागलो. तो तेव्हा सतत मेसेज करायचा, माझ्या आवडीची लोकेशन्स, भटकणं प्लान करायचा. मला खुश ठेवायला धडपडायचा. किती खूष होते मी. त्याचा जॉब गेला तेव्हा मीही किती सपोर्ट केलं त्याला.”

हेही वाचा – गच्चीवरची बाग: बंगला/अपार्टमेंटजवळची मोकळी जागा

“हो. आठवतंय मला. त्याला सोबत देणं हेच सर्वांत महत्त्वाचं काम होतं तुला तेव्हा.” “तिथेच चुकलं गं. त्याला सपोर्ट करण्याच्या नादात तो म्हणेल तसं मी केव्हा वागायला लागले मला कळलंच नाही. मीच खूप डिपेंडन्ट झाले त्याच्यावर. त्याला आवडेल ते करायला लागले. कामाकडे दुर्लक्ष करायला लागले आणि नंतर आदित्यचं वागणं बदलत गेलं. ट्रेक थांबले तेव्हाच माझी सोबत त्याला नकोशी होतेय, असं वाटायला लागलं मला.

“त्याला नवा जॉब लागल्यावर तर नवी कंपनी, तिथले कलीग, त्या दोघी अतिशहाण्या मैत्रिणी… हेच महत्वाचे झाले. माझी काही किंमतच नाही… माझं डोकंच फिरायचं. सारखी भांडणं… नात्यातली मजाच संपली. शेवटी ब्रेकअप व्हायचा तो झालाच, वर कामावरचा फोकस गेला आणि आता तर बॉसही वैतागलाय, जर्मनीही हातून जाणार. सगळं आदित्यमुळे झालंय हे. आधी गोडगोड वागला, गरजेला मला वापरलं आणि नंतर डिच केलं त्यानं…” ईशाची नेहमीची कॅसेट सुरू झाल्यावर मात्र सुरभीला राहवेना. “जे झालं ते झालं, ईशा. पण आता तू फक्त चिडचिड करत सगळ्याची जबाबदारी आदित्यवरच टाकत राहणार आहेस की या अनुभवातून काही शिकणार आहेस?” “काय शिकायचं? रिलेशनशिपच्या भानगडीत पुन्हा पडायचं नाही हेच ना?” “रिलेशनशिपचं पुढचं पुढं. कोणी आवडलं तर तेव्हा ठरवता येईल. पण कुणाच्याही सोबतीनं कितीही छान वाटलं तरी आपला लगाम दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही. आपल्या कामांकडे आणि आवडींकडे दुर्लक्ष करायचं नाही हे तर शिकायला हवं ना? तू आदित्यच्या इच्छेवर स्वत:ला इतकं सोडून दिलंस, की तो तुला गृहीत धरायला लागला. अति सहवासाने दोघांनाही स्पेस उरली नाही म्हणून कंटाळा आणि मग भांडणं झाली हे तुला आता तरी दिसतंय का? त्याचं वागणं खटकायला लागल्यावर तरी आपण किती वाहावत जायचं? हा विचार तुला करता आलाच असता. आदित्य आणि ब्रेकअपला दोष देत, रडत, चिडत वेळ आणि करियर आणखी वाया घालवायचं, की नव्याने स्वत:ला शोधायचं? हा चॉइस अजूनही तुझ्या हातात आहे, फक्त तुला ते कळायला हवं.”

हेही वाचा – सोन्यापेक्षा घरात गुंतवणूक, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला महिलांचं प्राधान्य

ईशा विचारात पडली. मोबाइल उचलून ‘संडे ट्रेक’ च्या ग्रुपवर “मी येतेय’ चा मेसेज टाकत सुरभीला म्हणाली, “चल. महिन्याच्या प्लॅनिंगला मला मदत करतेस? आता फक्त मिशन जर्मनी.”

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

(neelima.kirane1@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breakup what next the choice is yours ssb
Show comments